Sunday 31 October, 2010

माझी शिक्षणयात्रा - २

माझी शिक्षणयात्रा - १

चित्रकला हाही माझ्या शत्रुपक्षातला एक विषय. सर वर्गात आल्यावर नेहमी एक यादी वाचून दाखवायचे. पेन्सिल, रंग, पट्टी, खोडरबर वगैरे वगैरे. त्या यादीतली एखादी गोष्ट आम्ही आणली नसेल तर आम्हाला वर्गाबाहेर काढायचे. काही काळानंतर आम्ही सरांनी बाहेर जायला सांगण्याची अपेक्षा ठेवणं बंद केलं. यादी वाचताना प्रत्येक गोष्टीचं नाव घेतल्यावर काही मुलं स्वतःहून बाहेर पडू लागली. माझ्याकडे नेहमी कुठलीतरी गोष्ट मिसिंग असायची. त्यामुळे मी चित्रकलेत लहानपणापासूनच एक Out-standing विद्यार्थी होतो! एकदा तर ७८ मुलांपैकी ७५ मुलं वर्गाच्या बाहेर होती! मी अर्थातच त्यात होतो. बाहेर काढल्यावर आम्ही इतर कुठे उंडारायला न जाता वर्गाबाहेरच रांग लावली. आमची ही भलीमोठी रांग थेट मुख्याध्यापिका बाईंच्या ऑफिसपर्यंत पोचली होती. आमचा गलका ऐकून त्या घाबरून बाहेर आल्या आणि एवढी मोठी रांग बघून चक्रावल्या. मग खरी कहाणी ऐकल्यावर आम्हाला एक मोठं लेक्चर दिलं त्यांनी आणि चित्रकलेच्या सरांना सांगून आम्हाला आत घ्यायला सांगितलं.

चित्रकलेत आम्हाला ‘स्केचबुक’ नावाचा एक प्रकार होता. ही एक दोनशे पानांची वही असायची ज्यात आम्ही दर दिवशी एक चित्र काढणं अपेक्षित होतं. आता दर दिवशी आवर्जून एक चित्र काढावं एवढं काही माझं चित्रकलेवर प्रेम नव्हतं. बर्‍याचदा तर ती वही वर्ष संपेपर्यंत विकतही घेतलेली नसायची. मग शेवटच्या काही आठवड्यांत सर वही तपासायला सुरुवात करायचे. आणि प्रत्येक अपूर्ण असलेल्या चित्रासाठी हातावर एक फटका मारायचे. मग वही विकत घेतली जायची. आता काही आठवड्यांतच दोनशे चित्र कशी काढणार? मग माझ्या अफाट चित्रप्रतिभेला बहर यायचा. दोन उभ्या सरळ रेषा आणि त्यांच्यामध्ये पुष्कळशा आडव्या रेषा (शिडी), दोन आडव्या रेषा आणि त्यांच्यामध्ये बर्‍याचश्या उभ्या रेषा (तिरडी), एक वर्तुळ आणि त्यामध्ये दोन उभ्या सरळ रेषा (क्रिकेटचा बॉल) अशी चित्र काढायचो मी! आणि त्याखाली काढलेलं चित्र समजायला सोपं जावं म्हणून त्या चित्राचं नावही लिहायचो. एक आठवड्यात वही भरायची! (साहजिक आहे. नुसती वर्तुळं आणि सरळ रेषा काढायला कितीसा वेळ लागणार?) प्रत्येक चित्रागणिक सरांच्या रागाचा पारा एक अंशाने वर चढायचा. आणि मग ती वही पूर्ण असूनही मी मार खायचो!

जीवशास्त्राचंही माझ्याशी असंच विशेष जिव्हाळ्याचं नातं होतं. भूगोलापेक्षाही जास्त प्रेम मी जीवशास्त्रावर केलं आहे. आणि त्यातून मी पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेला असल्यामुळे मराठीत असलेल्या त्या जीवशास्त्रीय शब्दांनी हे स्नेहसंबंध वाढवण्याचं काम मोठ्या मेहनतीने पार पाडलं होतं. मी भुताला कधी घाबरलो नाही एवढा त्या शब्दांना घाबरलो आहे! जीवशास्त्राचं ते पुस्तक वाचताना बर्‍याचदा आपण पाली किंवा अर्धमागधी भाषेतलं एखादं पुस्तक वाचत आहोत असा भास व्हायचा. ‘Cerebrospinal Fluid’ साठी असलेला ‘प्रमस्तिष्कमध्यमेरु तरलद्रव’ हा शब्द पाठ होईपर्यंत माझी नववी संपली होती! (ही मस्करी नव्हे. खरंच असं झालं होतं. हा शब्द तिमाही आणि सहामाहीमध्ये मी केवळ लक्षात नसल्याने लिहिण्याचं टाळलं होतं आणि पाठ करून तो शब्द वार्षिक परीक्षेत लिहिला होता. अर्थात त्या शब्दाचा आणि वार्षिक परीक्षेचा काही संबंध नव्हता. कारण, सहामाहीचा आणि वार्षिक परीक्षेचा सिलॅबसच वेगळा होता! पण तरीही मी हा शब्द काहीतरी निमित्त काढून कुठल्यातरी उत्तरात घुसवला होता.) ‘तेलनिमज्जनवस्तुभिंग’ हा असाच एक भारदस्त शब्द. मला हा शब्द म्हणताना हनुमान चलिसा किंवा रामरक्षा म्हटल्यासारखं वाटायचं. बरं, हे प्रकरण नुसतं एवढ्यावरच थांबायचं नाही. एकाच गोष्टीला वेगळ्या इयत्तांमध्ये वेगळे शब्द असायचे! म्हणजे शब्द पाठ होईपर्यंत वर्ष संपायचं आणि वर्षाअखेरीस त्या पाठांतराचा उपयोग शून्य! कारण, नवीन शब्द यायचे. Arteries आणि Veins ना एका वर्षी आम्ही ‘धमन्या’ आणि ‘शिरा’ म्हणायचो तर दुसर्‍या वर्षी ‘रोहिणी’ आणि ‘नीला’! Auricle आणि Ventricle हे हृदयाचे कप्पे एका वर्षी ‘अलिंद’ आणि ‘नीलय’ होते तर पुढच्या वर्षी ‘जवनिका’ आणि ‘कर्णिका’! काही वाक्यंही अशीच गूढ असायची. अशी वाक्यं समजून घेण्यापेक्षा ती पाठ करून परीक्षेत जशीच्या तशी लिहिणं जास्त सोपं होतं. ‘ग्रसनीस कल्ला व विदरे नसतात’ हे असंच एक वाक्य! शाळा सोडून दहा वर्षं झाली तरीही या वाक्यातले मला आत्तापर्यंत कळलेले शब्द दोनच आहेत: ‘व’ आणि ‘नसतात’! एकूणच काय, मराठी जीवशास्त्रातला एखादा शब्द जरी एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यात शिरला तर पुस्तक छापणार्‍याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद त्यावेळी घटनेत असावी बहुतेक! अशा वातावरणात वाढल्यामुळे मी दहावीनंतर जीवशास्त्राला कायमचा रामराम करण्याचं ठरवलं होतं. पण म्हणतात ना, Man proposes and God disposes. तसंच झालं. अकरावीत व्होकेशनल विषयांना प्रवेश न मिळाल्याने परत एकदा दोन वर्षांसाठी जीवशास्त्रच घ्यावं लागलं!

