Monday 15 November, 2010

गोष्टी माणसांच्या

सुधा मूर्ती. नारायण मूर्तींच्या पत्नी आणि इन्फोसिस फाऊन्डेशनच्या अध्यक्षा आणि विश्वस्त या नात्याने त्या सर्वांना ठाऊक आहेतच. त्या संगणकशास्त्राच्या प्राध्यापिका आणि एक समाजसेविकाही आहेत. इन्फोसिस फाऊन्डेशनतर्फे अनेक संस्थांना, अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. कर्नाटक राज्यातल्या प्रत्येक शाळेत संगणक आणि वाचनालयाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्या एक प्रथितयश लेखिकाही आहेत. ‘महाश्वेता’, ‘वाईज अँड अदरवाईज’, ‘डॉलर बहू’, ‘हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज’ ही त्यांच्या पुस्तकांपैकी काही प्रसिद्ध पुस्तके. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता.

या दिवाळीच्या निमित्ताने मी माझ्या बहिणीकडे आलो होतो. तिथे `हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद माझ्या नजरेस पडला. लीना सोहोनींनी ‘गोष्टी माणसांच्या’ या नावाने हा अनुवाद केला आहे. वेळ घालवण्यासाठी मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पूर्ण झाल्यावरच खाली ठेवलं. पुस्तक पूर्ण होईपर्यंत वेळ कसा गेला कळलंही नाही. छोट्या गोष्टी, साधी सोपी भाषा आणि लेखिकेचं कथा सांगण्याचं कौशल्य या गोष्टींमुळे हे पुस्तक स्मरणीय झालेलं आहे. सुधा मूर्तींच्या आयुष्यात त्यांना भेटलेल्या अनेक माणसांच्या गोष्टी यात आहेत. पुस्तकाच्या पानापानांतून अनेक लोक गोष्टीरुपाने आपल्याला भेटतात आणि अनेक गोष्टी शिकवतात. प्रत्येकाने एकदा तरी वाचावं असं हे पुस्तक आहे आणि त्यातून शिकण्यासारख्या आणि घेण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत.

जमशेद टाटांबद्दलही एक गोष्ट यात आहे. सुधा मूर्ती जेव्हा इंजिनियरिंगला होत्या तेव्हा त्यांच्या कॉलेजात टेल्को कंपनीची नोकरासाठी नोटिस लागली होती. त्यात ‘स्त्रियांनी अर्ज करू नये’ असं लिहिलं होतं. त्यामुळे सुधाताईंना राग आला आणि त्यांनी जमशेद टाटांना एक खरमरीत पत्र लिहिलं. काही दिवसांनी त्यांना पुण्याहून एक पत्र आलं ज्यात त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं होतं. मुलाखतीमधून त्यांची निवड झाली आणि टेल्कोमध्ये फ्लोरवर काम करणारी पहिली महिला होण्याचा त्यांनी मान मिळवला. जमशेद टाटांना भेटल्यावर त्यांच्या निगर्वी व्यक्तिमत्त्वाने त्या भारावून गेल्या होत्या. एवढं खरमरीत पत्र लिहूनही जमशेदजींनी एकदाही त्या पत्राचा उल्लेख कधी केला नाही. वास्तविक त्या पत्राचा चोळामोळा करून त्यांना कचर्‍यात फेकता आला असता. पण त्यांनी आवर्जून सुधाताईंना मुलाखतीसाठी बोलावलं. स्त्री-पुरुष समानतेसाठी झगडू इच्छिणार्‍या एका मुलीच्या भावना त्यांनी समजून घेतल्या. एकदा त्या गाडीची वाट पाहात उभ्या होत्या तेव्हा निव्वळ त्यांना एकटीला थांबावं लागू नये म्हणून जमशेदजी टाटा नारायण मूर्ती ये‍ईपर्यंत सुधाताईंबरोबर थांबले. स्वतः मोठ्या उद्योगसमूहाचे मालक असूनही एका कर्मचार्‍याबद्दल दाखवलेली आपुलकी त्यांच्या मोठ्या मनाचं दर्शन घडवून जाते.

या पुस्तकात नारायण मूर्तींची स्फूर्तिदायी कथाही आहे. सुधाताईंच्या आईने त्यांना बचतीचं महत्त्व पटवून दिलं होतं. तिने त्यांना एक सल्ला दिलेला होता, ‘नेहमी थोडे पैसे बाजूला काढून ठेव. काहीही झालं तरीही त्या पैशांना हात लावू नकोस. अगदी आणीबाणीच्या वेळेस ते उपयोगी पडतील.’ तो सल्ला सुधाताई लग्नानंतर अमलात आणत होत्या. संगणक क्षेत्रात पैसा आहे हे नारायण मूर्तींनी हेरलं होतं. या क्षेत्रासाठी लागणारी बुद्धिमत्ता आणि मेहनती वृत्ती भारतात विपुल प्रमाणात आहेत हेही त्यांनी ओळखलं होतं. असं असताना भारतातील तरुणांनी परदेशी कंपन्यांसाठी काम करावं हे त्यांना पटत नव्हतं. म्हणून एक भारतीय सॉफ्टवेअर कंपनी आपण सुरू करावी असं त्यांच्या मनात होतं. सुरुवातीच्या भांडवलाची कमतरता होती. अशा वेळी सुधाताईंनी केलेली बचत कामी आली. त्यांनी दिलेल्या दहा हजार रुपयांमधूनच भांडवलाची सोय झाली आणि १९८१ साली इन्फोसिसची स्थापना झाली. आणि पुढे काय घडलं तो इतिहास सर्वज्ञातच आहे.

