Tuesday, 9 November, 2010

बातम्या आणि प्रतिक्रिया

आजकाल वृत्तपत्रांत येणार्‍या बातम्या आणि त्यांवर येणार्‍या प्रतिक्रिया हा एक करमणुकीचा विषय झालेला आहे. वृत्तपत्रांच्या ऑनलाईन आवृत्त्या याबाबतीत जास्त आघाडीवर असतात. या वृत्तपत्रांच्या ऑनलाईन आवृत्तीत छापून येणार्‍या बातम्या आणि त्यावर येणार्‍या प्रतिक्रिया जर नित्यनियमाने कोणी वाचल्या तर त्याला आयुष्यात हसर्‍या क्षणांची कधीच कमतरता पडणार नाही! लोक तरी काय नामी प्रतिक्रिया देतात! त्या वृत्तपत्राच्या तमाम वाचकांची करमणूक करायची नैतिक जबाबदारी फक्त आपलीच आहे अशी बर्‍याच प्रतिक्रियाबहाद्दरांची समजूत असते. बातमी काहीही असो, त्यावरच्या प्रतिक्रिया मात्र अगदी भन्नाट असतात.  आणि नुसत्या प्रतिक्रियाच नव्हे, तर त्या देणार्‍यांनी धारण केलेली नावंही भलतीच मनोरंजक असतात. उदाहरणार्थ ही खालची काल्पनिक बातमी बघा...

भरदिवसा घर फोडून वीस हजारांची चोरी
समृद्ध भारत वृत्तसेवा
Thursday, September 23, 2010 at 10:35 PM (IST)

सातारा - सातारा जिल्ह्यातील तांदूळवाडी या गावात आज सकाळी भरदिवसा घरफोडी झाली. गावचे पाटील महेशचंद्र राजे यांच्या घरातून सकाळी ११ च्या सुमारास काही अज्ञात चोरांनी टी.व्ही., भांडीकुंडी आणि काही रोख रक्कम असा सुमारे वीस हजारांचा ऐवज लुटून नेला. स्थानिक पोलीस याबाबतीत तपास करत असून लवकरच चोराला पकडण्यात ते यशस्वी होतील अशी माहिती पोलिस निरीक्षक राजन चवाथे यांनी दिली. भामट्यांनी जीपमधून पलायन केले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील तांदूळवाडी गावात आज (२१ सप्टेंबर २०१०) सकाळी ११ च्या सुमारास चोरी झाली. गावचे पाटील महेशचंद्र राजे हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई राजे सुनेसह देवळात गेल्या होत्या. राजेंचा मुलगा सतीश राजे मुंबईत कामासाठी गेला आहे. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरांनी दिवसाढवळ्या राजेंचं घर फोडलं आणि मौल्यवान वस्तूंसह पोबारा केला. चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये घरातील दूरदर्शन संच, काही भांडीकुंडी आणि रोख रकमेचा समावेश आहे. सुदैवाने या प्रकारात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणी महेशचंद्र राजेंनी कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे आणि पोलिस या चोरीचा जातीने तपास करत आहेत. हे कृत्य चार चोरांच्या एका टोळीचे असावे असा पोलिसांचा संशय आहे. ही टोळी एका जीपमधून पळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या चोरीच्या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी सजग आणि जागरुक राहावे असा सावधगिरीचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
‘समृद्ध भारत’च्या प्रतिनिधीकडून

Tags: Theft, Satara, Raje, Tandulwadi, Koregaon

प्रतिक्रिया
सूर्यभद्रेश्वरानंद म्हणाले: (On September 24, 2010 8:00 AM)
इंग्लिशमध्ये तारीख २३ आहे, मराठीत २१ आहे. नक्की तारीख कोणती राव?

ठोंबे म्हणाले: (On September 24, 2010 8:03 AM)
शनिशिंगणापूरमध्येही चोरी होते आजकाल, सातार्‍याच्या चोरीचं एवढं काय घेऊन बसलात?

सचिन तेंडुलकर म्हणाले: (On September 24, 2010 8:03 AM)
२० हजार म्हण्जे फार नव्हे. गावचा पाटिल तो, त्याला पैशाचा काय तोटा? आनि तरीख २३ का २१?