बारावीच्या जीवशास्त्राच्या तोंडी परीक्षेत मी आमच्या परीक्षकांना घेरी आणली होती. परीक्षकांच्या टेबलावर एक उंदीर कापून ठेवला होता. आळीपाळीने ते एकेकाला टेबलापाशी बोलावत आणि प्रश्न विचारत. होता होता माझा नंबर आला. मी आत्मविश्वासाने परीक्षकांच्या टेबलापाशी गेलो. (हा आत्मविश्वास ‘कोणताही प्रश्न विचारा, माझा अभ्यास झालेला आहे’ असा नसून ‘कोणताही प्रश्न विचारा, मला त्याचं उत्तर न येण्याचीच शक्यता  आहे’ असा होता!) सोप्या प्रश्नाने सुरुवात करावी म्हणून त्यांनी विचारलं, ‘हा नर आहे की मादी?’ मी ताडकन उत्तर दिलं, ‘नर’. हिंदी सिनेमात नायकाचं काही बरंवाईट झालं तर नायिका फोडते तसली एक अस्फुट आवाजातली किंकाळी परीक्षकांच्या तोंडून बाहेर पडली. ‘व्हॉऽऽऽऽट?’. तो उंदीर म्हणजे नर नसून मादी होती हे त्या किंकाळीमागचं कारण होतं. बसलेल्या धक्क्यातून सावरून त्यांनी एका अवयवाकडे बोट दाखवून त्याचं नाव विचारलं. माझा आत्मविश्वास अजूनही कायम होता. (आजकाल एकही चित्रपट हिट होत नसतानाही देव आनंदचा कायम आहे तसाच!) मी सांगितलं, ‘फॅलोपियन ट्यूब’! परीक्षकांच्या दोन्ही भुवया उंचावल्या गेल्या. काहीतरी चुकलं आहे याची मला जाणीव झाली आणि मी उत्तर बदललं, ‘युरिनरी ब्लॅडर’. मी दांडपट्टा चालवल्यासारखी उत्तरं देत होतो आणि परीक्षक त्यात जखमी होत होते. ‘युरिनरी ब्लॅडर’ ऐकल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर गोंधळल्याचे आणि आर्जवाचे भाव दिसले. ‘निदान एक तरी उत्तर बरोबर दे’ अशी विनवणी त्यांत दिसत होती. मी आणखी एक दांडपट्टा चालवला. ‘नो सर, इट्स अ‍ॅक्च्युअली युटेरस’. परीक्षकांनी एका हाताने टेबल धरलं. बहुतेक त्यांना भोवळ आली असावी. कारण मला जायला सांगून ते पाणी प्यायला उठले! गंमतीची गोष्ट म्हणजे उंदराचा तो अवयव कोणता होता आणि ‘फॅलोपियन ट्यूब’ आणि ‘युटेरस’ म्हणजे काय हे मला अजूनही माहित नाही!

क्रमशः

Saturday 30 October, 2010

माझी शिक्षणयात्रा - १

शिक्षणाचं आणि माझं पहिल्यापासूनच वाकडं आहे. शिकण्यात मला कधीच रस वाटला नाही. म्हणजे लहानपणी अभ्यास करणे हा दुर्गुण अंगी ठासून भरलेला असल्यामुळे शाळेतल्या हुशार मुलांमध्ये माझी गणना व्हायची. पण तरीही मनापासून अभ्यास कधी केला नाही. अभ्यास करण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यावेळी वर्गातल्या सर्वांत हुशार मुलाला बाकी मुलं आणि शिक्षक खूप भाव द्यायचे. बर्‍याच ठिकाणी कौतुक व्हायचं. आणि शिक्षकांचा लाडका असल्याचे काही महत्त्वाचे फायदे होते. सगळ्यांत महत्त्वाचा फायदा म्हणजे शिक्षा कमी व्हायची. माझ्या अभ्यासात आघाडीवर असण्यामुळे अनेकदा माझी शिक्षा कमी झाली आहे. त्यामुळे लक्ष देऊन अभ्यास करण्यामागे हे एक मोठं इन्सेन्टिव्ह होतं.

वास्तविक दहावीनंतरच माझं तोपर्यंत झालेल्या शिक्षणाने समाधान झालं होतं. मी साक्षर झालो, आता आणखी शिकून पुढे काय करायचं आहे असा एक रास्त विचार माझ्या मनात होता. पुण्यात (किंवा फॉर दॅट मॅटर, मराठीचं अस्तित्त्व शिल्लक असलेल्या कोणत्याही गावात किंवा शहरात) एखादं दुकान काढावं असे विचार मनात होते माझ्या. ‘आपटे आणि सन्स (‘सन्स’ म्हणजे माझ्या आईबाबांचे आम्ही दोघे सन्स. माझं अजून लग्नच झालेलं नसल्याने मला सन्स असण्याचा प्रश्न नाही) किराणा आणि भुसार मालाचे किरकोळ विक्रेते. (‘किरकोळ विक्रेते’ हा शब्द Retailers या अर्थाने वापरण्यात आलेला आहे. ‘’किरकोळ’ हे विक्रेत्यांचं विशेषण म्हणून इथे वापरलेलं नाही हे सूज्ञ वाचकांनी ध्यानात ठेवावं..) आमच्या येथे लक्ष्मी छाप हिंग, दगडफूल, गाय छाप तंबाखू, वैद्य भुसनळे यांच्या जुलाबाच्या गोळ्या व इतर किराणामालाचे साहित्य मिळेल. कृपया सुटे पैसे देणे. उधारी बंद आहे. आमची कोठेही शाखा नाही’ अशी पाटी वाचायला काय मजा आली असती! आणि गिर्‍हाइकांचं आपल्याला टेन्शन नाही. समोरच्या गिर्‍हाईकाला हरभर्‍याच्या झाडावर चढवलं की तो आपला खिसा आपोआप मोकळा करतो. ‘काय काकू, बर्‍याच दिवसांत दिसला नाहीत. कुठे बाहेर गेला होतात की काय? आणि काय हो हे, एवढ्या कशा वाळलात? बरंबिरं नव्हतं का?’ असं विचारलं की काकू खूश! मग भलेही त्या चारही बाजूंनी उसवत चाललेल्या का असोत! आपल्याला काय गिर्‍हाइकं आल्याशी मतलब. त्यावेळी मनात आलेले हे विचार मनातच राहिल्यामुळे इंजिनिअरिंगचे भोग आमच्या नशीबी आले आणि महाराष्ट्र एका उमद्या उद्योगपतीला मुकला. असो. विषयांतर पुरे आता.

शालेय जीवनात माझे हाडवैरी असलेले विषय म्हणजे भूगोल (Geography) आणि जीवशास्त्र! (Biology). या दोन विषयांमुळे माझ्या नीरस आयुष्यात रंग भरले गेले. भूगोल हा प्रकार माझ्या कधीच लक्षात राहायचा नाही. भूगोलातला ‘गोल’ नेहमी माझ्या उत्तरपत्रिकेवर मार्कांच्या रुपाने अवतीर्ण व्हायचा. त्या उत्तरपत्रिकेतल्या माझ्या अचाट विधानांची गोळाबेरीज केली असती एक शोधनिबंध नक्की तयार झाला असता. ‘दार्जिलिंगला नारळाच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि केरळमध्ये चहाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते’ असं एक खळबळजनक विधान एका परीक्षेत करून मी आमच्या बाईंना त्यांनी आजवर शिकलेला (आणि शिकवलेला) भूगोल विसरायला लावला होता! कित्येकदा माझी ही अशी स्फोटक विधानं वाचून परीक्षक बुचकळ्यात पडायचे. माझं भूगोलाचं अगाध ज्ञान मी इतरही ठिकाणी पाजळलं होतं. बी. टी. एस. (Bombay Talent Search) नावाची एक परीक्षा होती. त्यात लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवणार्‍यांचे इंटरव्यू घेतले जायचे. असाच एक इंटरव्यू अस्मादिकांनीही दिला होता. ‘दिल्लीमधून कोणती नदी वाहते?’ या प्रश्नाला ‘कृष्णा’ आणि ‘पुण्यामधून वाहणारी नदी कोणती?’ या प्रश्नाला ‘यमुना’ हे उत्तर दिल्यावर प्रश्नकर्त्याने पराभव मान्य केला होता आणि पडलेल्या चेहर्‍याने आणि खालावलेल्या आवाजात मला जायला सांगितलं होतं!

