Friday, 26 November 2010

एका कार्यकर्त्याची मुलाखत

मुलाखतकार: नमस्कार, मी दैनिक ‘समृद्ध भारत’ मधून आपली मुलाखत घ्यायला आलो आहे.
कार्यकर्ता: (स्वगत: च्यायला, एकटाच आला. मी आणखी तीन पेपरांच्या प्रतिनिधींना बोलावलं होतं. आता प्रसिद्धीचे दुसरे मार्ग शोधायला हवेत. ब्लॉग लिहायला सुरुवात केली पाहिजे आता) नमस्कार, या या. (स्वयंपाकघराकडे वळून) अगं ए, जरा दोन कप चहा ठेव गं. (मुलाखतकाराकडे वळून) तसा मला अजिबात वेळ नसतो. मी भयंकर व्यस्त असतो. कामं असतात हो. आजही दोन अपॉइंटमेंट्स रद्द कराव्या लागल्या या मुलाखतीसाठी.
मुलाखतकार: पण मला तर संपादक म्हणत होते की तुम्ही बरेच दिवस आमच्या कार्यालयात फोन करून आम्ही तुमची मुलाखत घ्यावी म्हणून विनवत होतात. आता तुम्ही आमच्या पेपरला देणगी देणार असं ऐकल्यावर संपादकांनी मला पाठवलं मुलाखत घ्यायला...
कार्यकर्ता: !!!
मुलाखतकार: (आयला, मी बहुतेक भलतंच काहीतरी बोललो. आता सारवासारव करायला हवी...) अं... फार उकडतंय नाही?
कार्यकर्ता: (स्वगत: संपादक साला बामण आहे. म्हणून माझी बदनामी करतोय...) हो ना. एसी लावू का? आमच्याकडे एसी आहे ना! मागच्याच आठवड्यात घेतला. ४५ हजारांना...
मुलाखतकार: (स्वगत: ४५ हजारांना घ्या, नाहीतर ४५ लाखांना. मला काय करायचं आहे?) तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी राजेंद्र साठे. दैनिक ‘समृद्ध भारत’ मध्ये वार्ताहर म्हणून कामाला आहे.
कार्यकर्ता: (हाही भटच आहे! साल्याला वास्तविक मी मुलाखत द्यायला नको, पण बाकीच्या वृत्तप्रतिनिधींनी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, तेव्हा याला उत्तरं द्यावीच लागणार. अडला हरी... दुसरं काय?) अच्छा. बोला. काय विचारायचं आहे तुम्हाला?
मुलाखतकार: आपलं नाव काय?
कार्यकर्ता: तुम्हाला माझं नावही माहित नाही?
मुलाखतकार: अहो, मला माहित आहे हो. पण मुलाखतीत नाव विचारण्याची पद्धत असते म्हणून विचारलं.
कार्यकर्ता: बरं. माझं नाव सुमीतराजे रामटेकवांदेकर.
मुलाखतकार: आपलं शिक्षण किती झालं आहे?
कार्यकर्ता: मी फार्टोग्राफीमध्ये डिग्री घेतली आहे.
मुलाखतकार: कशामध्ये???
कार्यकर्ता: फार्टोग्राफी
मुलाखतकार: Ohh.. You mean Photography!
कार्यकर्ता: हां, तेच ते...
मुलाखतकार: पण तुमच्या शाळेत जाऊन आलो मी. तिकडचे रेकॉर्ड्स बघितल्यावर कळलं की चौथीत तीनवेळा नापास झाल्यावर तुम्हाला शाळेतून काढलं.
कार्यकर्ता: तिकडचे सगळे मास्तर बामण होते. हा माझी बदनामी करण्यासाठी रचलेला बामणी कावा आहे!
मुलाखतकार: अहो, पण तुम्ही मिशनरी स्कूलमध्ये होता ना? तिकडचे बहुतांशी शिक्षक ब्राह्मण तर सोडाच, हिंदूही नाहीत. ख्रिश्चन आहेत.
कार्यकर्ता: असं तुम्हाला वाटतं. पण बामणांना ख्रिश्चन म्हणून प्रमोट करायचं, बहुजनांवर अत्याचार करायचे आणि ख्रिश्चनांवर नाव ढकलायचे ही त्या भटांची चाल होती.
मुलाखतकार: असो. तुम्ही सध्या काय करता?
कार्यकर्ता: मी महाराज आर्मीचा एक कार्यकर्ता आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर समाजाचं ऋण फेडायला हवं या उदात्त भावनेने समाजसेवेचं असिधाराव्रत स्वीकारलं आहे. मला धनाचा मोह नाही. मी समाजात सुव्यवस्था स्थापन व्हावी यासाठी कार्य करतो. कोणा एका समाजाला महत्त्व देऊन दुसर्‍या समाजावर अन्याय हो‍ऊ नये यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी निर्मोही आहे. लग्न झाल्यावर हिचा बाप मला खूप जास्त वरदक्षिणा देणार होता. पण, मुळातच पैशाचा मोह नसल्याने मी तो नाकारला. हां, आता सासरेबुवांना वाईट वाटू नये म्हणून एक प्रतीकात्मक वरदक्षिणा स्वीकारली. एक स्कॉर्पियो गाडी, दोन मजली एक बंगला, पंधरा तोळे सोनं, एक लाखाची कॅश सोडता मी एक छदामही घेतला नाही सासर्‍यांकडून. तसा मी स्वाभिमानीही आहे. मला कोणी....
मुलाखतकार: (मध्येच थांबवत) असो. पुढचा प्रश्न. तुमची संस्था काय कार्य करते?
कार्यकर्ता: आमची संस्था भारतात एकोपा निर्माण करण्यासाठी झटते. समाजातील बहुजन घटकांवर अन्याय हो‍ऊ नये म्हणून कार्य करते. बामणांना स्वतःला श्रेष्ठ समजून बाकीच्यांवर अन्याय करण्याची सवय असते. आम्ही हा असा अन्याय खपवून घेत नाही. बहुजनांतर्फे आम्ही आवाज उठवतो. शेवटी काय, सगळ्या जातींतले लोक सारखेच असतात असं आपल्या कॉन्स्टिपेशननेच मान्य केलं आहे.
मुलाखतकार: (विजारीत झुरळ शिरल्यासारखा किंचाळतो) काऽऽऽऽऽऽय???
कार्यकर्ता: अहो, असं काय करता? कॉन्स्टिपेशन म्हणजे राज्यघटना! घटनेनेच सर्वांना समान अधिकार दिले आहेत, नाही का? माफ करा, पण तुमचं इंग्लिशवर म्हणावं तेवढं प्रभुत्व नाही.
मुलाखतकार: (अजून धक्क्यातून सावरला नाहीये हा!) आं? हां, हो हो. माझं इंग्लिश थोडं कच्चं आहे. तर पुढचा प्रश्न. चंदावरकर इन्स्टिट्यूटवर हल्ला महाराज आर्मीने केल्याचं ऐकलं होतं...
कार्यकर्ता: हा हल्ला समर्थनीय होता. आमच्या महाराजांवर त्या चंदावरकर इन्स्टिट्यूटच्या भटांनी शितोडे उडवले होते. त्यांचं हे असंच व्हायला हवं होतं. साले माजले आहेत सगळे!
मुलाखतकार: काही महत्त्वाची कागदपत्रंही जाळली म्हणे...
कार्यकर्ता: अजिबात नाही. आम्ही कुठलीही कागदपत्रं जाळली नाहीत. आम्हाला एवढी अक्कल नाही असं समजू नका. हा सगळा भटांचा कावा आहे. आणि मिडीयावालेही भटांचेच भक्त. त्यांनी भटांचं हे म्हणणं उचलून धरलं. सरकारही बामणांनाच सामील.
मुलाखतकार: अहो, पण तिकडच्या कॅमेर्‍यांमध्ये रेकॉर्डिंग आहे कागदपत्रं जाळतानाचं.
कार्यकर्ता: तो कॅमेराही खोटा होता आणि ते रेकॉर्डिंगही खोटं होतं. तीही बामणांचीच चाल होती. आमचे कार्यकर्ते गेल्यावर काही भटुरडे आत घुसले आणि त्यांनी मोडतोड आणि जाळपोळ केली. आणि निर्लज्जपणे हे रेकॉर्डिंग आमचं म्हणून दाखवलं. भटांची साली अवलादच खोटी!
मुलाखतकार: शांत व्हा, शांत व्हा. आपण दुसर्‍या विषयाकडे वळूया. आपल्या घरी कोण कोण आहेत?
कार्यकर्ता: मी, माझी बायको आणि माझा धाकटा भाऊ. मी समाजसेवक आहे, माझी बायको गृहिणी आहे आणि भावाची बटीक आहे.
मुलाखतकार: (विजेचा शॉक बसल्यासारखा) काऽऽऽय?
कार्यकर्ता: अहो बटीक म्हणजे कपड्यांचं दुकान हो. तुम्ही थोडं इंग्लिश सुधारा बरं...
मुलाखतकार: (स्वगत: मग रेड्या, बुटिक म्हण ना! मला कसं कळणार तुला काय म्हणायचं आहे ते?) आपल्या आर्मीबद्दल आणखी थोडी माहिती सांगा. म्हणजे स्थापना कशी झाली, कधी झाली वगैरे वगैरे...
कार्यकर्ता: आर्मीची स्थापना १९९९ साली झाली. तेव्हा साहेब आणि साहेबांचे दोन भाऊ एवढेच आर्मीचे सदस्य होते. त्यानंतर हळूहळू आर्मीचा विस्तार होत गेला. आणि आता ३ लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत. पण सुरुवात मात्र तिघांपासूनच झाली आहे. आर्मीच्या त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे साहेबांचे दोन भाऊ आणि साहेब म्हणजे हिपोपोटेमस.
मुलाखतकार: हायपोटेन्युअस (आता याला सवय झाली आहे बहुतेक!)
कार्यकर्ता: तेच!
मुलाखतकार: आत्ताच तुम्ही म्हणालात की सरकार ब्राह्मणांना सामील आहे. पण सध्याच्या सरकारात तर अनेक अब्राह्मण लोक आहेत
कार्यकर्ता: अजिबात नाही! ते सगळे १००% बामणच आहेत. किंबहुना जगात जी वाईट कार्यं होतात त्यांच्या मुळाशी बामणच असतात!
मुलाखतकार: ओसामा बिन लादेन कुठे ब्राह्मण आहे?
कार्यकर्ता: आहे ना! निःसंशय तो भटुरडाच आहे! त्याचं मूळचं नाव ॐकारभाऊ लेले आहे. आणि तो बामणच आहे.
मुलाखतकार: हिटलरने लाखो ज्यूंना छळून मारलं. तो कुठे ब्राह्मण होता?
कार्यकर्ता: हिटलरही भटच होता. हा सगळा बामणांनी रचलेला बनाव आहे.
मुलाखतकार: अहो, पण हिटलर ब्राह्मण नसल्याचे पुरावे आहेत.
कार्यकर्ता: तो ब्राह्मणच होता!
मुलाखतकार: तुम्ही एवढ्या ठामपणे कसं काय म्हणू शकता? काय पुरावा आहे तुमच्याकडे?
कार्यकर्ता: हिटलरच्या एका सैनिकाने त्याच्या बायकोला लिहिलेलं पत्र वाचा. सगळं स्पष्ट होईल.
मुलाखतकार: कुठे मिळेल ते पत्र?
कार्यकर्ता: हिंगणेवाडीत प्रसिद्ध होणार्‍या सुप्रसिद्ध ‘बंधमुक्ती’ या दैनिकात ते प्रसिद्ध झालेलं आहे. हिटलर हा बामणच होता असं त्यावरून निःसंशयपणे सिद्ध होतं. अर्थात तुम्हाला नाही पटायचं ते. तुम्हीही भटच आहात! बहुजनांनी कितीही पुरावे दिले तरी ते तुम्हाला ग्राह्य वाटत नाहीत. आम्ही सांगितलेला वृत्तपत्राचा पुरावा तुम्हाला पटत नाही आणि आम्ही मात्र तुमच्या रेकॉर्डिंगवर विश्वास ठेवायचा! अजब न्याय आहे! तुम्ही सगळे भट सारखेच. साले ब्लडी बामण!
मुलाखतकार: मला एक कळत नाही, तुमचा एवढा राग का ब्राह्मणांवर? तुम्ही एखाद्या ब्राह्मण मुलीला लग्नासाठी मागणी घातलीत आणि तिने तुम्हाला चपलेने फोडलं असं काहीतरी घडलंय का तुमच्या आयुष्यात?
कार्यकर्ता: कोणी आम्हाला असं चपलेने फोडायला आम्ही काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत!
मुलाखतकार: छे! बांगड्या तर जिने तुम्हाला चपलेने फोडलं तिने भरलेल्या असतील ना? शेवटी मुलगीच ती!
कार्यकर्ता: हे बघा, तुम्ही माझा अपमान करत आहात. जरा तोंड सांभाळून बोला.
मुलाखतकार: बरं. औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं.
कार्यकर्ता: औरंगजेब हाही भटुरडाच होता. रोज सकाळी उठल्यावर तो शंकराची पूजा करायचा.
मुलाखतकार: जॉर्ज बुशने अफगाणिस्तान आणि इराकवर हल्ला केला.
कार्यकर्ता: तोही मूळचा भटच. रोज जेवायला बसण्याआधी चित्राहुती घालतो तो! एवढंच नव्हे, त्याची मुंजपण झाली आहे तो लहान असताना. साला बामण!
मुलाखतकार: अफजल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला.
कार्यकर्ता: तेही सगळे बामणच होते. त्यांना मुसलमान म्हणून प्रमोट करून मुसलमानांवर नाव ढकलायचं आणि स्वतः नामानिराळं राहायचं हा बामणी कावा होता. भटाबामणांच्या हलकटपणाची ही परंपरा थेट महाभारतातल्या रावणापासून सुरू झालेली आहे.
मुलाखतकार: रावण तर रामायणात होता हो...
कार्यकर्ता: तेच ते! हाच तर भटी कावेबाजपणा आहे! बहुजनांना बोलू द्यायचं नाही, आणि स्वतः बोललेलं सगळं खरं समजायचं.
मुलाखतकार: पण रावण रामायणात होता ही तर शतकानुशतके मान्य असलेली गोष्ट आहे.
कार्यकर्ता: आम्ही का मानावं ते? शेवटी विश्वामित्रही भटच होते ना? त्यांनी सांगितलेलं तेवढं खरं का?
मुलाखतकार: रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं आणि महाभारत महर्षी व्यासांनी लिहिलं!
कार्यकर्ता: तेही भटच!
मुलाखतकार: ओके. अजमल  कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मुंबईवर दहशतवादी हल्ला केला.
कार्यकर्ता: तेही सगळे भटांचेच पायिक होते. एकाही भटाला त्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले नाहीत. जे लोक हल्ल्यात दगावले ते सगळे बहुजन होते.
मुलाखतकार: तुमचा कुत्रा फार भुंकतो.
कार्यकर्ता: तोही भटच आहे!
मुलाखतकार: तुम्ही खूप चिडताय.
कार्यकर्ता: कारण मीही भटच आहे!
मुलाखतकार: आँ??
कार्यकर्ता: नाही म्हणजे ते आपलं हे... तुम्ही नसते प्रश्न विचारून मला गोंधळात पाडलंत म्हणून असं म्हणालो मी. मला मुलाखत द्यायचीच नाही. चला चालते व्हा इथून. माझे विचार जगापर्यंत पोचवण्यासाठी मला कोणाचीही गरज नाही. तुमच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मी स्वतः ब्लॉग लिहीन!
मुलाखतकार: अहो, पण आपली मुलाखत अर्धवटच राहिली आहे...
कार्यकर्ता: मुलाखत गेली खड्ड्यात! चला निघा!

