मधुरिमा कुळकर्णी १ - मीही एकदा पडलो प्रेमात
कुळकर्ण्यांची मधुरिमा मला, बाजारात ज्यादिवशी भेटली
जगात देव आहे याची खात्री, मला त्यादिवशी पटली
गोड, नाजूक मधुरिमा तेव्हा, एक हत्तीण झाली होती
ऐश्वर्या जाऊन तिच्या जागी, जयललिता आली होती
ही कॉलेजात क्वीन होती, यावर नव्हता विश्वास बसत
उभी होती दोन मुलांना, हातात धरून हसत हसत
पाचशे लिटरची टाकीसुद्धा, हिच्यासमोर होती लहान
तिला पूर्ण पाहण्यासाठी, मी दोनदा फिरवली मान
रमेशची मात्र उलटी स्थिती, दैव त्याचे फिरले होते
काळे घनदाट केस जाऊन, टक्कल मात्र उरले होते
आपण दिसतो हृतिकसारखे, असा त्याला होता माज
हृतिक कसला रमेश तर, केष्टो मुखर्जी होता आज
मला म्हणाला, ’वेळ काढून, एकदा ये घरी कधी
हिच्यासमोर तोंड उघडायची, तेवढीच मला एक संधी’
त्याला बरं वाटेल म्हणून, गेलो एकदा त्याच्या घरी
मुलांसह मधुरिमा, गेली होती तिच्या माहेरी
ती माहेरी गेली म्हणून, रमेश होता भलताच खुशीत
मध्येच गाणी म्हणत होता, हसत होता मिशीतल्या मिशीत
मला म्हणाला, ’तुला सांगतो, माझ्या जीवनाची कहाणी
घरात आहे मी नोकर, ती मात्र आहे महाराणी
दिवसभर झोपा काढते, काम काही करत नाही
मला छळण्यासाठी तिला, जन्मदेखील पुरत नाही
सकाळी उठते दहा वाजता, नंतर लगेच हवा चहा
ब्रेकफास्टला हवी तिला, अंडी उकडून नऊ-दहा
तीही द्यायची नवर्याने, ही फक्त सोडते ऑर्डर
आज्ञापालन झालं नाही, तर करेल माझा मर्डर
बारा ब्रेड आणि बटर, अंड्यांसोबत लागतात तिला
तिचा आहार बघून बघून, रोज चक्कर येते मला
जेवणाचीही हीच तर्हा, पोळ्या खाते किमान आठ
दीड किलो भात सोबत, वर हवी साय दाट
एवढी सुजली आहे तरी, खात असते उठता बसता
बकासुरही हिच्यासमोर, झुरळासारखा दिसला असता
दिवसभर काम करून, मोडून जाते माझी पाठ
हिचा मात्र बसल्या जागी, कायम असतो थाटमाट
केर काढा लादी पुसा, भांडी घासा धुणी धुवा
असं नशीब शत्रूलाही, कधी देऊ नकोस देवा
एवढं करूनही मला, माझ्या घरात स्थान नाही
नोकरमंडळींना असतो, तेवढासुद्धा मान नाही
वटपौर्णिमेला हिने, माझ्यासाठी उपास केला
उपास म्हणजे दिवसभरात, खाल्लं फक्त पाच वेळा
त्या दिवशी माझी कैद, निश्चित झाली सात जन्मांची
’हा जन्म लास्ट असू दे’, मी प्रार्थना केली देवाची,
’पुढल्या जन्मी मला देवा, गाढव किंवा कुत्रा कर
पण अशी बायको नको, हाच आता दे वर’
आकार तिचा एवढा मोठा, हत्तिणीसारखी चाल
लाँड्रीवाला भैयासुद्धा, येऊन मला म्हणाला काल,
’साब, मॅडमके कपडोंको, आजसे आपही इस्त्री करना
नहीं तो इस्त्री करनेका, सौ रुपिया ज्यादा भरना’
तिला माहित एकच गोष्ट, सदासर्वकाळ खात राहणं
मी मात्र जगतो आहे, अपमानास्पद गुलामाचं जिणं’
रमेशची ही कैफियत, ऐकून आलं डोळ्यांत पाणी
थँक्यू देवा मधुरिमा, झाली नाही माझी राणी
नकार तिचा ऐकून तेव्हा, दोष दिला होता तुला
आता पटतंय एका मोठ्या, संकटातून तारलंस मला....