‘परीक्षेत जास्त मार्क मिळवायचे असतील तर, नकाशांचा सढळ हाताने वापर करावा’ असं एक आचरट वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं! त्यामुळे बर्‍याचशा उत्तरांत नकाशे काढण्याचा ससेमिरा मी स्वतःमागे (आणि मी काढलेला नकाशा समजून घेण्याचा ससेमिरा परीक्षकामागे) लावून घेतला होता. सुरुवातीला नकाशे काढण्याची स्टेन्सिल माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मी हाताने  नकाशे काढायचो. त्यावेळी मी काढलेले भारताचे नकाशे हे अडीनडीला कोणत्याही देशाचे म्हणून सांगता आले असते. बघणार्‍या प्रत्येक माणसाला त्यात वेगळा देश दिसायचा. अगदी चीन, जपान, अमेरिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सर्बिया, अझरबैजान, मेक्सिको अशा कोणत्याही देशाचा नकाशा म्हणून मी काढलेला भारताचा नकाशा चालून जायचा! एवढंच नव्हे तर, मी काढलेला भारत हा थोडा अंटार्क्टिकासारखा दिसतो असंही माझ्या काही मित्रांचं म्हणणं होतं. आणि अशा त्या चहूबाजूंनी प्रवाही असलेल्या भारतात मी राज्यं काढली की बहुतेकांचा ‘परीक्षेत उत्तरं न सुचल्याने मी वेळ घालवण्यासाठी उत्तरपत्रिकेवर रेघोट्या मारत होतो’ असा समज व्हायचा! म्हणजे तसा तो बहुतेकवेळा खराही असायचा, पण तो वेगळा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य गोवा पादाक्रांत करून कर्नाटकात घुसलेलं असायचं. केरळ राज्याचं एक टोक थेट बंगालपर्यंत जायचं. जम्मू-काश्मीर, हरयाणा आणि पंजाब या राज्यांच्या सीमा एकमेकांत मिसळून जायच्या.

नकाशे काढण्यासाठी स्टेन्सिल वापरायला लागल्यापासून भारतमातेची सीमारेखा जरा बरी यायला लागली. म्हणजे हा भारत आहे असं निदान लोक ओळखू तरी लागले. पण तेव्हाही त्या स्टेन्सिलच्या बॉर्डरवरून पेन्सिल फिरवताना ती बर्‍याचदा हलायची आणि भलतीकडेच जायची. त्यामुळे पूर्ण झाल्यावरही माझा भारत चार भागांमध्ये फाळणी झाल्यासारखा दिसायचा. मग ती आतली रचना खोडता खोडता सीमाही कधीकधी पुसली जायची. आता फक्त एवढ्याचसाठी परत स्टेन्सिल कोण लावणार? त्यामुळे मी हातानेच मग ती सीमा जोडायचो आणि भारतमाता परत हतबल दिसू लागायची. नकाशांच्या जोडीला बार चार्ट्‌स नामक प्रकार होता. एखाद्या बाबतीत बर्‍याचश्या राज्यांची एकमेकांशी तुलना करताना हा बार चार्ट कामी यायचा. हे प्रकरणही मला कधीच जमलं नाही. मी बार चार्टच्या नावाखाली वाटेल त्या लांबीरुंदीचे आयत काढायचो. त्यामुळे माझ्या त्या बार चार्ट्‌समध्ये महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा कधी चेरापुंजीपेक्षा जास्त तर कधी राजस्थानपेक्षा कमी असायचा! संपूर्ण भूगोल हा विषय मी असा इंच-इंच लढवत शिकलो आहे.

क्रमशः

Tuesday 26 October, 2010

न्यायमूर्ती राखी


‘राखी का इन्साफ’ पाहिला का हो कोणी? अगदी ‘न भूतो न भविष्यति’ असा कार्यक्रम आहे. 'imagine TV' वर १६ ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा कार्यक्रम ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचं भाग्य ज्या माणसांना लाभलं ती सगळी माणसं म्हणजे थोर पुण्यात्मे आहेत. (इस नाचीझने भी देखा है पहला एपिसोड । लेकिन दुर्भाग्य की बात यह है की हम उस वक्त स्टुडिओमें हाज़िर नहीं थे । प्रत्यक्ष पाहिला असता तर स्वर्गप्राप्ती झाली असती मला. असो. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना...) या कार्यक्रमात परमप्रकाशिता न्यायमूर्ती राखी सावंत या सामान्य लोकांच्या जीवनातील समस्यांचा न्यायनिवाडा करणार आहेत. या थोर आध्यात्मिक कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचा हा वृत्तान्त माझ्या अजाण नजरेतून:

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज कोणा पामराला राखी न्याय देणार (पक्षी: मूळ मुद्दा बाजूला ठेवून असलेला गोंधळ आणखी वाढवणार) आहे हे सांगण्यात आलं. एका बाईला (तिला आपण फिर्यादी बाई म्हणूया.) न्याय हवा होता. तिचं म्हणणं होतं की, तिच्या बहिणींनी तिला तिच्या मुलापासून तोडलं. हे सांगून झाल्यावर अचानक स्वयंपाकघरात भांडी पडल्यासारखा आवाज आला. मी दचकून पाहिलं तर कार्यक्रमाचं शीर्षकगीत सुरू झालं होतं. ‘हर सच और झूठ का फैसला’ या एवढ्या एकाच ओळीपासून बनलेलं हे शीर्षकगीत अगदी युनिक म्हणायला हवं. आता कार्यक्रम सुरू झाला.

रॅम्प वॉक केल्यासारखी (म्हणजे प्रत्येक पावलाला तीनवेळा कंबर हलवत) चालत राखी आली. उपस्थित प्रेक्षकवर्ग ‘राखी, राखी’ असं ओरडत होता. (याचं मूळ मला वाटतं बहुदा राखीने घातलेल्या तंग कपड्यांत असावं!) राखीने बर्‍याच लोकांशी हात मिळवले. दोन-तीन स्त्रियांना आलिंगनही दिलं. (हे दृश्य पाहून उपस्थित पुरुषांनी वास्तविक ‘राखी, राखी’च्या घोषणा वाढवल्या होत्या, पण राखीने काही त्यांना आलिंगन दिलं नाही!) सगळ्यांचं स्वागत करून राखी म्हणाली, ‘टांग खींचनेवाले तो बहुत होते हैं, लेकिन हाथ पकडनेवाले बहुत कम! धोखा देनेवाले तो बहुत होते हैं, पर मौका देनेवाले बहुत कम!’ (वाह! क्या ड्वायलॉक मारा है!) (साधारण तिसरीच्या मुलांचं नाटक जर एखाद्या शाळेने बसवलं, तर ती मुलं जशी प्रत्येक शब्दाला अभिनय करतात तसंच काहीसं चाललं होतं राखीचं ही वाक्य म्हणताना! म्हणजे ‘हाथ पकडनेवाले’ म्हणताना स्वतःचा हात पकडणं वगैरे वगैरे. नशीब, ‘टांग खींचनेवाले’ म्हणताना स्वतःचा पाय नाही ओढला तिने!) तिचं बोलून झाल्यावर स्क्रिप्टप्रमाणे लोकांनी टाळ्या वाजवल्या. (मला वाटतं या लोकांना टाळ्या वाजवण्याचे पैसे दिले असावेत imagine tv ने. ते पैसे पुरते वसूल करून देण्याचा मनसुबा दिसला एकंदरीत प्रेक्षकांचा.)

हे सगळं प्रास्ताविक झाल्यावर ती फिर्यादी बाई एकदाची आली. तिच्यात आणि राखीत झालेला संवाद पुढीलप्रमाणे:
राखी: कोई टेन्शन तो नहीं? एकदम आरामसे बैठिए । बिलकुल खूबसूरत लग रही हैं आप । (आता मध्येच हे कुठून आलं?) कोई टेन्शन लेनेकी जरुरत नहीं, क्यूँकी यह सब लोग अपनेही लोग हैं । (लोकांनी इथे imagine चे पैसे परत वसूल केले... म्हणजे टाळ्या वाजवल्या.) अब आप अपना नाम बताइये।
फिर्यादी बाई: मेरा नाम...
राखी: थोडा ऊँचा बोलिए, ताकि सब सुन सकें।
फि.बा.: (थोडी ओरडून) मेरा नाम ****** है और मैं साहरंगपूर में...
राखी: सारंगपूर या साहरंगपूर? (बाय, जरा तिला बोलू द्या की!)
फि.बा.: साहरंगपूर...
राखी: साहरंगपूर! जी..
फि.बा.: मै अपने बच्चोंको वहाँ पढाती हूँ। मेरा आगेपीछे कोई नही है। मैं...
राखी: आपके हजबण्ड कहाँ हैं? (ही बाय लय त्वांड घालते मदे मदे!)
फि.बा.: हजबण्ड तो नहीं हैं।
राखी: अच्छा हजबण्ड नहीं हैं आपके?
फि.बा.:नहीं।
राखी: अच्छा हजबण्ड नहीं हैं आपके। (आता हे किती वेळा रिपिट करणार बाय??) ओ.. आय अ‍ॅम सो सॉरी. (चला, अखेर बाहेर तर आली या पतिपुराणातून..)
राखी: क्या हुआ उनको? (अजूनही नवराच!)
फि.बा.: जब शूटिंगमें काम...
राखी: शूटिंगमें काम करते थे? (आता ती बाई तेच सांगत होती ना? मग जरा बोलू दे की तिला!)
फि.बा.: शूटिंगमें लाइटिंगमें...
राखी: लाईटमन थे। अच्छा।  (त्या बाईचं एक वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही या बयेने आत्तापर्यंत!)
फि.बा.: एक  दिन उनका फोन आया की, मैं रातको नहीं आऊँगा। और सुबह नासीरभाई का...
राखी: नासीरभाई कौन? (या फिर्यादी बाईचं एखादं वाक्य बोलून पूर्ण झालं तर गावजेवण घालीन म्हणतो मी...)
फि.बा.: नासीरभाई मतलब जिधर वो...
राखी: अच्छा। मतलब जहाँ आपके हजबण्ड काम करते थे।