टीप: वरील लेख, त्यातील व्यक्तिरेखा, त्यातील प्रसंग, त्यातील वाक्ये, त्यातील परिस्थिती ही संपूर्णपणे काल्पनिक असून त्यातील कोणताही भाग जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटनेशी, संघटनेशी, प्रसंगाशी, व्यक्तिरेखांशी, जातीशी, धर्माशी, भाषेशी, देशाशी, पुरुषाशी, स्त्रीशी, राजकारण्याशी, प्राण्याशी, निर्जीव वस्तूशी, खेळाशी थोडाजरी जुळत असेल तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.

Monday, 22 November 2010

मधुरिमा कुळकर्णी १ - मीही एकदा पडलो प्रेमात


कॉलेजमध्ये असताना मीही एकदा पडलो प्रेमात
काहीतरी जादू होती कुळकर्ण्यांच्या मधुरिमात

मधुरिमा कुळकर्णी ही कॉलेजातली क्वीन होती
सगळी शिष्ट मुलंसुद्धा तिच्यासमोर दीन होती

गोरा होता रंग तिचा, नाजूक ओठांची कमान होती
ऐश्वर्याही तिच्यासमोर मायावतीसमान होती

घारे तिचे डोळे होते, कमनीय बांधा होता
ती पटत नाही हाच तर सगळ्यांचाच वांदा होता

तिला बघायला मुलं रोज न चुकता वर्गात यायची
ती मात्र सर्वांसमोर विनाकारण भाव खायची

एकदा रस्त्याने जाताना तिने मला धडक दिली
माझ्याकडली सगळी पुस्तके एकदमच खाली पडली

‘आय अ‍ॅम सॉरी’ म्हणत, ती पुस्तके उचलू लागली
माझ्या मनात तेव्हा प्रेमफुलं उमलू लागली

त्यानंतर आमची भेट वारंवार होऊ लागली
अफेअरची आशा मनात माझ्या आता जागू लागली

माझ्या मनातील भावना तिच्याही मनी असतील का?
प्रेममेघ तिच्या मनात माझ्यासारखेच बरसतील का?

असे प्रश्न दिवसरात्र मला सारखे छळू लागले
एक कोवळे नाजूक प्रेम माझ्या मनी रुळू लागले

एकदा धीर केला म्हटलं विचारूया आज तिला
जीवनभर साथ देशील का मला माझ्या प्रीतफुला?

रेस्टॉरंटमध्ये गेलो आम्ही बर्गरची ऑर्डर दिली
मी बोलण्याआधीच मात्र तिने बोलायला सुरुवात केली

काल माझं लग्न ठरलं, खूप आनंद झालाय मला
तू मला भावासारखा, म्हणून आधी सांगितलं तुला

मागे रमेशने लग्नासाठी केलं होतं मला प्रपोज
मी होकार दिला होता, घरी जरी झालं अपोज

काल मात्र बाबांनी लग्नाला माझ्या परवानगी दिली
मोठा भाऊ म्हणून मला, तुझीच आठवण आधी आली

रमेश माझ्या दुःखांवर एक रामबाण लोशन आहे
माझ्यासाठी कॉलेजमध्ये तोच हृतिक रोशन आहे

हे ऐकून माझ्या हृदयावर एक मोठा आघात झाला
काय पाहिलं त्या बोकडात असा विचार मनात आला

रमेश कसला हृतिक रोशन, एक नंबरचा पाजी आहे
तरीही ही त्याच्याबरोबर, लग्नासाठी राजी आहे

बोकड, गाढव, रेडा, हत्ती यांचं तो एक मिक्स आहे
तरीही आज त्याच्याबरोबर, हिचं लग्न फिक्स आहे

भाऊ म्हटल्याबद्दल मला मधुरिमाचा राग आला
बिल तिला भरायला लावून मी माफक सूड घेतला

तेव्हा ठरवलं आता कधी पडायचं नाही प्रेमात
एवढं काय ठेवलं आहे कुळकर्ण्यांच्या मधुरिमात

खूप वर्षांनी मधुरिमा मला एकदा बाजारात भेटली
ओळखलंच नाही तिला, मला ती जयललिताच वाटली

नाजूक मधुरिमा आता एक हत्तीण झाली होती
गोबर्‍या गालांच्या जागी आता गालफडं आली होती

गोलगप्पा झाली होती, सार्‍या बाजूंनी उसवली होती
मुलाचा हात धरला होता, मुलगी कडेवर बवसली होती

मागे उभा नवरा बघून मला लगेच साक्षात्कार झाला
नवरा नव्हे हिला तर एक फुकट हमाल मिळाला

उभा होता गपगुमान सगळ्या पिशव्या हातात घेऊन
बघत होता तिच्याकडे सतत दातओठ खाऊन

हतबुद्ध दिसत तो होता, चेहरा त्याचा उतरला होता
हृतिक जाऊन आता फक्त शक्ती कपूर उरला होता

थँक्यू देवा मनात म्हणालो, ही नव्हती माझ्या प्रेमात
काहीसुद्धा उरलं नाही कुळकर्ण्यांच्या मधुरिमात

-- संकेत



टीप: स्वामी संकेतानंदांचा कवितालेखनाचा क्रॅश कोर्स वाचून मला ही कविता लिहिण्याची बुद्धी झाली. त्यामुळे त्यांचे विशेष आभार.

Sunday, 21 November 2010

गणितातील गमतीजमती - १

गणित आणि गंमतजंमत हे शब्द बर्‍याच लोकांना विरुद्धार्थी शब्द म्हणून वापरण्याची सवय आहे. त्यामुळे हे नाव वाचून कदाचित तुमच्या भुवया उंचावल्या जाण्याची शक्यता आहे. पण गणितातही गंमत असते. बरेचसे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यांच्यात एक प्रकारची सममिती (Symmetry) असते. त्यामुळे एका प्रकारची गणितं सोडवता आली तर त्याच प्रकारची बरीचशी गणितं त्याच पद्धतीने सोडवता येतात. पण आज बेरजा कशा कराव्यात किंवा गणितं कशी सोडवावीत हा काही लेखाचा विषय नाही. आज काही गणितांमधली सममिती मला इथे मांडायची आहे. उदाहरणार्थ:

                                १ * १ = १
                            ११ * ११ = १२१
                        १११ * १११ = १२३२१
                    ११११ * ११११ = १२३४३२१
                १११११ * १११११ = १२३४५४३२१
            ११११११ * ११११११ = १२३४५६५४३२१
        १११११११ * १११११११ = १२३४५६७६५४३२१
    ११११११११ * ११११११११ = १२३४५६७८७६५४३२१
१११११११११ * १११११११११ = १२३४५६७८९८७६५४३२१

आता हा दुसरा पिरॅमिड पाहा:

                                ९ * ९ = ८१
                            ९९ * ९९ = ९८०१
                        ९९९ * ९९९ = ९९८००१
                    ९९९९ * ९९९९ = ९९९८०००१
                ९९९९९ * ९९९९९ = ९९९९८००००१
            ९९९९९९ * ९९९९९९ = ९९९९९८०००००१
        ९९९९९९९ * ९९९९९९९ = ९९९९९९८००००००१
    ९९९९९९९९ * ९९९९९९९९ = ९९९९९९९८०००००००१
९९९९९९९९९ * ९९९९९९९९९ = ९९९९९९९९८००००००००१

आणखी एक:

३७ * ०३ = १११
३७ * ०६ = २२२
३७ * ०९ = ३३३
३७ * १२ = ४४४
३७ * १५ = ५५५
३७ * १८ = ६६६
३७ * २१ = ७७७
३७ * २४ = ८८८
३७ * २७ = ९९९

हा पुढचा संख्येच्या वर्गावर (Square) आधारित आहे.

०१ = १^२
०१ + ०३ = २^२
०१ + ०३ + ०५ = ३^२
०१ + ०३ + ०५ + ०७ = ४^२
०१ + ०३ + ०५ + ०७ + ०९ = ५^२
०१ + ०३ + ०५ + ०७ + ०९ + ११ = ६^२
०१ + ०३ + ०५ + ०७ + ०९ + ११ + १३ = ७^२
०१ + ०३ + ०५ + ०७ + ०९ + ११ + १३ + १५ = ८^२
०१ + ०३ + ०५ + ०७ + ०९ + ११ + १३ + १५ + १७ = ९^२

(१^२ म्हणजे १ चा वर्ग (१), २^२ म्हणजे २ चा वर्ग (४), ३^२ म्हणजे ३ चा वर्ग (९) वगैरे वगैरे...)

आता खालचा पिरॅमिड बघा...

                  १ * ८ + १ = ९
                १२ * ८ + २ = ९८
              १२३ * ८ + ३ = ९८७
            १२३४ * ८ + ४ = ९८७६
         १२३४५ * ८ + ५ = ९८७६५
       १२३४५६ * ८ + ६ = ९८७६५४
    १२३४५६७ * ८ + ७ = ९८७६५४३
  १२३४५६७८ * ८ + ८ = ९८७६५४३२
१२३४५६७८९ * ८ + ९ = ९८७६५४३२१

आता हा शेवटचा:
12345679 * 09 = 111111111
12345679 * 18 = 222222222
12345679 * 27 = 333333333
12345679 * 36 = 444444444
12345679 * 45 = 555555555
12345679 * 54 = 666666666
12345679 * 63 = 777777777
12345679 * 72 = 888888888
12345679 * 81 = 999999999


टीप: शेवटचा ब्लॉक इंग्रजीत लिहिला आहे कारण मराठीत लिहिल्यावर तो नीट आयत दिसत नव्हता आणि त्याची शोभा जात होती.

Monday, 15 November 2010

गोष्टी माणसांच्या

सुधा मूर्ती. नारायण मूर्तींच्या पत्नी आणि इन्फोसिस फाऊन्डेशनच्या अध्यक्षा आणि विश्वस्त या नात्याने त्या सर्वांना ठाऊक आहेतच. त्या संगणकशास्त्राच्या प्राध्यापिका आणि एक समाजसेविकाही आहेत. इन्फोसिस फाऊन्डेशनतर्फे अनेक संस्थांना, अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. कर्नाटक राज्यातल्या प्रत्येक शाळेत संगणक आणि वाचनालयाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्या एक प्रथितयश लेखिकाही आहेत. ‘महाश्वेता’, ‘वाईज अँड अदरवाईज’, ‘डॉलर बहू’, ‘हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज’ ही त्यांच्या पुस्तकांपैकी काही प्रसिद्ध पुस्तके. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता.

या दिवाळीच्या निमित्ताने मी माझ्या बहिणीकडे आलो होतो. तिथे `हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद माझ्या नजरेस पडला. लीना सोहोनींनी ‘गोष्टी माणसांच्या’ या नावाने हा अनुवाद केला आहे. वेळ घालवण्यासाठी मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पूर्ण झाल्यावरच खाली ठेवलं. पुस्तक पूर्ण होईपर्यंत वेळ कसा गेला कळलंही नाही. छोट्या गोष्टी, साधी सोपी भाषा आणि लेखिकेचं कथा सांगण्याचं कौशल्य या गोष्टींमुळे हे पुस्तक स्मरणीय झालेलं आहे. सुधा मूर्तींच्या आयुष्यात त्यांना भेटलेल्या अनेक माणसांच्या गोष्टी यात आहेत. पुस्तकाच्या पानापानांतून अनेक लोक गोष्टीरुपाने आपल्याला भेटतात आणि अनेक गोष्टी शिकवतात. प्रत्येकाने एकदा तरी वाचावं असं हे पुस्तक आहे आणि त्यातून शिकण्यासारख्या आणि घेण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत.

जमशेद टाटांबद्दलही एक गोष्ट यात आहे. सुधा मूर्ती जेव्हा इंजिनियरिंगला होत्या तेव्हा त्यांच्या कॉलेजात टेल्को कंपनीची नोकरासाठी नोटिस लागली होती. त्यात ‘स्त्रियांनी अर्ज करू नये’ असं लिहिलं होतं. त्यामुळे सुधाताईंना राग आला आणि त्यांनी जमशेद टाटांना एक खरमरीत पत्र लिहिलं. काही दिवसांनी त्यांना पुण्याहून एक पत्र आलं ज्यात त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं होतं. मुलाखतीमधून त्यांची निवड झाली आणि टेल्कोमध्ये फ्लोरवर काम करणारी पहिली महिला होण्याचा त्यांनी मान मिळवला. जमशेद टाटांना भेटल्यावर त्यांच्या निगर्वी व्यक्तिमत्त्वाने त्या भारावून गेल्या होत्या. एवढं खरमरीत पत्र लिहूनही जमशेदजींनी एकदाही त्या पत्राचा उल्लेख कधी केला नाही. वास्तविक त्या पत्राचा चोळामोळा करून त्यांना कचर्‍यात फेकता आला असता. पण त्यांनी आवर्जून सुधाताईंना मुलाखतीसाठी बोलावलं. स्त्री-पुरुष समानतेसाठी झगडू इच्छिणार्‍या एका मुलीच्या भावना त्यांनी समजून घेतल्या. एकदा त्या गाडीची वाट पाहात उभ्या होत्या तेव्हा निव्वळ त्यांना एकटीला थांबावं लागू नये म्हणून जमशेदजी टाटा नारायण मूर्ती ये‍ईपर्यंत सुधाताईंबरोबर थांबले. स्वतः मोठ्या उद्योगसमूहाचे मालक असूनही एका कर्मचार्‍याबद्दल दाखवलेली आपुलकी त्यांच्या मोठ्या मनाचं दर्शन घडवून जाते.