महामहोपाध्याय म्हणाले: (On September 24, 2010 8:10 AM)
च्यायला, इंग्लिशमधे एक, मराठित एक तारिख. काय दारू मार्ता काय बात्म्या देताना?

कुमारी ब्रह्मकुमारी म्हणाले: (On September 24, 2010 8:27 AM)
कैच्याकैच बातम्या देता बै तुमी.

माननीय महोदया मनमोहिनीबाई मांजरमारे म्हणाले: (On September 24, 2010 8:45 AM)
चोरी झाली ही अतिशय गंभीर बाब आहे. याकडे पोलिसांनी आणि सामान्य जनतेने लक्ष दिलंच  पाहिजे. जय हिंद! जय महाराष्ट्र!

अजित जोशी म्हणाले: (On September 24, 2010 9:01 AM)
ओ संपादक! जरा तुमचं प्रतिक्रियांचं टेम्प्लेट सुधारा की! ‘ब्रह्मकुमारी म्हणाले’, ‘मनमोहिनी म्हणाले’.... बरं वाटतं काय ऐकायला? काय हे! काही लिंगभेद आहे की नाही? आणि आजकाल पहिल्या धारेची लावून येता काय बातम्या देताना? काहीही तारखा काय लिहिता?

परमपूज्य परमप्रकाशिता पद्मजाबाई पांजरपोळकर म्हणाले: (On September 24, 2010 9:09 AM)
अरे, एव्ढी मोठ्ठी चोरी झाली आहे आणी लोकांना त्याचे काही गांभीर्यच नाई! नुस्ते विनोद चाल्ले आहेत...

जगदीश सरंजामे म्हणाले: (On September 24, 2010 9:20 AM)
अहो मनमोहिनीबाई, स्वतःच्या नावापुढे ‘माननीय महोदया’ लावण्याची एवढी आग का तुम्हाला? हे वृत्तपत्र आहे, तुमच्या महिलामंडळाची मिटिंग नव्हे!

सलमान बट म्हणाले: (On September 24, 2010 9:45 AM)
तारखेचा गोंधळ घातला राव तुमी. कदी चोरी जाली काय कळंना जालंय बगा.....

अफझलखान म्हणाले: (On September 24, 2010 9:47 AM)
एव्ढी मोठि चोरी झाली आणी पोलिस काय zopa kadhat hote? te kahi nahi! choransoबत पोलिसन्नहि शासन व्हायला हवे.

आत्मजा महाबळ, New York म्हणाले: (On September 24, 2010 10:10 AM)
लोकांना काही seriousness च नाही! एवढी मोठी चोरी झाली आहे आणि एकजण इथे त्याकडे लक्ष दे‍ईल तर शपथ! आमच्या अमेरिकेत असं नसत

संपादक, समृद्ध भारत म्हणाले: (On September 24, 2010 10:10 AM)
तारीख २३ सप्टेंबरच आहे. मुद्रणदोषामुळे ती मराठीत ‘२१’ पडली आहे. तरी मी ‘समृद्ध भारत’ च्या समस्त कर्मचारीवर्गातर्फे आमच्या वाचकवर्गाची जाहीर क्षमा मागतो.

शिवाजी म्हणाले: (On September 24, 2010 10:32 AM)
त्या अफजलखानाला काही अक्कल आहे काय? झुरळासारखा चेचला होता मी त्याला! तुम्ही त्याचें काही ऐकू नका...... :-P

अजित जोशी म्हणाले: (On September 24, 2010 10:56 AM)
संपादक, तुमची माफी स्वीकारण्यात आलेली आहे.

गोदावरी राजापूरकर म्हणाले: (On September 24, 2010 11:11 AM)
ही पद्मजाबाई कसली डोंबलाची परमप्रकाशिता? लुब्री मेली!

नर्मदेतला गोटा म्हणाले: (On September 24, 2010 11:20 AM)
आत्मजाबाइ, नावापुढे New York कशाला? नुकतीच मुलाच्या किंवा मुलीच्या पैशाने अमेरिकावारी केलेली दिसतेय...

काकू म्हणाले: (On September 24, 2010 11:22 AM)
अयाई ग. अस वैट कोणच्याही घरी घडू नये.

बोकड म्हणाले: (On September 24, 2010 11:32 AM)
@ Above,
मग कस ‘वैट’ घडावं वो?????????