अशा संवादांतून (म्हणजे फि.बा. च्या तीन शब्दांपुढे राखीची अडीच वाक्य या रेटने चाललेल्या) अखेर त्या बाईचं बोलणं पूर्ण झालं! तिचा नवरा शूटिंगच्या वेळेस वारला होता (राखीच्या शब्दांत ‘त्याचा स्विच ऑफ झाला होता’!) आणि तिला चार लाखांची भरपाई मिळाली होती. मग ती मुलांना घेऊन बँगलोरला गेली.
राखी: क्या कहा आपके माँ-बापनें?
फि.बा.: उन्होनें कहा, ‘मेरी बेटी मेरे लिये क्या लायी? साडी लायी क्या?’
राखी: ऐसा कहा उन्होंने? ऐसा नहीं कहा की, ‘आपके हजबण्ड किधर हैं?’
फि.बा.: ये ऐसा...
राखी: ऐसा नहीं कहा की, ‘घरपे अब साया नहीं रहा’?
फि.बा.: वो तो...
राखी: और ये कहा की, ‘मेरी बेटी साडी लेकर आयी की नहीं?’
फि.बा.: वो लोग...
राखी: ये गलत बात है!
फि.बा.: नहीं लेकिन...
राखी: ये गलत बात है! है ना? (एकूणच त्या बाईला बोलायला द्यायचं नाही असा मनोनिग्रह दिसला राखीचा!)

थोड्या वेळाने फि.बा. ची एक बहीण आली. एक सामुदायिक रडण्याचा कार्यक्रम त्यावेळी चालू होता. बहिणीनेही थोडं रडून या कार्यक्रमातला आपला खारीचा वाटा उचलला. कोण कशासाठी रडतंय तेच न कळल्याने प्रेक्षक मात्र गोंधळात पडले होते. मध्येच फि.बा. रडत होती, मध्येच चवताळून ‘इन्साफ चाहिये’ असं ओरडत होती. (बहुतेक हिला भांग दिली असावी..) मध्येच तिने प्रेक्षकांना उद्देशून एक छोटेखानी भाषणही केलं. भाषणानंतर ती राखीला मिठी मारून रडली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तर झडत होत्याच. मध्येच ‘तीन बच्चोंकी कसम’, ‘कुरान की कसम’ असे शब्द ऐकायला येत होते. प्रेक्षकही मध्ये थोडा गोंगाट करून, टाळ्या वाजवून, घोषणा देऊन आपण अजूनही जागे असल्याची खात्री करून घेत होते. कथेतली पात्रही वाढत होती. मधूनच राखी खास स्वतःच्या शैलीत एखाद्या पात्राशी संवाद साधून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. उदाहरणच द्यायचं झालं तर खालचा संवाद बघा:
राखी: आपका पूरा नाम?
माणूस: नासीर हुसैन शेख
राखी: नासीर (एक मोठा पॉज)
माणूस: (राखीला थांबलेली बघून उरलेला भाग पूर्ण करण्यासाठी) हुसैन शेख
राखी: हुसैन (परत एक मोठा पॉज)
माणूस: (आता हा कंटाळला असावा. चेहर्‍यावर दिसत होतं त्याच्या.) शेख (हुश्श!)

मग आणखी दोन बहिणी आल्या. आता परत युद्ध पेटलं. आता फि.बा., तिच्या बहिणी (आणि अर्थातच राखी) मुंडी कापलेल्या कोंबडीसारखं थैमान घालत होत्या. राखीचे स्पेशल डायलॉग्ज मधून मधून चालू होतेच. ‘आप झूठ पे झूठ, झूठ पे झूठ बोल रही हैं’ (तारीख पे तारीख च्या चालीवर) किंवा ‘बच्चोंका अपना दिल होता है। वो कोरे कागज़ की तरह होते हैं।’ अशी वाक्यं ऐकून कान तृप्त होत होते. मग फि.बा. च्या मुलाची एंट्री झाली. मग पुन्हा रडारड, वितंडवाद, आरडाओरडा हा एक सिक्वेन्स झाला. मग शब्बीर नावाच्या एका प्राण्याची एंट्री झाली. हा म्हणे त्या फि.बा. चा मानलेला भाऊ होता. अचानक राखीला साक्षात्कार झाला की या दोघांमध्ये बहीण-भावाच्या पलिकडचं एक नातं आहे. (राखीला सिद्धी प्राप्त झालेली आहे बहुतेक. कसं काय न सांगता सगळं ओळखते देव जाणे. फि.बा. मिळालेल्या पैशांच्या बाबतीत खोटं बोलतेय आणि तिला ४ लाखांपेक्षा जास्त पैसे मिळालेले आहेत हेही राखीने असंच ओळखलं होतं) तिने त्या दोघांना खोदून खोदून विचारलं आणि मग जाहीर केलं, ‘मैं अब एक ऐसी चीज़ दिखाऊँगी जो मै नहीं दिखाना चाहती थी!’ (प्रेक्षकांमधले पुरुष आता खूश झाले. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ असे भाव काहींच्या चेहर्‍यावर दिसले.)

आता फोकस एका स्क्रीनकडे वळला. फि.बा. आणि शब्बीर यांच्यातलं भावाबहिणीपलिकडलं नातं दाखवण्यात आलं. आता अचानक सगळा जमाव शब्बीरवर तुटून पडला. (‘च्यायला, काय बघण्याची अपेक्षा केली आणि काय बघितलं’ असं फ्रस्ट्रेशन असावं बहुतेक त्यामागे) सिक्युरिटीवाल्यांनी जमावाला दूर केलं. (त्याआधी जमावातल्या प्रत्येकाने निदान एक तरी फटका मारला आहे याची खात्री करून घेतली होती त्यांनी.) मग अचानक प्रेक्षकांपैकी एकीला एक माईक मिळाला. मग तिने शब्बीरला एक लेक्चर दिलं. लेक्चर ऐकताना शब्बीरचा चेहरा मात्र निर्वाणाप्रत पोचल्यासारखा निराकार होता. त्यानंतर प्रेक्षकांमधल्या एका मौलवीने या ‘बहीणभावांचा’ निकाह लावण्याचा उपाय सुचवला. मग राखीने आपलं तत्वज्ञान ऐकवलं. (‘पतीके गुजरने बाद किसी और मर्द के साथ रिश्ता रखना कोई गलत बात नहीं है। लेकिन वो रिश्ता जायज़ होना चाहिए।’) आता न्यायनिवाडा झाला होता. त्यामुळे मग एक-दूसरेके गले लगना यासारखे सोहळे पार पडले. मग फि.बा. ने त्या बाबावर (शब्बीरवर हो..) ‘प्रेमा’चा एवढा वर्षाव केला, की त्यापुढे ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोलीनेही लाजून मान खाली घातली असती. अशा रीतीने एक महान कार्यक्रम पार पडला आणि बघणारा मी धन्य जाहलो.

तर असा होता ‘राखी का इन्साफ’. हा कार्यक्रम पाहिल्यावर महामहोदया राखीदेवींच्या न्यायप्रियतेवर माझा पूर्ण विश्वास बसला आहे. हा कार्यक्रम वेळोवेळी बघून समस्त लोकांनी आपल्या पुण्यकर्मांत भर घालावी हेच माझं कळकळीचं सांगणं.