सुधाताईंच्या आजीची कहाणी शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी आहे. त्यांच्या आजीला एका सुधाताई एक मासिक वाचून दाखवायच्या. एकदा त्या एके ठिकाणी लग्नाला गेल्या होत्या. परत आल्यावर आजीशी बोलताना त्यांना जाणवलं की आजीचे डोळे पाणावलेले आहेत. कारण विचारल्यावर आजी म्हणाली, ‘तू लग्नाला गेल्यावर मला मासिक वाचण्याची इच्छा झाली होती. पण त्यातलं एकही अक्षर मला कळलं नाही. तेव्हा मला जाणीव झाली की शिक्षण किती महत्त्वाचं आहे. तेव्हा मीही आता शिकण्याचा निश्चय केला आहे. तू मला उद्यापासून शिकव. येत्या गुरुपौर्णिमेला ते मासिक स्वतः वाचण्याची माझी इच्छा आहे.’ त्यानंतर सुधाताईंची आणि आजीची शिकवणी सुरू झाली. गुरुपौर्णिमेपर्यंत आजी वाचायला शिकली होती. गुरुपौर्णिमेला ते मासिक सुधाताईंनी आजीला भेट म्हणून दिलं. एवढं वय झालेलं असतानाही आजी शिकली यावरूनच शिक्षणाचं महत्त्व सिद्ध होतं.

या आणि अशा अनेक कथा या पुस्तकात आहेत. ही छोटी कथामौक्तिके मनाला स्पर्शून जातात. काही वेळा डोळ्यांच्या कडा पाणावतात, तर कधी काही प्रसंगांतून मनाला उभारी मिळते. आपणही वाचताना कथेतल्या व्यक्तीप्रमाणे ती कथा जगतो. प्रत्येकाने आवर्जून वाचावं असं ‘गोष्टी माणसांच्या’ हे पुस्तक आहे. कधी मिळालं तर नक्कीच वाचा. सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित असणार्‍या आणि शब्दांचे फुलोरे न फुलवता साध्यासोप्या भाषेत लिहिलेल्या या कथा तुमच्या मनाचा नक्कीच ठाव घेतील.

14 comments:

 1. Have not read this particular book, but have read 'Wise and Otherwise'. Yes, her experiences are good and she expresses it so well.

  ReplyDelete
 2. हे पुस्तक टू रीड लिस्ट मध्ये कित्येक दिवसांपासून पडून आहे! :(

  ReplyDelete
 3. मी वाचलय. अप्रतिम पुस्तक आहे...

  ReplyDelete
 4. मागच्या मायदेश दौऱ्यात आठवणीने आणलीत सुधा मूर्तीची पुस्तक आणि त्यात हेही आहे....फक्त मला वाटत अनुवादापेक्षा त्यांची मूळ इंग्रजी वाचावीत जास्त भावतात...:)

  ReplyDelete
 5. सविताताई,
  हंऽऽ... त्यांचं मी वाचलेलं हे एकमेव पुस्तक. पण हे आवडलं मला. म्हणून आता आणखीही वाचण्याची इच्छा आहे. बघूया कधी योग येतोय ते.

  ReplyDelete
 6. विद्याधरभाऊ,
  वाच नक्की. साध्या सोप्या भाषेमुळे भावतं मनाला.

  ReplyDelete
 7. सुहास,
  हो. छान आहे. मुख्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असल्याने कंटाळा यायच्या आधीच त्या संपतात.

  ReplyDelete
 8. अपर्णा,
  इथे अमेरिकेत कुठली भारतातली पुस्तकं मिळायला? मी बहिणीकडे गेलो होतो तिथे निदान मराठी अनुवाद तरी होता. नाहीतर तोही वाचायला नसता मिळाला. पण मिळत असलं तर इंग्लिशमध्येही वाचायचं आहे एकदा. :-)

  ReplyDelete
 9. ऐकलंय या पुस्तकाबद्दल. वाचायचे आहे.

  ReplyDelete
 10. संकेत,
  वाच. छान हाय.

  ReplyDelete
 11. सुंदर पुस्तक आहे हे. मी वाचलं नाहीये पण ऐकलंय. काही वर्षांपूर्वी आईला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दिलं होतं हे. वाचायचा योग कधी येतो बघू..

  ReplyDelete
 12. वाच नक्की. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यामुळे कुठूनही वाचायला सुरुवात करता येते. आणि हो, फॉलोच्या लिंकवर क्लिक केल्याबद्दल धन्यवाद. बाप्पाच्या आशीर्वादाने तुला लवकरच पगारवाढ मिळेल... ;-)

  ReplyDelete
 13. मीही काही दिवसांपूर्वीच वाचलं हे पुस्तक. खूप आवडलं.सध्या सोप्या भाषेत आहे आणि हृदयस्पर्शी..

  ReplyDelete
 14. स्मित,
  हो रे. म्हणूनच मला आवडलं ते. आणि हो, ब्लॉगवर हार्दिक स्वागत.

  ReplyDelete