या पुस्तकात नारायण मूर्तींची स्फूर्तिदायी कथाही आहे. सुधाताईंच्या आईने त्यांना बचतीचं महत्त्व पटवून दिलं होतं. तिने त्यांना एक सल्ला दिलेला होता, ‘नेहमी थोडे पैसे बाजूला काढून ठेव. काहीही झालं तरीही त्या पैशांना हात लावू नकोस. अगदी आणीबाणीच्या वेळेस ते उपयोगी पडतील.’ तो सल्ला सुधाताई लग्नानंतर अमलात आणत होत्या. संगणक क्षेत्रात पैसा आहे हे नारायण मूर्तींनी हेरलं होतं. या क्षेत्रासाठी लागणारी बुद्धिमत्ता आणि मेहनती वृत्ती भारतात विपुल प्रमाणात आहेत हेही त्यांनी ओळखलं होतं. असं असताना भारतातील तरुणांनी परदेशी कंपन्यांसाठी काम करावं हे त्यांना पटत नव्हतं. म्हणून एक भारतीय सॉफ्टवेअर कंपनी आपण सुरू करावी असं त्यांच्या मनात होतं. सुरुवातीच्या भांडवलाची कमतरता होती. अशा वेळी सुधाताईंनी केलेली बचत कामी आली. त्यांनी दिलेल्या दहा हजार रुपयांमधूनच भांडवलाची सोय झाली आणि १९८१ साली इन्फोसिसची स्थापना झाली. आणि पुढे काय घडलं तो इतिहास सर्वज्ञातच आहे.

सुधाताईंच्या आजीची कहाणी शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी आहे. त्यांच्या आजीला एका सुधाताई एक मासिक वाचून दाखवायच्या. एकदा त्या एके ठिकाणी लग्नाला गेल्या होत्या. परत आल्यावर आजीशी बोलताना त्यांना जाणवलं की आजीचे डोळे पाणावलेले आहेत. कारण विचारल्यावर आजी म्हणाली, ‘तू लग्नाला गेल्यावर मला मासिक वाचण्याची इच्छा झाली होती. पण त्यातलं एकही अक्षर मला कळलं नाही. तेव्हा मला जाणीव झाली की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. तेव्हा मीही आता शिकण्याचा निश्चय केला आहे. तू मला उद्यापासून शिकव. येत्या गुरुपौर्णिमेला ते मासिक स्वतः वाचण्याची माझी इच्छा आहे.’ त्यानंतर सुधाताईंची आणि आजीची शिकवणी सुरू झाली. गुरुपौर्णिमेपर्यंत आजी वाचायला शिकली होती. गुरुपौर्णिमेला ते मासिक सुधाताईंनी आजीला भेट म्हणून दिलं. एवढं वय झालेलं असतानाही आजी शिकली यावरूनच शिक्षणाचं महत्त्व सिद्ध होतं.

या आणि अशा अनेक कथा या पुस्तकात आहेत. ही छोटी कथामौक्तिके मनाला स्पर्शून जातात. काही वेळा डोळ्यांच्या कडा पाणावतात, तर कधी काही प्रसंगांतून मनाला उभारी मिळते. आपणही वाचताना कथेतल्या व्यक्तीप्रमाणे ती कथा जगतो. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं ‘गोष्टी माणसांच्या’ हे पुस्तक आहे. कधी मिळालं तर नक्कीच वाचा. सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित असणार्‍या आणि शब्दांचे फुलोरे न फुलवता साध्यासोप्या भाषेत लिहिलेल्या या कथा तुमच्या मनाचा नक्कीच ठाव घेतील.

Tuesday, 9 November 2010

बातम्या आणि प्रतिक्रिया

आजकाल वृत्तपत्रांत येणार्‍या बातम्या आणि त्यांवर येणार्‍या प्रतिक्रिया हा एक करमणुकीचा विषय झालेला आहे. वृत्तपत्रांच्या ऑनलाईन आवृत्त्या याबाबतीत जास्त आघाडीवर असतात. या वृत्तपत्रांच्या ऑनलाईन आवृत्तीत छापून येणार्‍या बातम्या आणि त्यावर येणार्‍या प्रतिक्रिया जर नित्यनियमाने कोणी वाचल्या तर त्याला आयुष्यात हसर्‍या क्षणांची कधीच कमतरता पडणार नाही! लोक तरी काय नामी प्रतिक्रिया देतात! त्या वृत्तपत्राच्या तमाम वाचकांची करमणूक करायची नैतिक जबाबदारी फक्त आपलीच आहे अशी बर्‍याच प्रतिक्रियाबहाद्दरांची समजूत असते. बातमी काहीही असो, त्यावरच्या प्रतिक्रिया मात्र अगदी भन्नाट असतात.  आणि नुसत्या प्रतिक्रियाच नव्हे, तर त्या देणार्‍यांनी धारण केलेली नावंही भलतीच मनोरंजक असतात. उदाहरणार्थ ही खालची काल्पनिक बातमी बघा...

भरदिवसा घर फोडून वीस हजारांची चोरी
समृद्ध भारत वृत्तसेवा
Thursday, September 23, 2010 at 10:35 PM (IST)

सातारा - सातारा जिल्ह्यातील तांदूळवाडी या गावात आज सकाळी भरदिवसा घरफोडी झाली. गावचे पाटील महेशचंद्र राजे यांच्या घरातून सकाळी ११ च्या सुमारास काही अज्ञात चोरांनी टी.व्ही., भांडीकुंडी आणि काही रोख रक्कम असा सुमारे वीस हजारांचा ऐवज लुटून नेला. स्थानिक पोलीस याबाबतीत तपास करत असून लवकरच चोराला पकडण्यात ते यशस्वी होतील अशी माहिती पोलिस निरीक्षक राजन चवाथे यांनी दिली. भामट्यांनी जीपमधून पलायन केले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील तांदूळवाडी गावात आज (२१ सप्टेंबर २०१०) सकाळी ११ च्या सुमारास चोरी झाली. गावचे पाटील महेशचंद्र राजे हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई राजे सुनेसह देवळात गेल्या होत्या. राजेंचा मुलगा सतीश राजे मुंबईत कामासाठी गेला आहे. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरांनी दिवसाढवळ्या राजेंचं घर फोडलं आणि मौल्यवान वस्तूंसह पोबारा केला. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये घरातील दूरदर्शन संच, काही भांडीकुंडी आणि रोख रकमेचा समावेश आहे. सुदैवाने या प्रकारात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणी महेशचंद्र राजेंनी कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे आणि पोलिस या चोरीचा जातीने तपास करत आहेत. हे कृत्य चार चोरांच्या एका टोळीचे असावे असा पोलिसांचा संशय आहे. ही टोळी एका जीपमधून पळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या चोरीच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी सजग आणि जागरुक राहावे असा सावधगिरीचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
‘समृद्ध भारत’च्या प्रतिनिधीकडून

Tags: Theft, Satara, Raje, Tandulwadi, Koregaon

प्रतिक्रिया
सूर्यभद्रेश्वरानंद म्हणाले: (On September 24, 2010 8:00 AM)
इंग्लिशमध्ये तारीख २३ आहे, मराठीत २१ आहे. नक्की तारीख कोणती राव?

ठोंबे म्हणाले: (On September 24, 2010 8:03 AM)
शनिशिंगणापूरमध्येही चोरी होते आजकाल, सातार्‍याच्या चोरीचं एवढं काय घेऊन बसलात?

सचिन तेंडुलकर म्हणाले: (On September 24, 2010 8:03 AM)
२० हजार म्हण्जे फार नव्हे. गावचा पाटिल तो, त्याला पैशाचा काय तोटा? आनि तरीख २३ का २१?

महामहोपाध्याय म्हणाले: (On September 24, 2010 8:10 AM)
च्यायला, इंग्लिशमधे एक, मराठित एक तारिख. काय दारू मार्ता काय बात्म्या देताना?

कुमारी ब्रह्मकुमारी म्हणाले: (On September 24, 2010 8:27 AM)
कैच्याकैच बातम्या देता बै तुमी.

माननीय महोदया मनमोहिनीबाई मांजरमारे म्हणाले: (On September 24, 2010 8:45 AM)
चोरी झाली ही अतिशय गंभीर बाब आहे. याकडे पोलिसांनी आणि सामान्य जनतेने लक्ष दिलंच  पाहिजे. जय हिंद! जय महाराष्ट्र!

अजित जोशी म्हणाले: (On September 24, 2010 9:01 AM)
ओ संपादक! जरा तुमचं प्रतिक्रियांचं टेम्प्लेट सुधारा की! ‘ब्रह्मकुमारी म्हणाले’, ‘मनमोहिनी म्हणाले’.... बरं वाटतं काय ऐकायला? काय हे! काही लिंगभेद आहे की नाही? आणि आजकाल पहिल्या धारेची लावून येता काय बातम्या देताना? काहीही तारखा काय लिहिता?

परमपूज्य परमप्रकाशिता पद्मजाबाई पांजरपोळकर म्हणाले: (On September 24, 2010 9:09 AM)
अरे, एव्ढी मोठ्ठी चोरी झाली आहे आणी लोकांना त्याचे काही गांभीर्यच नाई! नुस्ते विनोद चाल्ले आहेत...

जगदीश सरंजामे म्हणाले: (On September 24, 2010 9:20 AM)
अहो मनमोहिनीबाई, स्वतःच्या नावापुढे ‘माननीय महोदया’ लावण्याची एवढी आग का तुम्हाला? हे वृत्तपत्र आहे, तुमच्या महिलामंडळाची मिटिंग नव्हे!

सलमान बट म्हणाले: (On September 24, 2010 9:45 AM)
तारखेचा गोंधळ घातला राव तुमी. कदी चोरी जाली काय कळंना जालंय बगा.....

अफझलखान म्हणाले: (On September 24, 2010 9:47 AM)
एव्ढी मोठि चोरी झाली आणी पोलिस काय zopa kadhat hote? te kahi nahi! choransoबत पोलिसन्नहि शासन व्हायला हवे.

आत्मजा महाबळ, New York म्हणाले: (On September 24, 2010 10:10 AM)
लोकांना काही seriousness च नाही! एवढी मोठी चोरी झाली आहे आणि एकजण इथे त्याकडे लक्ष दे‍ईल तर शपथ! आमच्या अमेरिकेत असं नसत

संपादक, समृद्ध भारत म्हणाले: (On September 24, 2010 10:10 AM)
तारीख २३ सप्टेंबरच आहे. मुद्रणदोषामुळे ती मराठीत ‘२१’ पडली आहे. तरी मी ‘समृद्ध भारत’ च्या समस्त कर्मचारीवर्गातर्फे आमच्या वाचकवर्गाची जाहीर क्षमा मागतो.

शिवाजी म्हणाले: (On September 24, 2010 10:32 AM)
त्या अफजलखानाला काही अक्कल आहे काय? झुरळासारखा चेचला होता मी त्याला! तुम्ही त्याचें काही ऐकू नका...... :-P

अजित जोशी म्हणाले: (On September 24, 2010 10:56 AM)
संपादक, तुमची माफी स्वीकारण्यात आलेली आहे.

गोदावरी राजापूरकर म्हणाले: (On September 24, 2010 11:11 AM)
ही पद्मजाबाई कसली डोंबलाची परमप्रकाशिता? लुब्री मेली!

नर्मदेतला गोटा म्हणाले: (On September 24, 2010 11:20 AM)
आत्मजाबाइ, नावापुढे New York कशाला? नुकतीच मुलाच्या किंवा मुलीच्या पैशाने अमेरिकावारी केलेली दिसतेय...

काकू म्हणाले: (On September 24, 2010 11:22 AM)
अयाई ग. अस वैट कोणच्याही घरी घडू नये.

बोकड म्हणाले: (On September 24, 2010 11:32 AM)
@ Above,
मग कस ‘वैट’ घडावं वो?????????

म्हसोबा म्हणाले: (On September 24, 2010 11:33 AM)
निषेध! निषेध! निषेध! चोरांना शिक्षा व्हायलाच हवी...

अ‍ॅना कुर्निकोवा म्हणाले: (On September 24, 2010 11:40 AM)
लई कल्ला करून राहिला बे हा...................................

Ranjit म्हणाले: (On September 24, 2010 11:51 AM)
Infosys che shares vadhle mhane

बातमीदार म्हणाले: (On September 24, 2010 11:57 AM)
अरे जोश्या, म्याच बघतोय्स काय्‌? सचिन चोपतोय. पार भुस्काट केलंय्‌ त्याने वॉटसन्च...

राखी सावंत म्हणाले: (On September 24, 2010 12:19 PM)
@ बातमीदार,
डोमकावळ्या, इथे चोरी झाली आहे आणि तुला म्याचचं पडलंय....................

राजहंस म्हणाले: (On September 24, 2010 12:27 PM)
पण मला एक कळत नाही.... चोरांनी घर फोडण्याची मेहेनत केली आणि फक्त भांडीकुंडी पळवली???? उपरती झाली की काय चोरी करताना?

हणमंत रेमडोके म्हणाले: (On September 24, 2010 12:56 PM)
I thnk, polis pan choranna samil asnar. nahitar choranne gip vaparli te kalla kasa?

मी मराठी म्हणाले: (On September 24, 2010 01:22 PM)
‘सकाळी भरदिवसा’ म्हणजे काय? दिवस असतो तेव्हाच तर सकाळ असते.............

अनामिक म्हणाले: (On September 24, 2010 01:35 PM)
To earn upto Rs. 20,000 a month, click on the following link.......

चड्डीचोर म्हणाले: (On September 24, 2010 01:48 PM)
pan eka jeepmadhye चर मन्स आनि एक tv एव्धे सग्ले मव्ले कसे? आम्हि कय तुम्हल मुर्ख वत्लो का?

आर आर आबा म्हणाले: (On September 24, 2010 02:37 PM)
अरे कलमाडींनी एवढा भ्रष्टाचार केला त्याचा तुम्हाला काही फरक पडत नाही आणि या फत्रूड चोरीचं एवढं कौतुक?????????