बोला परमप्रकाशिता महामहोदया नौटंकीसम्राज्ञी अल्पवस्त्रआच्छादिता त्रैलोक्यसुंदरी मिकासिंगचुंबिता स्वस्तुतीविशारदा आद्यस्वयंवरसहभागिनी राखीदेवी सावंत की....

जय!! (इथे कोणाला ‘ऐशी की तैशी’ म्हणावसं वाटलं तरीही मी ‘जय’च म्हणणार! मी माझ्या दैवताचा असा अपमान करणार नाही!)

Friday 22 October, 2010

रजनीकांत फॅक्ट्स

आजकाल रजनीकांतची चलती आहे. त्याचा ‘एंदिरन’ (हिंदीतला ‘रोबॉट’) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक मेल्स, ब्लॉग्ज, लेख आणि इतर बर्‍याच ठिकाणी रजनीकांत काय काय करू शकतो याची जोरदार चर्चा चालू आहे. या चर्चेतलीच ही काही रत्नं:
१. रजनीकांतने एकदा एका घोड्याच्या तोंडावर लाथ मारली. त्या घोड्याचे वंशज आजकाल ‘जिराफ’ म्हणून ओळखले जातात.
२. प्रश्न: रजनीकांत काळा चष्मा का घालतो? उत्तर: सूर्याचं आपल्या डोळ्यांपासून रक्षण व्हावं म्हणून!
३. रजनीकांत ‘रिसायकल बिन’ पण डिलिट करू शकतो.
४. रजनीकांतने एकदा एक बाटलीभर झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. त्यामुळे त्याची एक पापणी लवली.
५. पृथ्वी आधी फिरत नव्हती. रजनीकांतने धावताना तिला मागे ढकललं आणि तेव्हापासून आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरू लागली.
६. जेव्हा रजनीकांत जोर (इंग्रजीमध्ये याला ‘पुशप्स’ म्हणतात) काढत असतो, तेव्हा तो स्वतःला वर उचलत नसतो. तो पृथ्वीला खाली ढकलत असतो.
७. रजनीकांतने अनंतापर्यंत मोजणी केली आहे. आणि तीही दोनवेळा!
८. रजनीकांत जेव्हा पाय हलवतो तेव्हा एक छोटं वादळ तयार होतं. कतरिना चक्रिवादळ रजनीकांतच्या जेवणानंतर केलेल्या शतपावलीमुळे निर्माण झालं होतं.
९. रजनीकांतचं फेसबुकवर ऑर्कुट अकांऊट आहे.
१०. रजनीकांतला Pi (Pi म्हणजे वर्तुळाच्या परीघाचं (Circumference) त्याच्या व्यासाशी (Diameter) असणारं गुणोत्तर (Ratio). Pi मध्ये अनंत अंक आहेत) मधील सगळे अंक ठाऊक आहेत.
११. रजनीकांत एवढ्या वेगात धावू शकतो की, तो पृथ्विप्रदक्षिणा पूर्ण करून स्वतःच्या पाठीवर गुद्दा मारू शकतो.
१२. रजनीकांत जेव्हा जेव्हा आरशात पाहतो तेव्हा तेव्हा आरसा तडकतो, कारण रजनीकांतचं प्रतिबिंब दाखवण्याची आरशाचीही लायकी नाही.
१३. रजनीकांतला जगातल्या सगळ्या भाषा येतात. एवढंच नव्हे, तर तो कुत्र्यांशी कुत्र्यांच्या भाषेत आणि मांजरांशी मांजरांच्या भाषेत बोलू शकतो.
१४. रजनीकांत कॉर्डलेस फोनने तुमचा गळा आवळू शकतो.
१५. रजनीकांत हातावर घड्याळ बांधत नाही, कारण कोणतीही वेळ रजनीकांतच ठरवतो.
१६. रजनीकांतच्या घराला दरवाजे नाहीत, फक्त भिंती आहेत. त्या भिंतींतून तो आरपार जाऊ शकतो.
१७. रजनीकांत शिंकला तेव्हा विश्वाचा जन्म झाला. त्याला आजकाल ‘बिग बँग थिअरी’ म्हटलं जातं.
१८. ‘बर्म्युडा ट्रँगल’ हा आधी त्रिकोण नसून एक चौकोन होता. रजनीकांतने लाथ मारल्यावर त्या चौकोनाचा त्रिकोण झाला.
१९. जेव्हा लिओनार्डो द विंचीने मोनालिसाचं चित्र काढलं होतं तेव्हा मोनालिसाने रजनीकांतकडेच बघून स्मितहास्य केलं होतं.
२०. रजनीकांत बँकेकडून कर्ज घेत नाही; तो बँकेला कर्ज देतो.
२१. आपल्याला भीती वाटल्यावर आपण ‘अरे देवा’ म्हणतो. देवाला भीती वाटल्यावर तो ‘अरे रजनीकांत’ म्हणतो.
२२. बॅटमॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन आणि बाकीचे सगळे सुपरहीरो गुरुपौर्णिमेला रजनीकांतला गुरुदक्षिणा देतात.
२३. रजनीकांत आयपॉडवरून लोकांना फोन करू शकतो.
२४. रजनीकांतचा पराभव करणं फक्त आणि फक्त त्याला स्वतःलाच शक्य आहे. त्याने रचलेले विक्रम फक्त तोच मोडू शकतो.
२५. रजनीकांतचा ईमेल आयडी आहे: gmail@rajnikanth.com
२६. रजनीकांत माशाला पाण्यात बुडवून मारू शकतो.
२७. रजनीकांतने लहान असताना कधीच गादी भिजवली नाही. गादीच त्याला घाबरून स्वतः भिजायची.
२८. रजनीकांतने मॅकडोनाल्ड्समध्ये जाऊन इडली मागितली आणि त्या लोकांनी ती बनवून दिली.
२९. रजनीकांत प्रकाशाच्या वेगाने धावत नाही; प्रकाश रजनीकांतच्या वेगाने धावतो.
३०. रजनीकांत चंद्र आणि मंगळावर जाऊन आला आहे. म्हणूनच तिकडे जीवसृष्टी नाही.
३१. रजनीकांत स्वतःच्या केसाने व्हायोलिन वाजवू शकतो. एवढंच नव्हे, तर तो प्रत्येक केसाने एक वेगळं व्हायोलिन एकाच वेळी वाजवू शकतो.
३२. इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे. रजनीकांतला घाबरूनच ते लोक तिकडे गेले आहेत.
३३. ६० मिनिटांचा कार्यक्रम रजनीकांत २० मिनिटांत बघू शकतो.

आणि सगळ्यांत भन्नाट म्हणजे...

३४. रजनीकांतला कापूसकोंड्याची गोष्ट कधी संपते ते माहित आहे!!!!

टीप: अनेक मेल्स, ब्लॉग्ज आणि इतर अनेक लेखांमध्ये पूर्वोल्लिखित (वा! काय शब्द सापडला आहे!) गोष्टींचे उल्लेख आलेले आहेत. त्यामुळे या गोष्टींचा नेमका स्रोत सांगणं कठीण आहे. त्यामुळे इच्छा असूनही त्यांचे संदर्भ देता येत नाहीयेत. ‘कॉपीराईट प्रोटेक्शन’वाल्यांनी उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी.

Sunday 17 October, 2010

विजयादशमी

विजयादशमी. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. सीमोल्लंघनाचा दिवस. सत्याने असत्यावर विजय मिळवल्याचा दिवस. अश्विन शुद्ध दशमीच्या या दिवशी नवरात्रोत्सवाची सांगता होते. प्रभू श्रीरामचंद्रांनी याचदिवशी रावणावर विजय मिळवला होता. अज्ञातवासात असलेल्या पांडवांनी शमीच्या झाडाच्या ढोलीतून याचदिवशी आपली शस्त्रं बाहेर काढली होती आणि कौरवांचा पराभव केला होता. कौत्साने याच दिवशी अयोध्येतील लोकांना सोनं वाटलं होतं. छत्रपती शिवरायांना याच दिवशी भवानीमातेने तलवार अर्पण केली होती. अशा अनेक कथा विजयादशमीशी संबंधित आहेत. आणि म्हणूनच या दिवसाला एका पूर्ण मुहूर्ताचा मान आहे.