म्हसोबा म्हणाले: (On September 24, 2010 11:33 AM)
निषेध! निषेध! निषेध! चोरांना शिक्षा व्हायलाच हवी...

अ‍ॅना कुर्निकोवा म्हणाले: (On September 24, 2010 11:40 AM)
लई कल्ला करून राहिला बे हा...................................

Ranjit म्हणाले: (On September 24, 2010 11:51 AM)
Infosys che shares vadhle mhane

बातमीदार म्हणाले: (On September 24, 2010 11:57 AM)
अरे जोश्या, म्याच बघतोय्स काय्‌? सचिन चोपतोय. पार भुस्काट केलंय्‌ त्याने वॉटसन्च...

राखी सावंत म्हणाले: (On September 24, 2010 12:19 PM)
@ बातमीदार,
डोमकावळ्या, इथे चोरी झाली आहे आणि तुला म्याचचं पडलंय....................

राजहंस म्हणाले: (On September 24, 2010 12:27 PM)
पण मला एक कळत नाही.... चोरांनी घर फोडण्याची मेहेनत केली आणि फक्त भांडीकुंडी पळवली???? उपरती झाली की काय चोरी करताना?

हणमंत रेमडोके म्हणाले: (On September 24, 2010 12:56 PM)
I thnk, polis pan choranna samil asnar. nahitar choranne gip vaparli te kalla kasa?

मी मराठी म्हणाले: (On September 24, 2010 01:22 PM)
‘सकाळी भरदिवसा’ म्हणजे काय? दिवस असतो तेव्हाच तर सकाळ असते.............

अनामिक म्हणाले: (On September 24, 2010 01:35 PM)
To earn upto Rs. 20,000 a month, click on the following link.......

चड्डीचोर म्हणाले: (On September 24, 2010 01:48 PM)
pan eka jeepmadhye चर मन्स आनि एक tv एव्धे सग्ले मव्ले कसे? आम्हि कय तुम्हल मुर्ख वत्लो का?

आर आर आबा म्हणाले: (On September 24, 2010 02:37 PM)
अरे कलमाडींनी एवढा भ्रष्टाचार केला त्याचा तुम्हाला काही फरक पडत नाही आणि या फत्रूड चोरीचं एवढं कौतुक?????????

धोंडू अहमद जॉन म्हणाले: (On September 24, 2010 02:42 PM)
रमेश राजे एव्ढे सरपंच गावचे, आन्‌ त्यास्नी एक नवीन कुलुप घेता यीना व्हय घरासाठी?

Satyajit म्हणाले: (On September 24, 2010 02:43 PM)
@ ^^,
tyancha naav ramesh nahi, mahesh aahe......... :-P

रामचंद्र दामले म्हणाले: (On September 24, 2010 02:55 PM)
सत्यजित..... अहो विद्वान्‌, त्यांचें नांव महेंश नसून ‘महेंशचंद्र’ आंहे हों...

गजालीबहाद्दर म्हणाले: (On September 24, 2010 03:02 PM)
सत्यानाश होतलो त्या चोरांचो. मेल्यांक एवढीय लाज नसा काय? तुमी घाबरू नाका हां पोलिसांनू... तुमका सापडतले ते. मेले जातले खंय? सापडतले हंयसरच...

पहिले बाजीराव म्हणाले: (On September 24, 2010 03:09 PM)
laaj vATAyalaa havee coraaMnaa.

चिमाजी आप्पा म्हणाले: (On September 24, 2010 03:16 PM)
@ धाकटे बंधू बाजी (लोक त्यांना बाजीराव म्हणत असले तरीही आम्ही धाकटे बंधू या नात्याने ‘बाजी’च म्हणणार!)
लाज कसली? चोरी केली याची की गावच्या पाटलांच्या घरी जाऊनही फक्त वीस हजारच रुपये चोरले याची?

टॉम क्रूझ म्हणाले: (On September 24, 2010 03:21 PM)
प्रतिक्रिया वाचून मजा आली. येऊ द्या आणखी प्रतिक्रिया. चोर काय, पकडले जातीलच की कधीतरी.............

अनामिक म्हणाले: (On September 24, 2010 03:25 PM)
समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स... समृद्ध भारत सक्स...