धोंडू अहमद जॉन म्हणाले: (On September 24, 2010 02:42 PM)
रमेश राजे एव्ढे सरपंच गावचे, आन्‌ त्यास्नी एक नवीन कुलुप घेता यीना व्हय घरासाठी?

Satyajit म्हणाले: (On September 24, 2010 02:43 PM)
@ ^^,
tyancha naav ramesh nahi, mahesh aahe......... :-P

रामचंद्र दामले म्हणाले: (On September 24, 2010 02:55 PM)
सत्यजित..... अहो विद्वान्‌, त्यांचें नांव महेंश नसून ‘महेंशचंद्र’ आंहे हों...

गजालीबहाद्दर म्हणाले: (On September 24, 2010 03:02 PM)
सत्यानाश होतलो त्या चोरांचो. मेल्यांक एवढीय लाज नसा काय? तुमी घाबरू नाका हां पोलिसांनू... तुमका सापडतले ते. मेले जातले खंय? सापडतले हंयसरच...

पहिले बाजीराव म्हणाले: (On September 24, 2010 03:09 PM)
laaj vATAyalaa havee coraaMnaa.

चिमाजी आप्पा म्हणाले: (On September 24, 2010 03:16 PM)
@ धाकटे बंधू बाजी (लोक त्यांना बाजीराव म्हणत असले तरीही आम्ही धाकटे बंधू या नात्याने ‘बाजी’च म्हणणार!)
लाज कसली? चोरी केली याची की गावच्या पाटलांच्या घरी जाऊनही फक्त वीस हजारच रुपये चोरले याची?

टॉम क्रूझ म्हणाले: (On September 24, 2010 03:21 PM)
प्रतिक्रिया वाचून मजा आली. येऊ द्या आणखी प्रतिक्रिया. चोर काय, पकडले जातीलच की कधीतरी.............

अनामिक म्हणाले: (On September 24, 2010 03:25 PM)
समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स...

राधिका बिर्जे, बी ए, एम ए, बी एड, एम एड म्हणाले: (On September 24, 2010 04:46 PM)
चोरांना पकडून जर त्यांच्यावर कारवाई करण्याचा पोलिसांचा डाव असेल तर तो आपण हाणून पाडायला हवा. अखेर तीदेखील माणसं आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर कारवाई केल्यावर मानवी अधिकारांचं उल्लंघन होईल आणि ‘मानवी अधिकार पायमल्ली प्रतिबंध समिती’ची अध्यक्षा म्हणून मी या गोष्टीला विरोध करते. चोरांवर कारवाई झाल्यास आमच्या संस्थेतर्फे सार्वजनिक उपोषणाचे आयोजन करण्यात ये‍ईल. प्रभातफेर्‍या निघतील. या चोरीला भारताचे परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे. परकीय राष्ट्रांशी मवाळ धोरण पत्करल्याने घुसखोर वाढतात आणि मग चोर्‍यामार्‍या वाढतात. गरीबी वाढते, कुपोषण वाढतं, सामाजिक प्रश्न वाढतात, भांडवलशाही वृत्ती वाढीस लागते. जागतिक भांडवलशाहीला माझा विरोध आहे. जय भारत, जय महाराष्ट्र, जय पिंपरी-चिंचवड, जय माअपाप्रस!!!

मल्हारराव भडंगे म्हणाले: (On September 24, 2010 05:26 PM)
बाऽऽऽऽऽपरे.... एव्ढी मोठ्ठ्ठ्ठ्ठी प्रतिर्किया! काय बै, काय गांजा लावला का?

सुहासनंदिनी म्हणाले: (On September 24, 2010 07:57 PM)
ही जोशांची सुमी राधिका बिर्जे नावाने लिहिते. मी चांगलं ओळखते तिला. माझे लेख प्रसिद्ध होतात आणि तिचे नाही, म्हणून जळते माझ्यावर आणि मग असलं काहीबाही खरडते. जळकुकडी कुठली!!!!

मनसे म्हणाले: (On September 24, 2010 08:03 PM)
या चिमाजीअप्पाला अम्निशीया झालाय्‌ वाट्टं. पहिले बाजीराव हे चिमाजीअप्पांचे थोरले बंधू होते, धाकटे नव्हे!

ब्रिगेड म्हणाले: (On September 24, 2010 08:33 PM)
वास्तविक ‘पोलिस या चोरीचा जातीने तपास करत आहेत’ च्या ऐवजी ‘पोलिस या चोरीचा बारकाईने तपास करत आहेत’ असे म्हणता आले असते या बातमीदाराला. पण जिथे तिथे जात काढण्याची सवयच आहे बामणांना. पण आम्ही ऐकणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही. जय भवानी!  जय शिवाजी!

aajari fevicol म्हणाले: (On September 24, 2010 08:41 PM)
comments evdhya aahet ki mul batmi kay tech visarlo

टीप: या लेखाचं महाजालावरच्या काही लेखांशी साम्य असल्याचं सूज्ञ वाचकांच्या ध्यानी आलं असेल. ते तसं असणं अपरिहार्य आहे, कारण ते लेख समोर ठेवूनच हा लेख लिहिलेला आहे! त्यामुळे या लेखाचं संपूर्ण श्रेय खालच्या लिंक्सना आहे. (अर्थात लेख जर नीट जमला नसेल तर त्याचं कारण अस्मादिकांचं लेखनदारिद्र्य आहे हेही चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आलं असेलच... :-) )

लेख आणि लेखावरच्या प्रतिक्रिया - वाईड ऍन्गल! - विद्याधर भिसे
इंडिकातून गाईची चोरी!; एकाला अटक
मधमाश्‍यांनी वाजवली बेल...
घाटात फुटला घाम...

Thursday, 4 November 2010

दीपावली शुभचिंतन

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. सर्व सणांचा राजा मानला जाणारा हा सण अश्विन महिन्यातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले दोन दिवस या चार दिवसांत येतो. काही लोक धनत्रयोदशी ही दिवाळीची सुरुवात मानतात. पण, सर्वसाधारणपणे नरकचतुर्दशी ही दिवाळीची सुरुवात मानली जाते. एवढ्या प्रसिद्ध असलेल्या या सणाची माहिती अनेक ठिकाणी अनेक वेळा प्रसिद्ध होते. तेव्हा तीच तीच माहिती सांगून वाचकांना कंटाळा आणण्यापेक्षा ही पोस्ट इथेच आवरती घेतो.

दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा दिवाळसण सर्वांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश जागवून अंधःकाराचा समूळ नाश करो हीच माझी या शुभदिनाची मनोकामना.

Sunday, 31 October 2010

माझी शिक्षणयात्रा - २

माझी शिक्षणयात्रा - १

चित्रकला हाही माझ्या शत्रुपक्षातला एक विषय. सर वर्गात आल्यावर नेहमी एक यादी वाचून दाखवायचे. पेन्सिल, रंग, पट्टी, खोडरबर वगैरे वगैरे. त्या यादीतली एखादी गोष्ट आम्ही आणली नसेल तर आम्हाला वर्गाबाहेर काढायचे. काही काळानंतर आम्ही सरांनी बाहेर जायला सांगण्याची अपेक्षा ठेवणं बंद केलं. यादी वाचताना प्रत्येक गोष्टीचं नाव घेतल्यावर काही मुलं स्वतःहून बाहेर पडू लागली. माझ्याकडे नेहमी कुठलीतरी गोष्ट मिसिंग असायची. त्यामुळे मी चित्रकलेत लहानपणापासूनच एक Out-standing विद्यार्थी होतो! एकदा तर ७८ मुलांपैकी ७५ मुलं वर्गाच्या बाहेर होती! मी अर्थातच त्यात होतो. बाहेर काढल्यावर आम्ही इतर कुठे उंडारायला न जाता वर्गाबाहेरच रांग लावली. आमची ही भलीमोठी रांग थेट मुख्याध्यापिका बाईंच्या ऑफिसपर्यंत पोचली होती. आमचा गलका ऐकून त्या घाबरून बाहेर आल्या आणि एवढी मोठी रांग बघून चक्रावल्या. मग खरी कहाणी ऐकल्यावर आम्हाला एक मोठं लेक्चर दिलं त्यांनी आणि चित्रकलेच्या सरांना सांगून आम्हाला आत घ्यायला सांगितलं.

चित्रकलेत आम्हाला ‘स्केचबुक’ नावाचा एक प्रकार होता. ही एक दोनशे पानांची वही असायची ज्यात आम्ही दर दिवशी एक चित्र काढणं अपेक्षित होतं. आता दर दिवशी आवर्जून एक चित्र काढावं एवढं काही माझं चित्रकलेवर प्रेम नव्हतं. बर्‍याचदा तर ती वही वर्ष संपेपर्यंत विकतही घेतलेली नसायची. मग शेवटच्या काही आठवड्यांत सर वही तपासायला सुरुवात करायचे. आणि प्रत्येक अपूर्ण असलेल्या चित्रासाठी हातावर एक फटका मारायचे. मग वही विकत घेतली जायची. आता काही आठवड्यांतच दोनशे चित्र कशी काढणार? मग माझ्या अफाट चित्रप्रतिभेला बहर यायचा. दोन उभ्या सरळ रेषा आणि त्यांच्यामध्ये पुष्कळशा आडव्या रेषा (शिडी), दोन आडव्या रेषा आणि त्यांच्यामध्ये बर्‍याचश्या उभ्या रेषा (तिरडी), एक वर्तुळ आणि त्यामध्ये दोन उभ्या सरळ रेषा (क्रिकेटचा बॉल) अशी चित्र काढायचो मी! आणि त्याखाली काढलेलं चित्र समजायला सोपं जावं म्हणून त्या चित्राचं नावही लिहायचो. एक आठवड्यात वही भरायची! (साहजिक आहे. नुसती वर्तुळं आणि सरळ रेषा काढायला कितीसा वेळ लागणार?) प्रत्येक चित्रागणिक सरांच्या रागाचा पारा एक अंशाने वर चढायचा. आणि मग ती वही पूर्ण असूनही मी मार खायचो!

जीवशास्त्राचंही माझ्याशी असंच विशेष जिव्हाळ्याचं नातं होतं. भूगोलापेक्षाही जास्त प्रेम मी जीवशास्त्रावर केलं आहे. आणि त्यातून मी पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेला असल्यामुळे मराठीत असलेल्या त्या जीवशास्त्रीय शब्दांनी हे स्नेहसंबंध वाढवण्याचं काम मोठ्या मेहनतीने पार पाडलं होतं. मी भुताला कधी घाबरलो नाही एवढा त्या शब्दांना घाबरलो आहे! जीवशास्त्राचं ते पुस्तक वाचताना बर्‍याचदा आपण पाली किंवा अर्धमागधी भाषेतलं एखादं पुस्तक वाचत आहोत असा भास व्हायचा. ‘Cerebrospinal Fluid’ साठी असलेला ‘प्रमस्तिष्कमध्यमेरु तरलद्रव’ हा शब्द पाठ होईपर्यंत माझी नववी संपली होती! (ही मस्करी नव्हे. खरंच असं झालं होतं. हा शब्द तिमाही आणि सहामाहीमध्ये मी केवळ लक्षात नसल्याने लिहिण्याचं टाळलं होतं आणि पाठ करून तो शब्द वार्षिक परीक्षेत लिहिला होता. अर्थात त्या शब्दाचा आणि वार्षिक परीक्षेचा काही संबंध नव्हता. कारण, सहामाहीचा आणि वार्षिक परीक्षेचा सिलॅबसच वेगळा होता! पण तरीही मी हा शब्द काहीतरी निमित्त काढून कुठल्यातरी उत्तरात घुसवला होता.) ‘तेलनिमज्जनवस्तुभिंग’ हा असाच एक भारदस्त शब्द. मला हा शब्द म्हणताना हनुमान चलिसा किंवा रामरक्षा म्हटल्यासारखं वाटायचं. बरं, हे प्रकरण नुसतं एवढ्यावरच थांबायचं नाही. एकाच गोष्टीला वेगळ्या इयत्तांमध्ये वेगळे शब्द असायचे! म्हणजे शब्द पाठ होईपर्यंत वर्ष संपायचं आणि वर्षाअखेरीस त्या पाठांतराचा उपयोग शून्य! कारण, नवीन शब्द यायचे. Arteries आणि Veins ना एका वर्षी आम्ही ‘धमन्या’ आणि ‘शिरा’ म्हणायचो तर दुसर्‍या वर्षी ‘रोहिणी’ आणि ‘नीला’! Auricle आणि Ventricle हे हृदयाचे कप्पे एका वर्षी ‘अलिंद’ आणि ‘नीलय’ होते तर पुढच्या वर्षी ‘जवनिका’ आणि ‘कर्णिका’! काही वाक्यंही अशीच गूढ असायची. अशी वाक्यं समजून घेण्यापेक्षा ती पाठ करून परीक्षेत जशीच्या तशी लिहिणं जास्त सोपं होतं. ‘ग्रसनीस कल्ला व विदरे नसतात’ हे असंच एक वाक्य! शाळा सोडून दहा वर्षं झाली तरीही या वाक्यातले मला आत्तापर्यंत कळलेले शब्द दोनच आहेत: ‘व’ आणि ‘नसतात’! एकूणच काय, मराठी जीवशास्त्रातला एखादा शब्द जरी एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यात शिरला तर पुस्तक छापणार्‍याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद त्यावेळी घटनेत असावी बहुतेक! अशा वातावरणात वाढल्यामुळे मी दहावीनंतर जीवशास्त्राला कायमचा रामराम करण्याचं ठरवलं होतं. पण म्हणतात ना, Man proposes and God disposes. तसंच झालं. अकरावीत व्होकेशनल विषयांना प्रवेश न मिळाल्याने परत एकदा दोन वर्षांसाठी जीवशास्त्रच घ्यावं लागलं!