रावणाने सीतेचं अपहरण केल्यावर प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली होती. तेरा दिवस तुंबळ युद्ध चालू होतं. त्या तेरा दिवसांत रावणाचे खंदे वीर एक-एक करून मारले गेले. त्याचे कुटुंबीयही युद्धात कामी आले होते. तेराव्या दिवसापर्यंत तो मुलगा मेघनाद, भाऊ कुंभकर्ण आणि इतर अनेक लोकांना गमावून बसला होता. अखेर अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी रामरावण युद्धात आमनेसामने आले आणि रामचंद्रांनी रावणाच्या पोटातील अमृतकुंभ फोडून त्याचा वध केला. सत्याने असत्याचा, प्रकाशाने अंधाराचा, न्यायाने अन्यायाचा पराभव केला.

चौदा वर्षांचा वनवास भोगल्यावर एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्यासाठी पांडव विराटाघरी राहिले होते. तेव्हा अज्ञातवास सुरू होण्याआधी त्यांनी आपली शस्त्रात्रं विराटनगराबाहेरच्या एका शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली. अज्ञातवास संपत आला असताना कौरवांना पांडव विराट राज्यात असल्याची शंका आली. त्यांनी पांडवांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विराट राज्यावर चढाई केली. तेव्हा अर्जुनाने शमीच्या झाडाच्या ढोलीतून आपलं गांडीव धनुष्य काढून कौरवांचा एकहाती पराभव केला. आणि म्हणूनच दसर्‍याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची प्रथा आहे.

दसर्‍याला आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याच्या प्रथेमागेही एक कथा आहे. देवदत्त ऋषींचे पुत्र कौत्स ऋषी हे महर्षी विश्वामित्रांचे शिष्य होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते विश्वामित्रांकडे गेले आणि त्यांनी विश्वामित्र महर्षींना गुरुदक्षिणा मागण्याची विनंती केली. विश्वामित्रांनी या गोष्टीला नकार दिला. कौत्स हटूनच बसले. शेवटी नाईलाजाने विश्वामित्र म्हणाले, ‘वत्सा, मी तुला चौदा विद्या शिकवल्या. त्या प्रत्येक विद्येसाठी गुरुदक्षिणा म्हणून तू मला एक कोटी सुवर्णमुद्रा दे.’ एवढी गुरुदक्षिणा देणं कौत्सांना शक्य नव्हतं. त्यामुळे ते मदतीची याचना करायला रघुराजाकडे गेले. रघुराजा म्हणाला, ‘मी नुकताच विश्वजीत यज्ञ केला. त्यात केलेल्या दानधर्मामुळे माझ्याकडे आता एवढ्या सुवर्णमुद्रा शिल्लक नाहीत. पण आलेल्या याचकाला परत पाठवण्याचं पातक माझ्या हातून मी घडू देणार नाही. आपण तीन दिवसांनी या. तोपर्यंत मी मुद्रांची व्यवस्था करून ठेवतो.’ कौत्स ऋषी गेल्यावर त्याने सुवर्णमुद्रांसाठी इंद्राला विनंती केली. मुद्रा न दिल्यास युद्धाला तयार राहण्याचा इशाराही दिला. हा इशारा ऐकून इंद्राने कुबेराला अयोध्येवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. इंद्राच्या आज्ञेवरून कुबेराने अयोध्येवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाने त्या सुवर्णमुद्रा कौत्सांना आणि कौत्सांनी त्या मुद्रा विश्वामित्रांना दिल्या. विश्वामित्रांनी त्यातील १४ कोटी मुद्रा घेऊन बाकीच्या कौत्सांना परत केल्या. कौत्स त्या मुद्रा घेऊन रघुराजाकडे परत गेले, पण रघुराजाने दिलेलं दान परत घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या उरलेल्या मुद्रा कौत्सांनी आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना त्या घ्यायला सांगितलं. तेव्हापासून आपट्याच्या झाडाची पानं सोनं म्हणून वाटण्याची पद्धत आहे.

अश्या या शुभदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या विजयादशमीच्या दिवशी आपण सर्वांनी अपयशाचं सीमोल्लंघन करून यशाकडे वाटचाल करावी हीच माझी मनोकामना... :-)

Thursday 14 October, 2010

सुखसंवाद - २

सुखसंवाद - १


सौ: अहो, ऐकलं का?
श्री: बोला. (स्वगत: या घरात ऐकणारा फक्त मी आहे, हे तुला अजून माहित नाही का? तू बोलतेस आणि मी ऐकतो! आणि तसंही माझी हिंमत आहे का तुझ्याकडे दुर्लक्ष करण्याची?)
सौ: तुमची आंघोळ झाली का?
श्री: नाही अजून. आज रविवार आहे गं.
सौ: आधी आंघोळ करा बघू!
श्री: का? (स्वगत: काय वैताग आहे! जरा पेपर वाचू देत नाही!) आणि तसंही मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी उठलोय.
सौ: तर तर! ११ वाजले आहेत, काही कल्पना आहे का? नुसते झोपून राहता तंगड्या वर करून उशिरापर्यंत!
श्री: करतो. (स्वगत: साहजिक आहे उशिरापर्यंत झोपणं! तुझ्या घोरण्यामुळे रात्री झोप लागत नाही ना!रात्रभर एखाद्या ड्रिलिंग मशीनशेजारी झोपलोय असं वाटत राहतं मला! त्यामुळे तू उठल्यावरच जरा डोळा लागतो माझा.)
सौ: लवकर! आज तरी निदान आटपा लवकर! वटपौर्णिमा आहे आज.
श्री: मग तू जाणार नाहीस वाटतं वडाची पूजा करायला?
सौ: जाऊन आलेही. तुम्ही जागे असलात तर कळणार ना तुम्हाला! एवढी नवीन साडी नेसले आज, त्याचं जरा म्हणून कौतुक नाही! आणि त्या शेजारच्या मिसेस वाघमारेंना मात्र परवा म्हणालात, ‘क्याय वाघमारेबाई, नवीन शाडी व्याटतं’. तीन वर्षांपासून आहे ती साडी त्यांच्याकडे! हुं!!!
श्री: (स्वगत: ही साडी नवीन आहे? दुकानदाराने तुला चांगलंच बनवलेलं दिसतंय. आणि कौतुक करण्यासाठी मुळात काही चांगलं असावं लागतं!) अगं, पण मला काय माहित ती साडी त्यांच्याकडे तीन वर्षांपासून आहे ते?
सौ: हो! तुमचं मुळी कुठे लक्षच नसतं!
श्री: (स्वगत: कमाल आहे! आता मी काय ती बाई कुठली साडी नेसते याची नोंद ठेवू काय? आता मी त्या वाघमारेबाईकडे लक्ष दिलं नाही तर म्हणतेस, ‘माझं लक्ष नसतं’ आणि जर मी लक्ष ठेवलं असतं तर म्हणाली असतीस, ‘या वयात शोभत नाही तुम्हाला!’) चुकलंच माझं! लक्ष देऊन पाहायला हवं होतं नाही मी वाघमारेबाईंकडे? तशा दिसायला चांगल्या आहेत त्या! (स्वगत: तुझ्याशी सरळ बोलण्यात पॉइंटच नाही! तुझ्याशी तुझ्याच भाषेत बोलायला हवं!)

Thursday 7 October, 2010

सुखसंवाद - १

रसिकहो, रंगदेवतेला अभिवादन करून आज आम्ही आपणांपुढे सादर करत आहोत एक छोटी एकांकिका ‘सुखसंवाद’! हा सुखसंवाद पतीपत्नींमधला आहे जो घराघरात ऐकायला मिळतो. अगदी शब्द सारखे नसले तरीही मथितार्थ हाच असतो. तर आजच्या या सुखसंवादामधले कलाकार आहेत मिलिंद मिशीकापे आणि निहारिका सोनटक्के. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य: अजित झाडमुटे. चला तर मग बघूया ‘अनन्वय’ निर्मित लघुएकांकिका ‘सुखसंवाद’

एक मध्यमवर्गीय घर. स्वयंपाकघर, हॉल आणि एक बेडरूम. (यांच्या जागा कुठेही असल्या तरीही चालतील! मध्यमवर्गीयांकडे तसंही कोण निरखून पाहणार आहे?) एक पंचेचाळीशीच्या सुमाराची स्थूल बाई गाणी ऐकत आहे. अचानक दारावरची बेल वाजते. या बाईंचा नवरा वाटावा असा एक गृहस्थ आत येतो.