राधिका बिर्जे, बी ए, एम ए, बी एड, एम एड म्हणाले: (On September 24, 2010 04:46 PM)
चोरांना पकडून जर त्यांच्यावर कारवाई करण्याचा पोलिसांचा डाव असेल तर तो आपण हाणून पाडायला हवा. अखेर तीदेखील माणसं आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर कारवाई केल्यावर मानवी अधिकारांचं उल्लंघन होईल आणि ‘मानवी अधिकार पायमल्ली प्रतिबंध समिती’ची अध्यक्षा म्हणून मी या गोष्टीला विरोध करते. चोरांवर कारवाई झाल्यास आमच्या संस्थेतर्फे सार्वजनिक उपोषणाचे आयोजन करण्यात ये‍ईल. प्रभातफेर्‍या निघतील. या चोरीला भारताचे परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे. परकीय राष्ट्रांशी मवाळ धोरण पत्करल्याने घुसखोर वाढतात आणि मग चोर्‍यामार्‍या वाढतात. गरीबी वाढते, कुपोषण वाढतं, सामाजिक प्रश्न वाढतात, भांडवलशाही वृत्ती वाढीस लागते. जागतिक भांडवलशाहीला माझा विरोध आहे. जय भारत, जय महाराष्ट्र, जय पिंपरी-चिंचवड, जय माअपाप्रस!!!

मल्हारराव भडंगे म्हणाले: (On September 24, 2010 05:26 PM)
बाऽऽऽऽऽपरे.... एव्ढी मोठ्ठ्ठ्ठ्ठी प्रतिर्किया! काय बै, काय गांजा लावला का?

सुहासनंदिनी म्हणाले: (On September 24, 2010 07:57 PM)
ही जोशांची सुमी राधिका बिर्जे नावाने लिहिते. मी चांगलं ओळखते तिला. माझे लेख प्रसिद्ध होतात आणि तिचे नाही, म्हणून जळते माझ्यावर आणि मग असलं काहीबाही खरडते. जळकुकडी कुठली!!!!

मनसे म्हणाले: (On September 24, 2010 08:03 PM)
या चिमाजीअप्पाला अम्निशीया झालाय्‌ वाट्टं. पहिले बाजीराव हे चिमाजीअप्पांचे थोरले बंधू होते, धाकटे नव्हे!

ब्रिगेड म्हणाले: (On September 24, 2010 08:33 PM)
वास्तविक ‘पोलिस या चोरीचा जातीने तपास करत आहेत’ च्या ऐवजी ‘पोलिस या चोरीचा बारकाईने तपास करत आहेत’ असे म्हणता आले असते या बातमीदाराला. पण जिथे तिथे जात काढण्याची सवयच आहे बामणांना. पण आम्ही ऐकणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही. जय भवानी!  जय शिवाजी!

aajari fevicol म्हणाले: (On September 24, 2010 08:41 PM)
comments evdhya aahet ki mul batmi kay tech visarlo

टीप: या लेखाचं महाजालावरच्या काही लेखांशी साम्य असल्याचं सूज्ञ वाचकांच्या ध्यानी आलं असेल. ते तसं असणं अपरिहार्य आहे, कारण ते लेख समोर ठेवूनच हा लेख लिहिलेला आहे! त्यामुळे या लेखाचं संपूर्ण श्रेय खालच्या लिंक्सना आहे. (अर्थात लेख जर नीट जमला नसेल तर त्याचं कारण अस्मादिकांचं लेखनदारिद्र्य आहे हेही चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आलं असेलच... :-) )

लेख आणि लेखावरच्या प्रतिक्रिया - वाईड ऍन्गल! - विद्याधर भिसे
इंडिकातून गाईची चोरी!; एकाला अटक
मधमाश्‍यांनी वाजवली बेल...
घाटात फुटला घाम...

21 comments:

 1. मुपि ऑल टाइम हिट पण सध्या मज्जा नाही उरली त्यात...:(
  तुझी पोस्ट वाचून तात्पुरता का होईना मुपि वाचत असल्याचा आभास झाला :)

  ReplyDelete
 2. धन्यवाद. मी सहसा लोकसत्ता वाचतो. मध्ये एकदा कधीतरी मुक्तपीठ वाचनात आलं आणि एकदम भक्तच झालो मी ईसकाळचा... एवढं जास्त मनोरंजन एकाच जागी मिळणं तसं कठीणच आहे ना आजकाल... ;-)

  ReplyDelete
 3. जबरदस्त रे दादा !!! मी ती इंडिकातून गायीच्या चोरीची बातमी वाचली होती. ह.ह.पु.वा!!! भारीच लिहिलेस. आणि ती माननीय महोदया मनमोहिनीबाई मांजरमारे तुझ्या सुपीक डोक्यातून आलेली का? माझ्या प्रश्नाचा रोख तुला कळला असेलच. नसेल कळला तर माझ्या ब्लोग्वरचा chat box तपास.