बारावीच्या जीवशास्त्राच्या तोंडी परीक्षेत मी आमच्या परीक्षकांना घेरी आणली होती. परीक्षकांच्या टेबलावर एक उंदीर कापून ठेवला होता. आळीपाळीने ते एकेकाला टेबलापाशी बोलावत आणि प्रश्न विचारत. होता होता माझा नंबर आला. मी आत्मविश्वासाने परीक्षकांच्या टेबलापाशी गेलो. (हा आत्मविश्वास ‘कोणताही प्रश्न विचारा, माझा अभ्यास झालेला आहे’ असा नसून ‘कोणताही प्रश्न विचारा, मला त्याचं उत्तर न येण्याचीच शक्यता  आहे’ असा होता!) सोप्या प्रश्नाने सुरुवात करावी म्हणून त्यांनी विचारलं, ‘हा नर आहे की मादी?’ मी ताडकन उत्तर दिलं, ‘नर’. हिंदी सिनेमात नायकाचं काही बरंवाईट झालं तर नायिका फोडते तसली एक अस्फुट आवाजातली किंकाळी परीक्षकांच्या तोंडून बाहेर पडली. ‘व्हॉऽऽऽऽट?’. तो उंदीर म्हणजे नर नसून मादी होती हे त्या किंकाळीमागचं कारण होतं. बसलेल्या धक्क्यातून सावरून त्यांनी एका अवयवाकडे बोट दाखवून त्याचं नाव विचारलं. माझा आत्मविश्वास अजूनही कायम होता. (आजकाल एकही चित्रपट हिट होत नसतानाही देव आनंदचा कायम आहे तसाच!) मी सांगितलं, ‘फॅलोपियन ट्यूब’! परीक्षकांच्या दोन्ही भुवया उंचावल्या गेल्या. काहीतरी चुकलं आहे याची मला जाणीव झाली आणि मी उत्तर बदललं, ‘युरिनरी ब्लॅडर’. मी दांडपट्टा चालवल्यासारखी उत्तरं देत होतो आणि परीक्षक त्यात जखमी होत होते. ‘युरिनरी ब्लॅडर’ ऐकल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर गोंधळल्याचे आणि आर्जवाचे भाव दिसले. ‘निदान एक तरी उत्तर बरोबर दे’ अशी विनवणी त्यांत दिसत होती. मी आणखी एक दांडपट्टा चालवला. ‘नो सर, इट्स अ‍ॅक्च्युअली युटेरस’. परीक्षकांनी एका हाताने टेबल धरलं. बहुतेक त्यांना भोवळ आली असावी. कारण मला जायला सांगून ते पाणी प्यायला उठले! गंमतीची गोष्ट म्हणजे उंदराचा तो अवयव कोणता होता आणि ‘फॅलोपियन ट्यूब’ आणि ‘युटेरस’ म्हणजे काय हे मला अजूनही माहित नाही!

क्रमशः

Saturday, 30 October 2010

माझी शिक्षणयात्रा - १

शिक्षणाचं आणि माझं पहिल्यापासूनच वाकडं आहे. शिकण्यात मला कधीच रस वाटला नाही. म्हणजे लहानपणी अभ्यास करणे हा दुर्गुण अंगी ठासून भरलेला असल्यामुळे शाळेतल्या हुशार मुलांमध्ये माझी गणना व्हायची. पण तरीही मनापासून अभ्यास कधी केला नाही. अभ्यास करण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यावेळी वर्गातल्या सर्वांत हुशार मुलाला बाकी मुलं आणि शिक्षक खूप भाव द्यायचे. बर्‍याच ठिकाणी कौतुक व्हायचं. आणि शिक्षकांचा लाडका असल्याचे काही महत्त्वाचे फायदे होते. सगळ्यांत महत्त्वाचा फायदा म्हणजे शिक्षा कमी व्हायची. माझ्या अभ्यासात आघाडीवर असण्यामुळे अनेकदा माझी शिक्षा कमी झाली आहे. त्यामुळे लक्ष देऊन अभ्यास करण्यामागे हे एक मोठं इन्सेन्टिव्ह होतं.

वास्तविक दहावीनंतरच माझं तोपर्यंत झालेल्या शिक्षणाने समाधान झालं होतं. मी साक्षर झालो, आता आणखी शिकून पुढे काय करायचं आहे असा एक रास्त विचार माझ्या मनात होता. पुण्यात (किंवा फॉर दॅट मॅटर, मराठीचं अस्तित्त्व शिल्लक असलेल्या कोणत्याही गावात किंवा शहरात) एखादं दुकान काढावं असे विचार मनात होते माझ्या. ‘आपटे आणि सन्स (‘सन्स’ म्हणजे माझ्या आईबाबांचे आम्ही दोघे सन्स. माझं अजून लग्नच झालेलं नसल्याने मला सन्स असण्याचा प्रश्न नाही) किराणा आणि भुसार मालाचे किरकोळ विक्रेते. (‘किरकोळ विक्रेते’ हा शब्द Retailers या अर्थाने वापरण्यात आलेला आहे. ‘’किरकोळ’ हे विक्रेत्यांचं विशेषण म्हणून इथे वापरलेलं नाही हे सूज्ञ वाचकांनी ध्यानात ठेवावं..) आमच्या येथे लक्ष्मी छाप हिंग, दगडफूल, गाय छाप तंबाखू, वैद्य भुसनळे यांच्या जुलाबाच्या गोळ्या व इतर किराणामालाचे साहित्य मिळेल. कृपया सुटे पैसे देणे. उधारी बंद आहे. आमची कोठेही शाखा नाही’ अशी पाटी वाचायला काय मजा आली असती! आणि गिर्‍हाइकांचं आपल्याला टेन्शन नाही. समोरच्या गिर्‍हाईकाला हरभर्‍याच्या झाडावर चढवलं की तो आपला खिसा आपोआप मोकळा करतो. ‘काय काकू, बर्‍याच दिवसांत दिसला नाहीत. कुठे बाहेर गेला होतात की काय? आणि काय हो हे, एवढ्या कशा वाळलात? बरंबिरं नव्हतं का?’ असं विचारलं की काकू खूश! मग भलेही त्या चारही बाजूंनी उसवत चाललेल्या का असोत! आपल्याला काय गिर्‍हाइकं आल्याशी मतलब. त्यावेळी मनात आलेले हे विचार मनातच राहिल्यामुळे इंजिनिअरिंगचे भोग आमच्या नशीबी आले आणि महाराष्ट्र एका उमद्या उद्योगपतीला मुकला. असो. विषयांतर पुरे आता.

शालेय जीवनात माझे हाडवैरी असलेले विषय म्हणजे भूगोल (Geography) आणि जीवशास्त्र! (Biology). या दोन विषयांमुळे माझ्या नीरस आयुष्यात रंग भरले गेले. भूगोल हा प्रकार माझ्या कधीच लक्षात राहायचा नाही. भूगोलातला ‘गोल’ नेहमी माझ्या उत्तरपत्रिकेवर मार्कांच्या रुपाने अवतीर्ण व्हायचा. त्या उत्तरपत्रिकेतल्या माझ्या अचाट विधानांची गोळाबेरीज केली असती एक शोधनिबंध नक्की तयार झाला असता. ‘दार्जिलिंगला नारळाच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि केरळमध्ये चहाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते’ असं एक खळबळजनक विधान एका परीक्षेत करून मी आमच्या बाईंना त्यांनी आजवर शिकलेला (आणि शिकवलेला) भूगोल विसरायला लावला होता! कित्येकदा माझी ही अशी स्फोटक विधानं वाचून परीक्षक बुचकळ्यात पडायचे. माझं भूगोलाचं अगाध ज्ञान मी इतरही ठिकाणी पाजळलं होतं. बी. टी. एस. (Bombay Talent Search) नावाची एक परीक्षा होती. त्यात लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवणार्‍यांचे इंटरव्यू घेतले जायचे. असाच एक इंटरव्यू अस्मादिकांनीही दिला होता. ‘दिल्लीमधून कोणती नदी वाहते?’ या प्रश्नाला ‘कृष्णा’ आणि ‘पुण्यामधून वाहणारी नदी कोणती?’ या प्रश्नाला ‘यमुना’ हे उत्तर दिल्यावर प्रश्नकर्त्याने पराभव मान्य केला होता आणि पडलेल्या चेहर्‍याने आणि खालावलेल्या आवाजात मला जायला सांगितलं होतं!

‘परीक्षेत जास्त मार्क मिळवायचे असतील तर, नकाशांचा सढळ हाताने वापर करावा’ असं एक आचरट वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं! त्यामुळे बर्‍याचशा उत्तरांत नकाशे काढण्याचा ससेमिरा मी स्वतःमागे (आणि मी काढलेला नकाशा समजून घेण्याचा ससेमिरा परीक्षकामागे) लावून घेतला होता. सुरुवातीला नकाशे काढण्याची स्टेन्सिल माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मी हाताने  नकाशे काढायचो. त्यावेळी मी काढलेले भारताचे नकाशे हे अडीनडीला कोणत्याही देशाचे म्हणून सांगता आले असते. बघणार्‍या प्रत्येक माणसाला त्यात वेगळा देश दिसायचा. अगदी चीन, जपान, अमेरिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सर्बिया, अझरबैजान, मेक्सिको अशा कोणत्याही देशाचा नकाशा म्हणून मी काढलेला भारताचा नकाशा चालून जायचा! एवढंच नव्हे तर, मी काढलेला भारत हा थोडा अंटार्क्टिकासारखा दिसतो असंही माझ्या काही मित्रांचं म्हणणं होतं. आणि अशा त्या चहूबाजूंनी प्रवाही असलेल्या भारतात मी राज्यं काढली की बहुतेकांचा ‘परीक्षेत उत्तरं न सुचल्याने मी वेळ घालवण्यासाठी उत्तरपत्रिकेवर रेघोट्या मारत होतो’ असा समज व्हायचा! म्हणजे तसा तो बहुतेकवेळा खराही असायचा, पण तो वेगळा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य गोवा पादाक्रांत करून कर्नाटकात घुसलेलं असायचं. केरळ राज्याचं एक टोक थेट बंगालपर्यंत जायचं. जम्मू-काश्मीर, हरयाणा आणि पंजाब या राज्यांच्या सीमा एकमेकांत मिसळून जायच्या.

नकाशे काढण्यासाठी स्टेन्सिल वापरायला लागल्यापासून भारतमातेची सीमारेखा जरा बरी यायला लागली. म्हणजे हा भारत आहे असं निदान लोक ओळखू तरी लागले. पण तेव्हाही त्या स्टेन्सिलच्या बॉर्डरवरून पेन्सिल फिरवताना ती बर्‍याचदा हलायची आणि भलतीकडेच जायची. त्यामुळे पूर्ण झाल्यावरही माझा भारत चार भागांमध्ये फाळणी झाल्यासारखा दिसायचा. मग ती आतली रचना खोडता खोडता सीमाही कधीकधी पुसली जायची. आता फक्त एवढ्याचसाठी परत स्टेन्सिल कोण लावणार? त्यामुळे मी हातानेच मग ती सीमा जोडायचो आणि भारतमाता परत हतबल दिसू लागायची. नकाशांच्या जोडीला बार चार्ट्‌स नामक प्रकार होता. एखाद्या बाबतीत बर्‍याचश्या राज्यांची एकमेकांशी तुलना करताना हा बार चार्ट कामी यायचा. हे प्रकरणही मला कधीच जमलं नाही. मी बार चार्टच्या नावाखाली वाटेल त्या लांबीरुंदीचे आयत काढायचो. त्यामुळे माझ्या त्या बार चार्ट्‌समध्ये महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा कधी चेरापुंजीपेक्षा जास्त तर कधी राजस्थानपेक्षा कमी असायचा! संपूर्ण भूगोल हा विषय मी असा इंच-इंच लढवत शिकलो आहे.

क्रमशः

Tuesday, 26 October 2010

न्यायमूर्ती राखी


‘राखी का इन्साफ’ पाहिला का हो कोणी? अगदी ‘न भूतो न भविष्यति’ असा कार्यक्रम आहे. 'imagine TV' वर १६ ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा कार्यक्रम ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचं भाग्य ज्या माणसांना लाभलं ती सगळी माणसं म्हणजे थोर पुण्यात्मे आहेत. (इस नाचीझने भी देखा है पहला एपिसोड । लेकिन दुर्भाग्य की बात यह है की हम उस वक्त स्टुडिओमें हाज़िर नहीं थे । प्रत्यक्ष पाहिला असता तर स्वर्गप्राप्ती झाली असती मला. असो. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना...) या कार्यक्रमात परमप्रकाशिता न्यायमूर्ती राखी सावंत या सामान्य लोकांच्या जीवनातील समस्यांचा न्यायनिवाडा करणार आहेत. या थोर आध्यात्मिक कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचा हा वृत्तान्त माझ्या अजाण नजरेतून:

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज कोणा पामराला राखी न्याय देणार (पक्षी: मूळ मुद्दा बाजूला ठेवून असलेला गोंधळ आणखी वाढवणार) आहे हे सांगण्यात आलं. एका बाईला (तिला आपण फिर्यादी बाई म्हणूया.) न्याय हवा होता. तिचं म्हणणं होतं की, तिच्या बहिणींनी तिला तिच्या मुलापासून तोडलं. हे सांगून झाल्यावर अचानक स्वयंपाकघरात भांडी पडल्यासारखा आवाज आला. मी दचकून पाहिलं तर कार्यक्रमाचं शीर्षकगीत सुरू झालं होतं. ‘हर सच और झूठ का फैसला’ या एवढ्या एकाच ओळीपासून बनलेलं हे शीर्षकगीत अगदी युनिक म्हणायला हवं. आता कार्यक्रम सुरू झाला.

रॅम्प वॉक केल्यासारखी (म्हणजे प्रत्येक पावलाला तीनवेळा कंबर हलवत) चालत राखी आली. उपस्थित प्रेक्षकवर्ग ‘राखी, राखी’ असं ओरडत होता. (याचं मूळ मला वाटतं बहुदा राखीने घातलेल्या तंग कपड्यांत असावं!) राखीने बर्‍याच लोकांशी हात मिळवले. दोन-तीन स्त्रियांना आलिंगनही दिलं. (हे दृश्य पाहून उपस्थित पुरुषांनी वास्तविक ‘राखी, राखी’च्या घोषणा वाढवल्या होत्या, पण राखीने काही त्यांना आलिंगन दिलं नाही!) सगळ्यांचं स्वागत करून राखी म्हणाली, ‘टांग खींचनेवाले तो बहुत होते हैं, लेकिन हाथ पकडनेवाले बहुत कम! धोखा देनेवाले तो बहुत होते हैं, पर मौका देनेवाले बहुत कम!’ (वाह! क्या ड्वायलॉक मारा है!) (साधारण तिसरीच्या मुलांचं नाटक जर एखाद्या शाळेने बसवलं, तर ती मुलं जशी प्रत्येक शब्दाला अभिनय करतात तसंच काहीसं चाललं होतं राखीचं ही वाक्य म्हणताना! म्हणजे ‘हाथ पकडनेवाले’ म्हणताना स्वतःचा हात पकडणं वगैरे वगैरे. नशीब, ‘टांग खींचनेवाले’ म्हणताना स्वतःचा पाय नाही ओढला तिने!) तिचं बोलून झाल्यावर स्क्रिप्टप्रमाणे लोकांनी टाळ्या वाजवल्या. (मला वाटतं या लोकांना टाळ्या वाजवण्याचे पैसे दिले असावेत imagine tv ने. ते पैसे पुरते वसूल करून देण्याचा मनसुबा दिसला एकंदरीत प्रेक्षकांचा.)