सौ: कुठे गेला होतात?
श्री: मसणात!
सौ: कशाला?
श्री: अरेच्चा! माणूस मसणात एक तर स्वतः तरी पोचतो किंवा दुसर्‍याला पोचवायला तरी जातो! पण ज्याअर्थी तू तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मिरवत झाशीच्या राणीसारखी (स्वगत: कसली डोंबलाची झाशीची राणी! हिडिंबा आहे नुसती!) माझ्यासमोर उभी आहेस त्याअर्थी मी दुसर्‍या कोणालातरी पोचवायला गेलो होतो हे उघड आहे. आपल्या गल्लीच्या टोकाशी राहणारे देवल गेले आज. त्यांना पोचवायला गेलो होतो. असो. पाणी काढ आंघोळीला.
सौ: स्वतःच घ्या! मी मेंदी लावली आहे हातांना.
श्री: (स्वगत: आता या वयात हातांना मेंदी, केसांना कलप किंवा चेहर्‍याला रूज लावलास तरीही कोण बघणार आहे तुझ्याकडे? आणि तसंही अशा बाह्य उपायांनी फरक पडण्यासाठी मुळात सौंदर्य असावं लागतं! आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार?) का? लग्न आहे की काय कोणाकडे?

उशीर

‘हार्दिक अभिनंदन अभय. तू केलेलं प्रेझेंटेशन आपल्या क्लायंटला आवडलं. त्यांनी हे प्रोजेक्ट आपल्या कंपनीला दिलंय.’, बॉसचे हे शब्द ऐकल्यावर अभयचा आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. त्याची खूप दिवसांची मेहनत सार्थ झाली होती. रात्ररात्र जागून केलेल्या कामाचं अखेर त्याला फळ मिळालं होतं. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ अशी त्याची अवस्था झाली होती. त्याच्या डोळ्यांसमोरून आत्तापर्यंत घडलेल्या घटना तरळून गेल्या. प्रेझेंटेशनसाठी केलेली मेहनत, रात्ररात्र केलेली जागरणं, सुट्टीच्या दिवशीही केलेलं काम, या कंपनीत कामाला लागण्याआधी असलेले हलाखीचे दिवस, नोकरी मिळवण्यासाठी केलेली धडपड, मुंबईत नुकताच आलेला असताना जागा मिळवण्यासाठी केलेली वणवण, रागारागात गावचं घर सोडलं तो दिवस, आईबाबांशी झालेलं भांडण... सारं सारं अगदी आत्ताच घडून गेल्यासारखं स्पष्ट दिसलं त्याला.

अभय लहानपणापासूनच तसा वांड होता. अभ्यासात त्याचं कधीच लक्ष नसे.खोड्या काढण्यात आणि टगेगिरी करण्यात तो नेहमीच पुढे असायचा. घरच्यांनी हजार वेळा टोचलं म्हणून जेमतेम ग्रॅज्युएट झाला होता तो. पण तरीही नोकरी करण्यापेक्षा घरून पैसे मागून ते बाहेर जाऊन उधळायचे असाच त्याचा स्वभाव होता. अशा स्वभावामुळे घरी सातत्याने वाद व्हायचे. अशाच एका वादाच्या वेळी अभयने रागाच्या भरात घर सोडलं आणि कोणालाही काही न सांगता तो सरळ मुंबईला मित्राकडे निघून आला. आठवडाभर राहू दिल्यावर मित्रानेही परवडत नसल्याचं कारण सांगून अभयला घराबाहेर काढलं. घरच्या सुरक्षित जगाची सवय असलेल्या अभयला प्रथमच बाहेरच्या जगातील प्रॅक्टिकॅलिटीची जाणीव झाली. मग सुरू झाली जागा मिळवण्यासाठीची वणवण! खिशात पैसे नव्हते आणि मुंबईत टिकायचं तर होतं. सुरुवातीचे काही दिवस तर त्याला प्लॅटफॉर्मवर झोपून काढावे लागले! नोकरीसाठी भटकताना अखेर त्याला सध्याच्या अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण निदान थोडे तरी पैसे मिळत होते. सुरुवातीच्या दिवसांएवढी वाईट अवस्था नव्हती. एकदा नोकरी मिळल्यावर स्वतःच्या कल्पकतेच्या जोरावर तो प्रगतीच्या पायर्‍या चढत गेला.

‘आणि यामागे निःसंशय तुझी मेहनत आहे. प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी तू रात्रंदिवस झटलास. वीकेंडलाही काम केलंस. प्रेझेंटेशन चांगलं व्हावं यासाठी एक्स्टेन्सिव्ह रिसर्च केलास. मला तुझी मेहनत दिसत होती, पण त्या मेहनतीच्या बदल्यात मी तुझा पगार वाढवू शकत नव्हतो. कंपनीकडे पैसाच नव्हता ना. ८ जणांना लेऑफ केलं तेव्हा त्या यादीत तुझंही नाव होतं, पण माझा तुझ्यावर विश्वास होता. म्हणूनच आपल्या प्रेसिडेंटशी बोलून मी तुझं नाव त्या यादीतून वगळलं होतं. पण आता हे एवढं मोठं प्रोजेक्ट आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे पैशाची काहीही फिकीर नाही. तुझ्याचमुळे ही अ‍ॅड कंपनीला मिळालेली आहे. म्हणून आजपासून तू या प्रोजेक्टचा मॅनेजर आहेस. तुझा पगारही वाढवण्यात येत आहे.’, बॉस बोलतच होता. अभयचं त्याकडे लक्ष नव्हतं. त्याला चुकल्याचुकल्यासारखं, काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं.

हल्ली हे असं उदास वाटण्याचं, काहीतरी हरवल्यासारखं वाटण्याचं त्याचं प्रमाण वाढलं होतं. त्याने घर सोडल्याला सहा वर्षं उलटून गेली होती. या सहा वर्षांत त्याला आईबाबांची आठवण खूप वेळा आली होती. त्यांच्याशी संपर्क साधावा असंही खूप वेळा वाटलं होतं. पण त्याचा दुखावलेला अहंकार त्याला तसं करू देत नव्हता. नाही म्हणायला त्याने एकदा आपल्या मित्राला फोन करून आपला ठावठिकाणा सांगितला होता. निदान कोणालातरी आपण कुठे आहोत हे माहित असावं या भावनेने. पण ‘आईबाबांना यातलं काही सांगायचं नाही’ या अटीवरच त्याने मित्राला आपला पत्ता आणि फोन नंबर सांगितला होता. पण हल्ली त्याला घराची आठवण वारंवार यायला लागली होती. ‘आपलं थोडं चुकलंच. थोडं बोलले म्हणून एवढं काय मनाला लावून घ्यायचं! आणि आपल्या भल्यासाठीच तर बोलले होते. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काही नव्हता त्यात’, असे विचार आजकाल त्याच्या मनात रुंजी घालू लागले होते.

आजही घरी जाताना त्याला तसंच वाटत होतं. वास्तविक एवढं मोठं प्रोजेक्ट आज मिळालं होतं. त्याच्या मेहनतीला फळ आलं होतं. आज वास्तविक आनंदाचा दिवस, यश साजरं करण्याचा दिवस. पण अशावेळी आनंद होण्याऐवजी घराची आठवण त्याला तीव्रतेने येऊ लागली होती. ‘आजचं हे यश ऐकून आईला किती आनंद होईल. तसाही आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनी तिला किती आनंद व्हायचा! शाळेच्या क्रीडास्पर्धांत धावण्याच्या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाचं तिला काय कौतुक वाटलं होतं. त्यादिवशी खास आपल्याला आवडतो म्हणून तिने गोडाचा शिरा केला होता. बाबांनीही कौतुकाने पाठ थोपटली होती. आज आपला मुलगा एवढा मोठा झाला आहे, एवढे पैसे मिळवतो हे ऐकून दोघांना काय आनंद होईल.’ अभयच्या डोळ्यांत पाणी तरळलं. घरी पोचेपर्यंत त्याने गावाला जाण्याचं नक्की केलं होतं. त्याने ठरवलं, ‘उद्याच निघूया आपण. बॉसला सांगून आठवडाभराची सुटी नक्कीच मिळवता ये‍ईल. तसंही तो आपल्यावर खूश आहे. आपण गावाला जाऊ आणि आईबाबांची माफी मागू. ते नक्की माफ करतील आपल्याला. त्यांना इकडेच घेऊन येऊ. आणि मग सगळे एकत्र राहू’

घराचं दार उघडताना शेजारच्या थोरात काकूंनी अभयला त्याच्या नावाची तार दिली. अभय घरी नसल्यामुळे त्यांनीच सही करून ती घेतली होती. तार उघडताना त्यावर आपल्या गावाचं नाव पाहून अभयच्या काळजात धस्स झालं. थरथरत्या हाताने त्याने ती तार उघडली. तारेत मजकूर होता, ‘मदर फादर डाईड इन अ‍ॅक्सिडन्ट. लीव्ह इमिजिएटली’. जगातली सारी दुःखं आपल्यावर येऊन आदळत आहेत असं त्याला वाटलं. त्याला आईबाबांशी बोलायचं होतं, त्यांना स्वतःच्या यशाबद्दल सांगायचं होतं, त्यांची माफी मागायची होती, त्यांच्याशी खूप खूप गप्पा मारायच्या होत्या... पण फार उशीर झाला होता...