  ReplyDelete
 4. संकेत,

  पूर्वार्ध: धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद. :-)

  उत्तरार्ध: You got it! :-) एवढंच नव्हे, तर 'धोंडोपंत' आणि 'दगडी शिदोबा बेडकीहळ्ळीकर' (हे नाव पुलंकडून साभार बरं का...) हेही अस्मादिकच आहेत!! ;-)

  ReplyDelete
 5. हेरंब म्हणाले: (On November 09, 2010 03:05 PM)

  आयला संकेतराव, भारी जमलीये ही तुमची 'मुक्त' पणे 'पिटा'ई :)

  ReplyDelete
 6. संकेत म्हणाले: (On November 09, 2010 02:37 PM)

  कसचं कसचं... (इथे मी विनयाने मान खाली घातली आहे)

  ReplyDelete
 7. हसून हसून खाली पडायची वेळ आली राव....
  एकदम झक्कास....

  ReplyDelete
 8. थँक्यू थँक्यू... ब्लॉगवर हार्दिक स्वागत.

  ReplyDelete
 9. khare ahe, esakal chay pratikriyan sarkha time pass kuthe hi milnar nahi, hahahahaha!!!!!!!!!
  for e.g. sansonkar yardena, istrial varil pratikriya vachun tar khupcha hasayala yete

  ReplyDelete
 10. हो ना. आणि वर त्या प्राण्याला प्रतिक्रियेतही आपलं नाव लिहिण्याची खोड आहे. त्यामुळे त्या इस्रायल वाल्याच्या / वालीच्या प्रतिक्रियेत त्याचं / तिचं नाव दोनवेळा येतं...

  ReplyDelete
 11. लोळम् लोळम् पोटात गोळम् :))

  ReplyDelete
 12. ha ha ha....In fact Mumbaichi loka Sakalkade dhukun pan pahat nahi...pan MUPI mhanaje rikamya dokyala full on TP aahe mhanun mi aadhe madhe kuni buzz kela ki wachate....:)

  bhannat aahet commentors tithale....

  ReplyDelete
 13. हो ना. मीही लोकसत्ता किंवा कधी कधी महाराष्ट्र टाईम्स वाचतो. एकदा कधी तरी सकाळमधलं मुक्तपीठ वाचलं आणि एकदम प्रेमातच पडलो ‘सकाळ’च्या. एवढं मनोरंजन एकहाती कुठून मिळणार, नाही का?

  ReplyDelete
 14. शोकाकुल चल-आण said...
  लेख तर एकदम आदर्श झाला आहे.बाकी कोणाला फ़्लॅट हवा असल्यास मला संपर्क करावा.

  ReplyDelete
 15. त्रिलोक्यविहारिणी गुड्डीगुडगुडकंडीकर म्हणाले: (On November 14, 2010 12:36 PM)
  हाहाहा... धन्यवाद. हरभजन शतक ठोकणार बहुतेक आज... ;-)

  ReplyDelete
 16. ज ब रा...
  धन्य जाहलो...मुक्त रसात नाहलो...

  ReplyDelete
 17. धन्यवाद भाऊ... आपली कृपा असू द्या. पहिला संदर्भ आपल्याच लेखाचा आहे. :-)

  ReplyDelete
 18. संकेत.. हा पोस्ट तू स्वतः लिहिला आहेस??? भारी एकदम... मानला तुला... :) एक सो एक... हा तुझा आत्ता पर्यंतचा बेस्ट.. :)

  ReplyDelete
 19. हाहाहा मुपी ब्लॉग म्हणून तुझा ब्लॉग राहू दे संकेत..

  ReplyDelete
 20. रोहन,
  हो मी सव्ताच लिवलं ह्ये. धन्यवाद भौ. :-) अशीच कृपा राहू द्या ब्लॉगवर.

  मुक्त कलंदर,
  थांक्यू थांक्यू. :-)

  ReplyDelete