हे सगळं प्रास्ताविक झाल्यावर ती फिर्यादी बाई एकदाची आली. तिच्यात आणि राखीत झालेला संवाद पुढीलप्रमाणे:
राखी: कोई टेन्शन तो नहीं? एकदम आरामसे बैठिए । बिलकुल खूबसूरत लग रही हैं आप । (आता मध्येच हे कुठून आलं?) कोई टेन्शन लेनेकी जरुरत नहीं, क्यूँकी यह सब लोग अपनेही लोग हैं । (लोकांनी इथे imagine चे पैसे परत वसूल केले... म्हणजे टाळ्या वाजवल्या.) अब आप अपना नाम बताइये।
फिर्यादी बाई: मेरा नाम...
राखी: थोडा ऊँचा बोलिए, ताकि सब सुन सकें।
फि.बा.: (थोडी ओरडून) मेरा नाम ****** है और मैं साहरंगपूर में...
राखी: सारंगपूर या साहरंगपूर? (बाय, जरा तिला बोलू द्या की!)
फि.बा.: साहरंगपूर...
राखी: साहरंगपूर! जी..
फि.बा.: मै अपने बच्चोंको वहाँ पढाती हूँ। मेरा आगेपीछे कोई नही है। मैं...
राखी: आपके हजबण्ड कहाँ हैं? (ही बाय लय त्वांड घालते मदे मदे!)
फि.बा.: हजबण्ड तो नहीं हैं।
राखी: अच्छा हजबण्ड नहीं हैं आपके?
फि.बा.:नहीं।
राखी: अच्छा हजबण्ड नहीं हैं आपके। (आता हे किती वेळा रिपिट करणार बाय??) ओ.. आय अ‍ॅम सो सॉरी. (चला, अखेर बाहेर तर आली या पतिपुराणातून..)
राखी: क्या हुआ उनको? (अजूनही नवराच!)
फि.बा.: जब शूटिंगमें काम...
राखी: शूटिंगमें काम करते थे? (आता ती बाई तेच सांगत होती ना? मग जरा बोलू दे की तिला!)
फि.बा.: शूटिंगमें लाइटिंगमें...
राखी: लाईटमन थे। अच्छा।  (त्या बाईचं एक वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही या बयेने आत्तापर्यंत!)
फि.बा.: एक  दिन उनका फोन आया की, मैं रातको नहीं आऊँगा। और सुबह नासीरभाई का...
राखी: नासीरभाई कौन? (या फिर्यादी बाईचं एखादं वाक्य बोलून पूर्ण झालं तर गावजेवण घालीन म्हणतो मी...)
फि.बा.: नासीरभाई मतलब जिधर वो...
राखी: अच्छा। मतलब जहाँ आपके हजबण्ड काम करते थे।

अशा संवादांतून (म्हणजे फि.बा. च्या तीन शब्दांपुढे राखीची अडीच वाक्य या रेटने चाललेल्या) अखेर त्या बाईचं बोलणं पूर्ण झालं! तिचा नवरा शूटिंगच्या वेळेस वारला होता (राखीच्या शब्दांत ‘त्याचा स्विच ऑफ झाला होता’!) आणि तिला चार लाखांची भरपाई मिळाली होती. मग ती मुलांना घेऊन बँगलोरला गेली.
राखी: क्या कहा आपके माँ-बापनें?
फि.बा.: उन्होनें कहा, ‘मेरी बेटी मेरे लिये क्या लायी? साडी लायी क्या?’
राखी: ऐसा कहा उन्होंने? ऐसा नहीं कहा की, ‘आपके हजबण्ड किधर हैं?’
फि.बा.: ये ऐसा...
राखी: ऐसा नहीं कहा की, ‘घरपे अब साया नहीं रहा’?
फि.बा.: वो तो...
राखी: और ये कहा की, ‘मेरी बेटी साडी लेकर आयी की नहीं?’
फि.बा.: वो लोग...
राखी: ये गलत बात है!
फि.बा.: नहीं लेकिन...
राखी: ये गलत बात है! है ना? (एकूणच त्या बाईला बोलायला द्यायचं नाही असा मनोनिग्रह दिसला राखीचा!)

थोड्या वेळाने फि.बा. ची एक बहीण आली. एक सामुदायिक रडण्याचा कार्यक्रम त्यावेळी चालू होता. बहिणीनेही थोडं रडून या कार्यक्रमातला आपला खारीचा वाटा उचलला. कोण कशासाठी रडतंय तेच न कळल्याने प्रेक्षक मात्र गोंधळात पडले होते. मध्येच फि.बा. रडत होती, मध्येच चवताळून ‘इन्साफ चाहिये’ असं ओरडत होती. (बहुतेक हिला भांग दिली असावी..) मध्येच तिने प्रेक्षकांना उद्देशून एक छोटेखानी भाषणही केलं. भाषणानंतर ती राखीला मिठी मारून रडली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तर झडत होत्याच. मध्येच ‘तीन बच्चोंकी कसम’, ‘कुरान की कसम’ असे शब्द ऐकायला येत होते. प्रेक्षकही मध्ये थोडा गोंगाट करून, टाळ्या वाजवून, घोषणा देऊन आपण अजूनही जागे असल्याची खात्री करून घेत होते. कथेतली पात्रही वाढत होती. मधूनच राखी खास स्वतःच्या शैलीत एखाद्या पात्राशी संवाद साधून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. उदाहरणच द्यायचं झालं तर खालचा संवाद बघा:
राखी: आपका पूरा नाम?
माणूस: नासीर हुसैन शेख
राखी: नासीर (एक मोठा पॉज)
माणूस: (राखीला थांबलेली बघून उरलेला भाग पूर्ण करण्यासाठी) हुसैन शेख
राखी: हुसैन (परत एक मोठा पॉज)
माणूस: (आता हा कंटाळला असावा. चेहर्‍यावर दिसत होतं त्याच्या.) शेख (हुश्श!)

मग आणखी दोन बहिणी आल्या. आता परत युद्ध पेटलं. आता फि.बा., तिच्या बहिणी (आणि अर्थातच राखी) मुंडी कापलेल्या कोंबडीसारखं थैमान घालत होत्या. राखीचे स्पेशल डायलॉग्ज मधून मधून चालू होतेच. ‘आप झूठ पे झूठ, झूठ पे झूठ बोल रही हैं’ (तारीख पे तारीख च्या चालीवर) किंवा ‘बच्चोंका अपना दिल होता है। वो कोरे कागज़ की तरह होते हैं।’ अशी वाक्यं ऐकून कान तृप्त होत होते. मग फि.बा. च्या मुलाची एंट्री झाली. मग पुन्हा रडारड, वितंडवाद, आरडाओरडा हा एक सिक्वेन्स झाला. मग शब्बीर नावाच्या एका प्राण्याची एंट्री झाली. हा म्हणे त्या फि.बा. चा मानलेला भाऊ होता. अचानक राखीला साक्षात्कार झाला की या दोघांमध्ये बहीण-भावाच्या पलिकडचं एक नातं आहे. (राखीला सिद्धी प्राप्त झालेली आहे बहुतेक. कसं काय न सांगता सगळं ओळखते देव जाणे. फि.बा. मिळालेल्या पैशांच्या बाबतीत खोटं बोलतेय आणि तिला ४ लाखांपेक्षा जास्त पैसे मिळालेले आहेत हेही राखीने असंच ओळखलं होतं) तिने त्या दोघांना खोदून खोदून विचारलं आणि मग जाहीर केलं, ‘मैं अब एक ऐसी चीज़ दिखाऊँगी जो मै नहीं दिखाना चाहती थी!’ (प्रेक्षकांमधले पुरुष आता खूश झाले. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ असे भाव काहींच्या चेहर्‍यावर दिसले.)

आता फोकस एका स्क्रीनकडे वळला. फि.बा. आणि शब्बीर यांच्यातलं भावाबहिणीपलिकडलं नातं दाखवण्यात आलं. आता अचानक सगळा जमाव शब्बीरवर तुटून पडला. (‘च्यायला, काय बघण्याची अपेक्षा केली आणि काय बघितलं’ असं फ्रस्ट्रेशन असावं बहुतेक त्यामागे) सिक्युरिटीवाल्यांनी जमावाला दूर केलं. (त्याआधी जमावातल्या प्रत्येकाने निदान एक तरी फटका मारला आहे याची खात्री करून घेतली होती त्यांनी.) मग अचानक प्रेक्षकांपैकी एकीला एक माईक मिळाला. मग तिने शब्बीरला एक लेक्चर दिलं. लेक्चर ऐकताना शब्बीरचा चेहरा मात्र निर्वाणाप्रत पोचल्यासारखा निराकार होता. त्यानंतर प्रेक्षकांमधल्या एका मौलवीने या ‘बहीणभावांचा’ निकाह लावण्याचा उपाय सुचवला. मग राखीने आपलं तत्वज्ञान ऐकवलं. (‘पतीके गुजरने बाद किसी और मर्द के साथ रिश्ता रखना कोई गलत बात नहीं है। लेकिन वो रिश्ता जायज़ होना चाहिए।’) आता न्यायनिवाडा झाला होता. त्यामुळे मग एक-दूसरेके गले लगना यासारखे सोहळे पार पडले. मग फि.बा. ने त्या बाबावर (शब्बीरवर हो..) ‘प्रेमा’चा एवढा वर्षाव केला, की त्यापुढे ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोलीनेही लाजून मान खाली घातली असती. अशा रीतीने एक महान कार्यक्रम पार पडला आणि बघणारा मी धन्य जाहलो.

तर असा होता ‘राखी का इन्साफ’. हा कार्यक्रम पाहिल्यावर महामहोदया राखीदेवींच्या न्यायप्रियतेवर माझा पूर्ण विश्वास बसला आहे. हा कार्यक्रम वेळोवेळी बघून समस्त लोकांनी आपल्या पुण्यकर्मांत भर घालावी हेच माझं कळकळीचं सांगणं.

बोला परमप्रकाशिता महामहोदया नौटंकीसम्राज्ञी अल्पवस्त्रआच्छादिता त्रैलोक्यसुंदरी मिकासिंगचुंबिता स्वस्तुतीविशारदा आद्यस्वयंवरसहभागिनी राखीदेवी सावंत की....

जय!! (इथे कोणाला ‘ऐशी की तैशी’ म्हणावसं वाटलं तरीही मी ‘जय’च म्हणणार! मी माझ्या दैवताचा असा अपमान करणार नाही!)

Friday, 22 October 2010

रजनीकांत फॅक्ट्स

आजकाल रजनीकांतची चलती आहे. त्याचा ‘एंदिरन’ (हिंदीतला ‘रोबॉट’) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक मेल्स, ब्लॉग्ज, लेख आणि इतर बर्‍याच ठिकाणी रजनीकांत काय काय करू शकतो याची जोरदार चर्चा चालू आहे. या चर्चेतलीच ही काही रत्नं:
१. रजनीकांतने एकदा एका घोड्याच्या तोंडावर लाथ मारली. त्या घोड्याचे वंशज आजकाल ‘जिराफ’ म्हणून ओळखले जातात.
२. प्रश्न: रजनीकांत काळा चष्मा का घालतो? उत्तर: सूर्याचं आपल्या डोळ्यांपासून रक्षण व्हावं म्हणून!
३. रजनीकांत ‘रिसायकल बिन’ पण डिलिट करू शकतो.
४. रजनीकांतने एकदा एक बाटलीभर झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. त्यामुळे त्याची एक पापणी लवली.
५. पृथ्वी आधी फिरत नव्हती. रजनीकांतने धावताना तिला मागे ढकललं आणि तेव्हापासून आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरू लागली.
६. जेव्हा रजनीकांत जोर (इंग्रजीमध्ये याला ‘पुशप्स’ म्हणतात) काढत असतो, तेव्हा तो स्वतःला वर उचलत नसतो. तो पृथ्वीला खाली ढकलत असतो.
७. रजनीकांतने अनंतापर्यंत मोजणी केली आहे. आणि तीही दोनवेळा!
८. रजनीकांत जेव्हा पाय हलवतो तेव्हा एक छोटं वादळ तयार होतं. कतरिना चक्रिवादळ रजनीकांतच्या जेवणानंतर केलेल्या शतपावलीमुळे निर्माण झालं होतं.
९. रजनीकांतचं फेसबुकवर ऑर्कुट अकांऊट आहे.
१०. रजनीकांतला Pi (Pi म्हणजे वर्तुळाच्या परीघाचं (Circumference) त्याच्या व्यासाशी (Diameter) असणारं गुणोत्तर (Ratio). Pi मध्ये अनंत अंक आहेत) मधील सगळे अंक ठाऊक आहेत.
११. रजनीकांत एवढ्या वेगात धावू शकतो की, तो पृथ्विप्रदक्षिणा पूर्ण करून स्वतःच्या पाठीवर गुद्दा मारू शकतो.
१२. रजनीकांत जेव्हा जेव्हा आरशात पाहतो तेव्हा तेव्हा आरसा तडकतो, कारण रजनीकांतचं प्रतिबिंब दाखवण्याची आरशाचीही लायकी नाही.
१३. रजनीकांतला जगातल्या सगळ्या भाषा येतात. एवढंच नव्हे, तर तो कुत्र्यांशी कुत्र्यांच्या भाषेत आणि मांजरांशी मांजरांच्या भाषेत बोलू शकतो.
१४. रजनीकांत कॉर्डलेस फोनने तुमचा गळा आवळू शकतो.
१५. रजनीकांत हातावर घड्याळ बांधत नाही, कारण कोणतीही वेळ रजनीकांतच ठरवतो.
१६. रजनीकांतच्या घराला दरवाजे नाहीत, फक्त भिंती आहेत. त्या भिंतींतून तो आरपार जाऊ शकतो.
१७. रजनीकांत शिंकला तेव्हा विश्वाचा जन्म झाला. त्याला आजकाल ‘बिग बँग थिअरी’ म्हटलं जातं.
१८. ‘बर्म्युडा ट्रँगल’ हा आधी त्रिकोण नसून एक चौकोन होता. रजनीकांतने लाथ मारल्यावर त्या चौकोनाचा त्रिकोण झाला.
१९. जेव्हा लिओनार्डो द विंचीने मोनालिसाचं चित्र काढलं होतं तेव्हा मोनालिसाने रजनीकांतकडेच बघून स्मितहास्य केलं होतं.
२०. रजनीकांत बँकेकडून कर्ज घेत नाही; तो बँकेला कर्ज देतो.
२१. आपल्याला भीती वाटल्यावर आपण ‘अरे देवा’ म्हणतो. देवाला भीती वाटल्यावर तो ‘अरे रजनीकांत’ म्हणतो.
२२. बॅटमॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन आणि बाकीचे सगळे सुपरहीरो गुरुपौर्णिमेला रजनीकांतला गुरुदक्षिणा देतात.
२३. रजनीकांत आयपॉडवरून लोकांना फोन करू शकतो.
२४. रजनीकांतचा पराभव करणं फक्त आणि फक्त त्याला स्वतःलाच शक्य आहे. त्याने रचलेले विक्रम फक्त तोच मोडू शकतो.
२५. रजनीकांतचा ईमेल आयडी आहे: gmail@rajnikanth.com
२६. रजनीकांत माशाला पाण्यात बुडवून मारू शकतो.
२७. रजनीकांतने लहान असताना कधीच गादी भिजवली नाही. गादीच त्याला घाबरून स्वतः भिजायची.
२८. रजनीकांतने मॅकडोनाल्ड्समध्ये जाऊन इडली मागितली आणि त्या लोकांनी ती बनवून दिली.
२९. रजनीकांत प्रकाशाच्या वेगाने धावत नाही; प्रकाश रजनीकांतच्या वेगाने धावतो.
३०. रजनीकांत चंद्र आणि मंगळावर जाऊन आला आहे. म्हणूनच तिकडे जीवसृष्टी नाही.
३१. रजनीकांत स्वतःच्या केसाने व्हायोलिन वाजवू शकतो. एवढंच नव्हे, तर तो प्रत्येक केसाने एक वेगळं व्हायोलिन एकाच वेळी वाजवू शकतो.
३२. इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे. रजनीकांतला घाबरूनच ते लोक तिकडे गेले आहेत.
३३. ६० मिनिटांचा कार्यक्रम रजनीकांत २० मिनिटांत बघू शकतो.