Wednesday 6 October, 2010

अविस्मरणीय

व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
अविस्मरणीय, थरारक, लक्षवेधक... भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिल्या कसोटी सामन्याचं वर्णन करायला शब्द कमी पडतील. हा सामना बघताना एखादा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बघत असल्यासारखं वाटत होतं मला. एवढी अटीतटीने लढली गेलेली ही मॅच अखेर भारताने जिंकली, तेव्हा मी सुटकेचा निःश्वास टाकला. मीच काय, नक्कीच त्यावेळी अनेक कोटी लोकांचा जीव एकाच वेळी भांड्यात पडला असणार. शेवटच्या बॉलपर्यंत कोण जिंकणार ते नक्की नव्हतं. (जसं अन्नू मलिकने किती गाण्यांच्या चाली चोरल्या आहेत ते नक्की नाही किंवा अजमल कसाबला कधी शिक्षा होणार ते नक्की नाही तसंच) अखेर नशीबाने भारताला साथ दिली आणि विजयश्रीने आपल्या गळ्यात माळ घातली.

१२४ धावांवर ८ विकेट्स अशा परिस्थितीत कोणीही भारत जिंकेल हे मान्य केलं नसतं. पण त्यावेळी दुखर्‍या पाठीचा त्रास सहन करूनही ऑस्ट्रेलियाशी झुंजणार्‍या लक्ष्मणच्या साथीला इशांत शर्मा आला आणि ८१ रन्सची भागीदारी करत १ अब्ज लोकांच्या आशा त्याने पुन्हा पल्लवित केल्या. इशांत शर्मा आऊट झाल्यावर (वास्तविक तो आऊट नव्हता हे टीव्ही रिप्लेमध्ये दिसत होतं. त्यामुळे याक्षणी पंच इयान गोल्ड यांना एवढ्या शिव्या मिळाल्या असाव्यात की, जर पूर्वीसारखी दिलेले शाप खरे होण्याची शक्ती आजकालच्या लोकांमध्ये असती तर त्यांचं जळून भस्मच झालं असतं!) अपेक्षाभंग होण्याचीच शक्यता दिसत होती, पण यावेळी दैव भारताच्या मदतीला धावून आलं. एकदा नव्हे तर तीनवेळा दैवाने आपल्याला मदत केली. हिलफेनहाऊसच्या ओव्हरमध्ये सुरेश रैना धावला, पण ओझा धावला नाही. पण नशीबाने अखेर दोघेही आपापल्या क्रीझमध्ये सुखरूप पोचले. पुढच्या जॉन्सनच्या ओव्हरमध्ये गोल्ड यांच्या चुकीचं प्रायश्चित्त बिली बाउडेन यांना घ्यावसं वाटल्याने त्यांनी ओझाला आऊट दिलं नाही. वास्तविक त्यावेळी त्याचा पाय सरळसरळ स्टंपच्या समोर होता, पण बॉल त्याच्या बॅटला लागून त्याच्या पायावर आदळला असं पंच बाउडेन यांना वाटलं. तरीही ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्याची संधी होती, कारण ओझा अजूनही क्रीझच्या बाहेरच घुटमळत होता! पण यावेळी नशीब भारतावर खूपच मेहेरबान होतं. स्टिव्हन स्मिथने केलेला थ्रो स्टंप्सना तर लागला नाहीच, पण त्याला अडवायला कोणी नसल्याने थेट सीमारेषेपलिकडे गेला! जाता जाता चार धावांचं दान भारताच्या पदरात घालून गेला. पुढच्या बॉलला दोन लेगबाय रन्स घऊन भारताने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Tuesday 5 October, 2010

श्रीगणेशा

मराठी ब्लॉग्ज वाचायला सुरुवात केली तेव्हा आपणही लिहावं असं मनात होतंच. (‘लग्न पाहावं करून’ च्या चालीवर ‘ब्लॉग पाहावा लिहून’) बर्‍याच ब्लॉग्जवर प्रतिक्रियांचा पाऊस पडायचा. ब्लॉगला भेट देणार्‍यांची संख्या हजारांत जायची. तेव्हा वाटायचं, ‘आपणही असा एखादा ब्लॉग लिहावा आणि तो अनेक लोकांनी वाचावा. अनेक लोकांना तो आवडावा.’ पण लिहायचं काय हा प्रश्न होताच. याआधी कधीही कोणत्याही प्रकारचं लेखन केलेलं नाही. त्यामुळे एकाच विषयावर सलग आणि मुख्य म्हणजे मुद्देसूद असे तीन-चार परिच्छेद लिहायचे म्हणजे तसं कठीणच काम होतं माझ्यासाठी. (आता वास्तविक या मुद्द्यात फारसा दम नाही. लग्न करताना लोक असं कुठे म्हणतात की, ‘याआधी कधीही लग्न केलेलं नाही. कसं झेपायचं मला लग्न?’ आणि असं म्हणाले तरीही लग्न तर करतातच की!) आणि सुचलं तरी नित्यनियमाने लिहायला वेळ मिळेल काय हा एक प्रश्न होताच.


पण आज काय झालं कोण जाणे, अचानक ब्लॉग सुरू केला. (मगाशी सांगितलं ना. ‘कसं झेपायचं लग्न?’ असं म्हणूनही लग्न केलं जातं. त्याच चालीवर ‘कसं झेपायचं लेखन?’ असं म्हणून मी ब्लॉग चालू केला.) ही माझी पहिली पोस्ट. ‘लिहायचं काय?’, ‘वेळ मिळेल का?’ हे आधी असणारे प्रश्न अजूनही आहेत. पण तरीही आज श्रीगणेशा झाला हेही नसे थोडके. आपलाही ब्लॉग असावा ही इच्छा तर पूर्ण झाली. आता तो ब्लॉग बर्‍याच लोकांनी वाचावा आणि त्यांना तो आवडावा ही इच्छा पूर्ण होते का बघू. आता प्रयत्न करेन नियमितपणे आणि विविध विषयांवर लिहिण्याचा. अर्थात माझं लिखाण चांगलं की वाईट हे येणारा काळ आणि ब्लॉगला भेट देणारे वाचक (जर कोणी असले तर! सध्या तरी या माझ्या पोस्टचा मी एकुलता एक वाचक आहे.) ठरवतील.


आता थोडं ब्लॉगच्या नावाबद्दल. ब्लॉग चालू करताना कोणत्या विषयावर लिहायचं ते नक्की नव्हतं. सुचेल तसं आणि सुचेल त्या विषयावर लिहायचं एवढंच ठरवलं होतं. त्यामुळे कोणत्याही विषयाचं बंधन नसलेल्या या ब्लॉगसाठी ‘स्वच्छंदी’ हेच नाव योग्य वाटलं मला. आणि म्हणूनच चित्रही गरुडाचं आहे. भेदक नजरेचा हा पक्षिराज म्हणजे अत्यंत मनस्वी पक्षी. स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारा. कोणत्याही बंधनात न अडकणारा. आणि म्हणूनच ‘स्वच्छंदी’ या नावाला साजेश्या चित्राची शोधाशोध करताना सगळ्यांत आधी गरुडाचीच छबी माझ्या डोळ्यांसमोर आली. असो. ही माझी पहिली पोस्ट. आता बघूया, आणखी किती लिखाण जमतंय ते.....