Sunday 17 October, 2010

विजयादशमी

विजयादशमी. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. सीमोल्लंघनाचा दिवस. सत्याने असत्यावर विजय मिळवल्याचा दिवस. अश्विन शुद्ध दशमीच्या या दिवशी नवरात्रोत्सवाची सांगता होते. प्रभू श्रीरामचंद्रांनी याचदिवशी रावणावर विजय मिळवला होता. अज्ञातवासात असलेल्या पांडवांनी शमीच्या झाडाच्या ढोलीतून याचदिवशी आपली शस्त्रं बाहेर काढली होती आणि कौरवांचा पराभव केला होता. कौत्साने याच दिवशी अयोध्येतील लोकांना सोनं वाटलं होतं. छत्रपती शिवरायांना याच दिवशी भवानीमातेने तलवार अर्पण केली होती. अशा अनेक कथा विजयादशमीशी संबंधित आहेत. आणि म्हणूनच या दिवसाला एका पूर्ण मुहूर्ताचा मान आहे.

रावणाने सीतेचं अपहरण केल्यावर प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली होती. तेरा दिवस तुंबळ युद्ध चालू होतं. त्या तेरा दिवसांत रावणाचे खंदे वीर एक-एक करून मारले गेले. त्याचे कुटुंबीयही युद्धात कामी आले होते. तेराव्या दिवसापर्यंत तो मुलगा मेघनाद, भाऊ कुंभकर्ण आणि इतर अनेक लोकांना गमावून बसला होता. अखेर अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी रामरावण युद्धात आमनेसामने आले आणि रामचंद्रांनी रावणाच्या पोटातील अमृतकुंभ फोडून त्याचा वध केला. सत्याने असत्याचा, प्रकाशाने अंधाराचा, न्यायाने अन्यायाचा पराभव केला.

चौदा वर्षांचा वनवास भोगल्यावर एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्यासाठी पांडव विराटाघरी राहिले होते. तेव्हा अज्ञातवास सुरू होण्याआधी त्यांनी आपली शस्त्रात्रं विराटनगराबाहेरच्या एका शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली. अज्ञातवास संपत आला असताना कौरवांना पांडव विराट राज्यात असल्याची शंका आली. त्यांनी पांडवांचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विराट राज्यावर चढाई केली. तेव्हा अर्जुनाने शमीच्या झाडाच्या ढोलीतून आपलं गांडीव धनुष्य काढून कौरवांचा एकहाती पराभव केला. आणि म्हणूनच दसर्‍याच्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा करण्याची प्रथा आहे.

दसर्‍याला आपट्याची पानं सोनं म्हणून देण्याच्या प्रथेमागेही एक कथा आहे. देवदत्त ऋषींचे पुत्र कौत्स ऋषी हे महर्षी विश्वामित्रांचे शिष्य होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते विश्वामित्रांकडे गेले आणि त्यांनी विश्वामित्र महर्षींना गुरुदक्षिणा मागण्याची विनंती केली. विश्वामित्रांनी या गोष्टीला नकार दिला. कौत्स हटूनच बसले. शेवटी नाईलाजाने विश्वामित्र म्हणाले, ‘वत्सा, मी तुला चौदा विद्या शिकवल्या. त्या प्रत्येक विद्येसाठी गुरुदक्षिणा म्हणून तू मला एक कोटी सुवर्णमुद्रा दे.’ एवढी गुरुदक्षिणा देणं कौत्सांना शक्य नव्हतं. त्यामुळे ते मदतीची याचना करायला रघुराजाकडे गेले. रघुराजा म्हणाला, ‘मी नुकताच विश्वजीत यज्ञ केला. त्यात केलेल्या दानधर्मामुळे माझ्याकडे आता एवढ्या सुवर्णमुद्रा शिल्लक नाहीत. पण आलेल्या याचकाला परत पाठवण्याचं पातक माझ्या हातून मी घडू देणार नाही. आपण तीन दिवसांनी या. तोपर्यंत मी मुद्रांची व्यवस्था करून ठेवतो.’ कौत्स ऋषी गेल्यावर त्याने सुवर्णमुद्रांसाठी इंद्राला विनंती केली. मुद्रा न दिल्यास युद्धाला तयार राहण्याचा इशाराही दिला. हा इशारा ऐकून इंद्राने कुबेराला अयोध्येवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडण्याची आज्ञा दिली. इंद्राच्या आज्ञेवरून कुबेराने अयोध्येवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाने त्या सुवर्णमुद्रा कौत्सांना आणि कौत्सांनी त्या मुद्रा विश्वामित्रांना दिल्या. विश्वामित्रांनी त्यातील १४ कोटी मुद्रा घेऊन बाकीच्या कौत्सांना परत केल्या. कौत्स त्या मुद्रा घेऊन रघुराजाकडे परत गेले, पण रघुराजाने दिलेलं दान परत घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्या उरलेल्या मुद्रा कौत्सांनी आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकांना त्या घ्यायला सांगितलं. तेव्हापासून आपट्याच्या झाडाची पानं सोनं म्हणून वाटण्याची पद्धत आहे.

अश्या या शुभदिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या विजयादशमीच्या दिवशी आपण सर्वांनी अपयशाचं सीमोल्लंघन करून यशाकडे वाटचाल करावी हीच माझी मनोकामना... :-)

8 comments:

  1. छान आहे पोस्ट....मी उशिरा वाचतेय पण तरीही शुभेच्छा...आणि हे १ वालं सरस्वतीच चित्र मी शोधात होते...मागच्या वर्षी एक पोस्ट लिहिली होती....तुला कुठे मिळालं?? मस्त आहे....:)

    ReplyDelete
  2. धन्यवाद. :-) तुलाही दसर्‍याच्या (उशीराने का होईना... किंवा असंही म्हणता ये‍ईल की पुढच्या वर्षाच्या दसर्‍यासाठी आत्तापासूनच.. ;-) ) हार्दिक शुभेच्छा. आणि हे चित्र मी काढलं आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये. मीही वास्तविक शोधत होतो १ ची सरस्वती, पण मिळाली नाही. शेवटी स्वतःहून काढावी लागली.

    ReplyDelete
  3. अरे तुझ्या कल्पनाची आईडिया सही आहे...तशी मी वाट चुकून संगणकी दुनियेत आले आहे...त्यामुळे इतका साधा उपाय पण सुचला नाही बघ....
    तसं बी आपण अजाबात चित्रकलेच्या फंदात पडत न्हाई बगा.....तुमची बरीच चांगली दिसते....:)

    ReplyDelete
  4. तशी बरी हाय. म्हन्जी सॉफ्टवेअर सोडून बाकी गोष्टी मस्नी जमतात. खराखुरा कंप्यूटर इंजिनिअर आहे मी. कंप्यूटरमधलं काहीही कळत नाही मला.... ;-)

    ReplyDelete
  5. तो स्वल्पविराम आहे म्हणून ठीक..नाहीतर...
    दसरा सण मोठा नाही, आनंदा तोटा! ;)

    ReplyDelete
  6. हो रे. मराठी भाषा वाकवावी तशी वाकते. आता हेच बघ ना... ‘सडासंमार्जन’ या शब्दातला अनुस्वार एका ‘स’ वरून दुसर्‍या ‘स’ वर टाकल्यावर अर्थाचा अनर्थ होतो... ;-)

    ReplyDelete
  7. शुभेच्छांची हलकी-फुलकी पोस्ट छान आहे.. पण शेवटच्या २ कमेंट्स भारी... कैच्याकै... :D

    ReplyDelete