आणि सगळ्यांत भन्नाट म्हणजे...

३४. रजनीकांतला कापूसकोंड्याची गोष्ट कधी संपते ते माहित आहे!!!!

टीप: अनेक मेल्स, ब्लॉग्ज आणि इतर अनेक लेखांमध्ये पूर्वोल्लिखित (वा! काय शब्द सापडला आहे!) गोष्टींचे उल्लेख आलेले आहेत. त्यामुळे या गोष्टींचा नेमका स्रोत सांगणं कठीण आहे. त्यामुळे इच्छा असूनही त्यांचे संदर्भ देता येत नाहीयेत. ‘कॉपीराईट प्रोटेक्शन’वाल्यांनी उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी.

Sunday, 17 October 2010

विजयादशमी

विजयादशमी. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. सीमोल्लंघनाचा दिवस. सत्याने असत्यावर विजय मिळवल्याचा दिवस. अश्विन शुद्ध दशमीच्या या दिवशी नवरात्रोत्सवाची सांगता होते. प्रभू श्रीरामचंद्रांनी याचदिवशी रावणावर विजय मिळवला होता. अज्ञातवासात असलेल्या पांडवांनी शमीच्या झाडाच्या ढोलीतून याचदिवशी आपली शस्त्रं बाहेर काढली होती आणि कौरवांचा पराभव केला होता. कौत्साने याच दिवशी अयोध्येतील लोकांना सोनं वाटलं होतं. छत्रपती शिवरायांना याच दिवशी भवानीमातेने तलवार अर्पण केली होती. अशा अनेक कथा विजयादशमीशी संबंधित आहेत. आणि म्हणूनच या दिवसाला एका पूर्ण मुहूर्ताचा मान आहे.

रावणाने सीतेचं अपहरण केल्यावर प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली होती. तेरा दिवस तुंबळ युद्ध चालू होतं. त्या तेरा दिवसांत रावणाचे खंदे वीर एक-एक करून मारले गेले. त्याचे कुटुंबीयही युद्धात कामी आले होते. तेराव्या दिवसापर्यंत तो मुलगा मेघनाद, भाऊ कुंभकर्ण आणि इतर अनेक लोकांना गमावून बसला होता. अखेर अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी रामरावण युद्धात आमनेसामने आले आणि रामचंद्रांनी रावणाच्या पोटातील अमृतकुंभ फोडून त्याचा वध केला. सत्याने असत्याचा, प्रकाशाने अंधाराचा, न्यायाने अन्यायाचा पराभव केला.

चौदा वर्षांचा वनवास भोगल्यावर एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्यासाठी पांडव विराटाघरी राहिले होते. तेव्हा अज्ञातवास सुरू होण्याआधी त्यांनी आपली शस्त्रात्रं विराटनगराबाहेरच्या एका शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली. अज्ञातवास संपत आला असताना कौरवांना पांडव विराट राज्यात असल्याची शंका आली. त्यांनी पांडवांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विराट राज्यावर चढाई केली. तेव्हा अर्जुनाने शमीच्या झाडाच्या ढोलीतून आपलं गांडीव धनुष्य काढून कौरवांचा एकहाती पराभव केला. आणि म्हणूनच दसर्‍याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची प्रथा आहे.

दसर्‍याला आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याच्या प्रथेमागेही एक कथा आहे. देवदत्त ऋषींचे पुत्र कौत्स ऋषी हे महर्षी विश्वामित्रांचे शिष्य होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते विश्वामित्रांकडे गेले आणि त्यांनी विश्वामित्र महर्षींना गुरुदक्षिणा मागण्याची विनंती केली. विश्वामित्रांनी या गोष्टीला नकार दिला. कौत्स हटूनच बसले. शेवटी नाईलाजाने विश्वामित्र म्हणाले, ‘वत्सा, मी तुला चौदा विद्या शिकवल्या. त्या प्रत्येक विद्येसाठी गुरुदक्षिणा म्हणून तू मला एक कोटी सुवर्णमुद्रा दे.’ एवढी गुरुदक्षिणा देणं कौत्सांना शक्य नव्हतं. त्यामुळे ते मदतीची याचना करायला रघुराजाकडे गेले. रघुराजा म्हणाला, ‘मी नुकताच विश्वजीत यज्ञ केला. त्यात केलेल्या दानधर्मामुळे माझ्याकडे आता एवढ्या सुवर्णमुद्रा शिल्लक नाहीत. पण आलेल्या याचकाला परत पाठवण्याचं पातक माझ्या हातून मी घडू देणार नाही. आपण तीन दिवसांनी या. तोपर्यंत मी मुद्रांची व्यवस्था करून ठेवतो.’ कौत्स ऋषी गेल्यावर त्याने सुवर्णमुद्रांसाठी इंद्राला विनंती केली. मुद्रा न दिल्यास युद्धाला तयार राहण्याचा इशाराही दिला. हा इशारा ऐकून इंद्राने कुबेराला अयोध्येवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. इंद्राच्या आज्ञेवरून कुबेराने अयोध्येवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाने त्या सुवर्णमुद्रा कौत्सांना आणि कौत्सांनी त्या मुद्रा विश्वामित्रांना दिल्या. विश्वामित्रांनी त्यातील १४ कोटी मुद्रा घेऊन बाकीच्या कौत्सांना परत केल्या. कौत्स त्या मुद्रा घेऊन रघुराजाकडे परत गेले, पण रघुराजाने दिलेलं दान परत घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या उरलेल्या मुद्रा कौत्सांनी आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना त्या घ्यायला सांगितलं. तेव्हापासून आपट्याच्या झाडाची पानं सोनं म्हणून वाटण्याची पद्धत आहे.

अश्या या शुभदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या विजयादशमीच्या दिवशी आपण सर्वांनी अपयशाचं सीमोल्लंघन करून यशाकडे वाटचाल करावी हीच माझी मनोकामना... :-)

Thursday, 14 October 2010

सुखसंवाद - २

सुखसंवाद - १


सौ: अहो, ऐकलं का?
श्री: बोला. (स्वगत: या घरात ऐकणारा फक्त मी आहे, हे तुला अजून माहित नाही का? तू बोलतेस आणि मी ऐकतो! आणि तसंही माझी हिंमत आहे का तुझ्याकडे दुर्लक्ष करण्याची?)
सौ: तुमची आंघोळ झाली का?
श्री: नाही अजून. आज रविवार आहे गं.
सौ: आधी आंघोळ करा बघू!
श्री: का? (स्वगत: काय वैताग आहे! जरा पेपर वाचू देत नाही!) आणि तसंही मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी उठलोय.
सौ: तर तर! ११ वाजले आहेत, काही कल्पना आहे का? नुसते झोपून राहता तंगड्या वर करून उशिरापर्यंत!
श्री: करतो. (स्वगत: साहजिक आहे उशिरापर्यंत झोपणं! तुझ्या घोरण्यामुळे रात्री झोप लागत नाही ना!रात्रभर एखाद्या ड्रिलिंग मशीनशेजारी झोपलोय असं वाटत राहतं मला! त्यामुळे तू उठल्यावरच जरा डोळा लागतो माझा.)
सौ: लवकर! आज तरी निदान आटपा लवकर! वटपौर्णिमा आहे आज.
श्री: मग तू जाणार नाहीस वाटतं वडाची पूजा करायला?
सौ: जाऊन आलेही. तुम्ही जागे असलात तर कळणार ना तुम्हाला! एवढी नवीन साडी नेसले आज, त्याचं जरा म्हणून कौतुक नाही! आणि त्या शेजारच्या मिसेस वाघमारेंना मात्र परवा म्हणालात, ‘क्याय वाघमारेबाई, नवीन शाडी व्याटतं’. तीन वर्षांपासून आहे ती साडी त्यांच्याकडे! हुं!!!
श्री: (स्वगत: ही साडी नवीन आहे? दुकानदाराने तुला चांगलंच बनवलेलं दिसतंय. आणि कौतुक करण्यासाठी मुळात काही चांगलं असावं लागतं!) अगं, पण मला काय माहित ती साडी त्यांच्याकडे तीन वर्षांपासून आहे ते?
सौ: हो! तुमचं मुळी कुठे लक्षच नसतं!
श्री: (स्वगत: कमाल आहे! आता मी काय ती बाई कुठली साडी नेसते याची नोंद ठेवू काय? आता मी त्या वाघमारेबाईकडे लक्ष दिलं नाही तर म्हणतेस, ‘माझं लक्ष नसतं’ आणि जर मी लक्ष ठेवलं असतं तर म्हणाली असतीस, ‘या वयात शोभत नाही तुम्हाला!’) चुकलंच माझं! लक्ष देऊन पाहायला हवं होतं नाही मी वाघमारेबाईंकडे? तशा दिसायला चांगल्या आहेत त्या! (स्वगत: तुझ्याशी सरळ बोलण्यात पॉइंटच नाही! तुझ्याशी तुझ्याच भाषेत बोलायला हवं!)

Thursday, 7 October 2010

सुखसंवाद - १

रसिकहो, रंगदेवतेला अभिवादन करून आज आम्ही आपणांपुढे सादर करत आहोत एक छोटी एकांकिका ‘सुखसंवाद’! हा सुखसंवाद पतीपत्नींमधला आहे जो घराघरात ऐकायला मिळतो. अगदी शब्द सारखे नसले तरीही मथितार्थ हाच असतो. तर आजच्या या सुखसंवादामधले कलाकार आहेत मिलिंद मिशीकापे आणि निहारिका सोनटक्के. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य: अजित झाडमुटे. चला तर मग बघूया ‘अनन्वय’ निर्मित लघुएकांकिका ‘सुखसंवाद’

एक मध्यमवर्गीय घर. स्वयंपाकघर, हॉल आणि एक बेडरूम. (यांच्या जागा कुठेही असल्या तरीही चालतील! मध्यमवर्गीयांकडे तसंही कोण निरखून पाहणार आहे?) एक पंचेचाळीशीच्या सुमाराची स्थूल बाई गाणी ऐकत आहे. अचानक दारावरची बेल वाजते. या बाईंचा नवरा वाटावा असा एक गृहस्थ आत येतो.

सौ: कुठे गेला होतात?
श्री: मसणात!
सौ: कशाला?
श्री: अरेच्चा! माणूस मसणात एक तर स्वतः तरी पोचतो किंवा दुसर्‍याला पोचवायला तरी जातो! पण ज्याअर्थी तू तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मिरवत झाशीच्या राणीसारखी (स्वगत: कसली डोंबलाची झाशीची राणी! हिडिंबा आहे नुसती!) माझ्यासमोर उभी आहेस त्याअर्थी मी दुसर्‍या कोणालातरी पोचवायला गेलो होतो हे उघड आहे. आपल्या गल्लीच्या टोकाशी राहणारे देवल गेले आज. त्यांना पोचवायला गेलो होतो. असो. पाणी काढ आंघोळीला.
सौ: स्वतःच घ्या! मी मेंदी लावली आहे हातांना.
श्री: (स्वगत: आता या वयात हातांना मेंदी, केसांना कलप किंवा चेहर्‍याला रूज लावलास तरीही कोण बघणार आहे तुझ्याकडे? आणि तसंही अशा बाह्य उपायांनी फरक पडण्यासाठी मुळात सौंदर्य असावं लागतं! आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार?) का? लग्न आहे की काय कोणाकडे?

उशीर

‘हार्दिक अभिनंदन अभय. तू केलेलं प्रेझेंटेशन आपल्या क्लायंटला आवडलं. त्यांनी हे प्रोजेक्ट आपल्या कंपनीला दिलंय.’, बॉसचे हे शब्द ऐकल्यावर अभयचा आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. त्याची खूप दिवसांची मेहनत सार्थ झाली होती. रात्ररात्र जागून केलेल्या कामाचं अखेर त्याला फळ मिळालं होतं. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ अशी त्याची अवस्था झाली होती. त्याच्या डोळ्यांसमोरून आत्तापर्यंत घडलेल्या घटना तरळून गेल्या. प्रेझेंटेशनसाठी केलेली मेहनत, रात्ररात्र केलेली जागरणं, सुट्टीच्या दिवशीही केलेलं काम, या कंपनीत कामाला लागण्याआधी असलेले हलाखीचे दिवस, नोकरी मिळवण्यासाठी केलेली धडपड, मुंबईत नुकताच आलेला असताना जागा मिळवण्यासाठी केलेली वणवण, रागारागात गावचं घर सोडलं तो दिवस, आईबाबांशी झालेलं भांडण... सारं सारं अगदी आत्ताच घडून गेल्यासारखं स्पष्ट दिसलं त्याला.

अभय लहानपणापासूनच तसा वांड होता. अभ्यासात त्याचं कधीच लक्ष नसे.खोड्या काढण्यात आणि टगेगिरी करण्यात तो नेहमीच पुढे असायचा. घरच्यांनी हजार वेळा टोचलं म्हणून जेमतेम ग्रॅज्युएट झाला होता तो. पण तरीही नोकरी करण्यापेक्षा घरून पैसे मागून ते बाहेर जाऊन उधळायचे असाच त्याचा स्वभाव होता. अशा स्वभावामुळे घरी सातत्याने वाद व्हायचे. अशाच एका वादाच्या वेळी अभयने रागाच्या भरात घर सोडलं आणि कोणालाही काही न सांगता तो सरळ मुंबईला मित्राकडे निघून आला. आठवडाभर राहू दिल्यावर मित्रानेही परवडत नसल्याचं कारण सांगून अभयला घराबाहेर काढलं. घरच्या सुरक्षित जगाची सवय असलेल्या अभयला प्रथमच बाहेरच्या जगातील प्रॅक्टिकॅलिटीची जाणीव झाली. मग सुरू झाली जागा मिळवण्यासाठीची वणवण! खिशात पैसे नव्हते आणि मुंबईत टिकायचं तर होतं. सुरुवातीचे काही दिवस तर त्याला प्लॅटफॉर्मवर झोपून काढावे लागले! नोकरीसाठी भटकताना अखेर त्याला सध्याच्या अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण निदान थोडे तरी पैसे मिळत होते. सुरुवातीच्या दिवसांएवढी वाईट अवस्था नव्हती. एकदा नोकरी मिळल्यावर स्वतःच्या कल्पकतेच्या जोरावर तो प्रगतीच्या पायर्‍या चढत गेला.

‘आणि यामागे निःसंशय तुझी मेहनत आहे. प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी तू रात्रंदिवस झटलास. वीकेंडलाही काम केलंस. प्रेझेंटेशन चांगलं व्हावं यासाठी एक्स्टेन्सिव्ह रिसर्च केलास. मला तुझी मेहनत दिसत होती, पण त्या मेहनतीच्या बदल्यात मी तुझा पगार वाढवू शकत नव्हतो. कंपनीकडे पैसाच नव्हता ना. ८ जणांना लेऑफ केलं तेव्हा त्या यादीत तुझंही नाव होतं, पण माझा तुझ्यावर विश्वास होता. म्हणूनच आपल्या प्रेसिडेंटशी बोलून मी तुझं नाव त्या यादीतून वगळलं होतं. पण आता हे एवढं मोठं प्रोजेक्ट आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे पैशाची काहीही फिकीर नाही. तुझ्याचमुळे ही अ‍ॅड कंपनीला मिळालेली आहे. म्हणून आजपासून तू या प्रोजेक्टचा मॅनेजर आहेस. तुझा पगारही वाढवण्यात येत आहे.’, बॉस बोलतच होता. अभयचं त्याकडे लक्ष नव्हतं. त्याला चुकल्याचुकल्यासारखं, काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं.

हल्ली हे असं उदास वाटण्याचं, काहीतरी हरवल्यासारखं वाटण्याचं त्याचं प्रमाण वाढलं होतं. त्याने घर सोडल्याला सहा वर्षं उलटून गेली होती. या सहा वर्षांत त्याला आईबाबांची आठवण खूप वेळा आली होती. त्यांच्याशी संपर्क साधावा असंही खूप वेळा वाटलं होतं. पण त्याचा दुखावलेला अहंकार त्याला तसं करू देत नव्हता. नाही म्हणायला त्याने एकदा आपल्या मित्राला फोन करून आपला ठावठिकाणा सांगितला होता. निदान कोणालातरी आपण कुठे आहोत हे माहित असावं या भावनेने. पण ‘आईबाबांना यातलं काही सांगायचं नाही’ या अटीवरच त्याने मित्राला आपला पत्ता आणि फोन नंबर सांगितला होता. पण हल्ली त्याला घराची आठवण वारंवार यायला लागली होती. ‘आपलं थोडं चुकलंच. थोडं बोलले म्हणून एवढं काय मनाला लावून घ्यायचं! आणि आपल्या भल्यासाठीच तर बोलले होते. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काही नव्हता त्यात’, असे विचार आजकाल त्याच्या मनात रुंजी घालू लागले होते.

आजही घरी जाताना त्याला तसंच वाटत होतं. वास्तविक एवढं मोठं प्रोजेक्ट आज मिळालं होतं. त्याच्या मेहनतीला फळ आलं होतं. आज वास्तविक आनंदाचा दिवस, यश साजरं करण्याचा दिवस. पण अशावेळी आनंद होण्याऐवजी घराची आठवण त्याला तीव्रतेने येऊ लागली होती. ‘आजचं हे यश ऐकून आईला किती आनंद होईल. तसाही आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनी तिला किती आनंद व्हायचा! शाळेच्या क्रीडास्पर्धांत धावण्याच्या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाचं तिला काय कौतुक वाटलं होतं. त्यादिवशी खास आपल्याला आवडतो म्हणून तिने गोडाचा शिरा केला होता. बाबांनीही कौतुकाने पाठ थोपटली होती. आज आपला मुलगा एवढा मोठा झाला आहे, एवढे पैसे मिळवतो हे ऐकून दोघांना काय आनंद होईल.’ अभयच्या डोळ्यांत पाणी तरळलं. घरी पोचेपर्यंत त्याने गावाला जाण्याचं नक्की केलं होतं. त्याने ठरवलं, ‘उद्याच निघूया आपण. बॉसला सांगून आठवडाभराची सुटी नक्कीच मिळवता ये‍ईल. तसंही तो आपल्यावर खूश आहे. आपण गावाला जाऊ आणि आईबाबांची माफी मागू. ते नक्की माफ करतील आपल्याला. त्यांना इकडेच घेऊन येऊ. आणि मग सगळे एकत्र राहू’

घराचं दार उघडताना शेजारच्या थोरात काकूंनी अभयला त्याच्या नावाची तार दिली. अभय घरी नसल्यामुळे त्यांनीच सही करून ती घेतली होती. तार उघडताना त्यावर आपल्या गावाचं नाव पाहून अभयच्या काळजात धस्स झालं. थरथरत्या हाताने त्याने ती तार उघडली. तारेत मजकूर होता, ‘मदर फादर डाईड इन अ‍ॅक्सिडन्ट. लीव्ह इमिजिएटली’. जगातली सारी दुःखं आपल्यावर येऊन आदळत आहेत असं त्याला वाटलं. त्याला आईबाबांशी बोलायचं होतं, त्यांना स्वतःच्या यशाबद्दल सांगायचं होतं, त्यांची माफी मागायची होती, त्यांच्याशी खूप खूप गप्पा मारायच्या होत्या... पण फार उशीर झाला होता...

Wednesday, 6 October 2010

अविस्मरणीय

व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
अविस्मरणीय, थरारक, लक्षवेधक... भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिल्या कसोटी सामन्याचं वर्णन करायला शब्द कमी पडतील. हा सामना बघताना एखादा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बघत असल्यासारखं वाटत होतं मला. एवढी अटीतटीने लढली गेलेली ही मॅच अखेर भारताने जिंकली, तेव्हा मी सुटकेचा निःश्वास टाकला. मीच काय, नक्कीच त्यावेळी अनेक कोटी लोकांचा जीव एकाच वेळी भांड्यात पडला असणार. शेवटच्या बॉलपर्यंत कोण जिंकणार ते नक्की नव्हतं. (जसं अन्नू मलिकने किती गाण्यांच्या चाली चोरल्या आहेत ते नक्की नाही किंवा अजमल कसाबला कधी शिक्षा होणार ते नक्की नाही तसंच) अखेर नशीबाने भारताला साथ दिली आणि विजयश्रीने आपल्या गळ्यात माळ घातली.

१२४ धावांवर ८ विकेट्स अशा परिस्थितीत कोणीही भारत जिंकेल हे मान्य केलं नसतं. पण त्यावेळी दुखर्‍या पाठीचा त्रास सहन करूनही ऑस्ट्रेलियाशी झुंजणार्‍या लक्ष्मणच्या साथीला इशांत शर्मा आला आणि ८१ रन्सची भागीदारी करत १ अब्ज लोकांच्या आशा त्याने पुन्हा पल्लवित केल्या. इशांत शर्मा आऊट झाल्यावर (वास्तविक तो आऊट नव्हता हे टीव्ही रिप्लेमध्ये दिसत होतं. त्यामुळे याक्षणी पंच इयान गोल्ड यांना एवढ्या शिव्या मिळाल्या असाव्यात की, जर पूर्वीसारखी दिलेले शाप खरे होण्याची शक्ती आजकालच्या लोकांमध्ये असती तर त्यांचं जळून भस्मच झालं असतं!) अपेक्षाभंग होण्याचीच शक्यता दिसत होती, पण यावेळी दैव भारताच्या मदतीला धावून आलं. एकदा नव्हे तर तीनवेळा दैवाने आपल्याला मदत केली. हिलफेनहाऊसच्या ओव्हरमध्ये सुरेश रैना धावला, पण ओझा धावला नाही. पण नशीबाने अखेर दोघेही आपापल्या क्रीझमध्ये सुखरूप पोचले. पुढच्या जॉन्सनच्या ओव्हरमध्ये गोल्ड यांच्या चुकीचं प्रायश्चित्त बिली बाउडेन यांना घ्यावसं वाटल्याने त्यांनी ओझाला आऊट दिलं नाही. वास्तविक त्यावेळी त्याचा पाय सरळसरळ स्टंपच्या समोर होता, पण बॉल त्याच्या बॅटला लागून त्याच्या पायावर आदळला असं पंच बाउडेन यांना वाटलं. तरीही ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्याची संधी होती, कारण ओझा अजूनही क्रीझच्या बाहेरच घुटमळत होता! पण यावेळी नशीब भारतावर खूपच मेहेरबान होतं. स्टिव्हन स्मिथने केलेला थ्रो स्टंप्सना तर लागला नाहीच, पण त्याला अडवायला कोणी नसल्याने थेट सीमारेषेपलिकडे गेला! जाता जाता चार धावांचं दान भारताच्या पदरात घालून गेला. पुढच्या बॉलला दोन लेगबाय रन्स घऊन भारताने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Tuesday, 5 October 2010

श्रीगणेशा

मराठी ब्लॉग्ज वाचायला सुरुवात केली तेव्हा आपणही लिहावं असं मनात होतंच. (‘लग्न पाहावं करून’ च्या चालीवर ‘ब्लॉग पाहावा लिहून’) बर्‍याच ब्लॉग्जवर प्रतिक्रियांचा पाऊस पडायचा. ब्लॉगला भेट देणार्‍यांची संख्या हजारांत जायची. तेव्हा वाटायचं, ‘आपणही असा एखादा ब्लॉग लिहावा आणि तो अनेक लोकांनी वाचावा. अनेक लोकांना तो आवडावा.’ पण लिहायचं काय हा प्रश्न होताच. याआधी कधीही कोणत्याही प्रकारचं लेखन केलेलं नाही. त्यामुळे एकाच विषयावर सलग आणि मुख्य म्हणजे मुद्देसूद असे तीन-चार परिच्छेद लिहायचे म्हणजे तसं कठीणच काम होतं माझ्यासाठी. (आता वास्तविक या मुद्द्यात फारसा दम नाही. लग्न करताना लोक असं कुठे म्हणतात की, ‘याआधी कधीही लग्न केलेलं नाही. कसं झेपायचं मला लग्न?’ आणि असं म्हणाले तरीही लग्न तर करतातच की!) आणि सुचलं तरी नित्यनियमाने लिहायला वेळ मिळेल काय हा एक प्रश्न होताच.


पण आज काय झालं कोण जाणे, अचानक ब्लॉग सुरू केला. (मगाशी सांगितलं ना. ‘कसं झेपायचं लग्न?’ असं म्हणूनही लग्न केलं जातं. त्याच चालीवर ‘कसं झेपायचं लेखन?’ असं म्हणून मी ब्लॉग चालू केला.) ही माझी पहिली पोस्ट. ‘लिहायचं काय?’, ‘वेळ मिळेल का?’ हे आधी असणारे प्रश्न अजूनही आहेत. पण तरीही आज श्रीगणेशा झाला हेही नसे थोडके. आपलाही ब्लॉग असावा ही इच्छा तर पूर्ण झाली. आता तो ब्लॉग बर्‍याच लोकांनी वाचावा आणि त्यांना तो आवडावा ही इच्छा पूर्ण होते का बघू. आता प्रयत्न करेन नियमितपणे आणि विविध विषयांवर लिहिण्याचा. अर्थात माझं लिखाण चांगलं की वाईट हे येणारा काळ आणि ब्लॉगला भेट देणारे वाचक (जर कोणी असले तर! सध्या तरी या माझ्या पोस्टचा मी एकुलता एक वाचक आहे.) ठरवतील.


आता थोडं ब्लॉगच्या नावाबद्दल. ब्लॉग चालू करताना कोणत्या विषयावर लिहायचं ते नक्की नव्हतं. सुचेल तसं आणि सुचेल त्या विषयावर लिहायचं एवढंच ठरवलं होतं. त्यामुळे कोणत्याही विषयाचं बंधन नसलेल्या या ब्लॉगसाठी ‘स्वच्छंदी’ हेच नाव योग्य वाटलं मला. आणि म्हणूनच चित्रही गरुडाचं आहे. भेदक नजरेचा हा पक्षिराज म्हणजे अत्यंत मनस्वी पक्षी. स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारा. कोणत्याही बंधनात न अडकणारा. आणि म्हणूनच ‘स्वच्छंदी’ या नावाला साजेश्या चित्राची शोधाशोध करताना सगळ्यांत आधी गरुडाचीच छबी माझ्या डोळ्यांसमोर आली. असो. ही माझी पहिली पोस्ट. आता बघूया, आणखी किती लिखाण जमतंय ते.....