Sunday, 31 October 2010

माझी शिक्षणयात्रा - २

माझी शिक्षणयात्रा - १

चित्रकला हाही माझ्या शत्रुपक्षातला एक विषय. सर वर्गात आल्यावर नेहमी एक यादी वाचून दाखवायचे. पेन्सिल, रंग, पट्टी, खोडरबर वगैरे वगैरे. त्या यादीतली एखादी गोष्ट आम्ही आणली नसेल तर आम्हाला वर्गाबाहेर काढायचे. काही काळानंतर आम्ही सरांनी बाहेर जायला सांगण्याची अपेक्षा ठेवणं बंद केलं. यादी वाचताना प्रत्येक गोष्टीचं नाव घेतल्यावर काही मुलं स्वतःहून बाहेर पडू लागली. माझ्याकडे नेहमी कुठलीतरी गोष्ट मिसिंग असायची. त्यामुळे मी चित्रकलेत लहानपणापासूनच एक Out-standing विद्यार्थी होतो! एकदा तर ७८ मुलांपैकी ७५ मुलं वर्गाच्या बाहेर होती! मी अर्थातच त्यात होतो. बाहेर काढल्यावर आम्ही इतर कुठे उंडारायला न जाता वर्गाबाहेरच रांग लावली. आमची ही भलीमोठी रांग थेट मुख्याध्यापिका बाईंच्या ऑफिसपर्यंत पोचली होती. आमचा गलका ऐकून त्या घाबरून बाहेर आल्या आणि एवढी मोठी रांग बघून चक्रावल्या. मग खरी कहाणी ऐकल्यावर आम्हाला एक मोठं लेक्चर दिलं त्यांनी आणि चित्रकलेच्या सरांना सांगून आम्हाला आत घ्यायला सांगितलं.

चित्रकलेत आम्हाला ‘स्केचबुक’ नावाचा एक प्रकार होता. ही एक दोनशे पानांची वही असायची ज्यात आम्ही दर दिवशी एक चित्र काढणं अपेक्षित होतं. आता दर दिवशी आवर्जून एक चित्र काढावं एवढं काही माझं चित्रकलेवर प्रेम नव्हतं. बर्‍याचदा तर ती वही वर्ष संपेपर्यंत विकतही घेतलेली नसायची. मग शेवटच्या काही आठवड्यांत सर वही तपासायला सुरुवात करायचे. आणि प्रत्येक अपूर्ण असलेल्या चित्रासाठी हातावर एक फटका मारायचे. मग वही विकत घेतली जायची. आता काही आठवड्यांतच दोनशे चित्र कशी काढणार? मग माझ्या अफाट चित्रप्रतिभेला बहर यायचा. दोन उभ्या सरळ रेषा आणि त्यांच्यामध्ये पुष्कळशा आडव्या रेषा (शिडी), दोन आडव्या रेषा आणि त्यांच्यामध्ये बर्‍याचश्या उभ्या रेषा (तिरडी), एक वर्तुळ आणि त्यामध्ये दोन उभ्या सरळ रेषा (क्रिकेटचा बॉल) अशी चित्र काढायचो मी! आणि त्याखाली काढलेलं चित्र समजायला सोपं जावं म्हणून त्या चित्राचं नावही लिहायचो. एक आठवड्यात वही भरायची! (साहजिक आहे. नुसती वर्तुळं आणि सरळ रेषा काढायला कितीसा वेळ लागणार?) प्रत्येक चित्रागणिक सरांच्या रागाचा पारा एक अंशाने वर चढायचा. आणि मग ती वही पूर्ण असूनही मी मार खायचो!

जीवशास्त्राचंही माझ्याशी असंच विशेष जिव्हाळ्याचं नातं होतं. भूगोलापेक्षाही जास्त प्रेम मी जीवशास्त्रावर केलं आहे. आणि त्यातून मी पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेला असल्यामुळे मराठीत असलेल्या त्या जीवशास्त्रीय शब्दांनी हे स्नेहसंबंध वाढवण्याचं काम मोठ्या मेहनतीने पार पाडलं होतं. मी भुताला कधी घाबरलो नाही एवढा त्या शब्दांना घाबरलो आहे! जीवशास्त्राचं ते पुस्तक वाचताना बर्‍याचदा आपण पाली किंवा अर्धमागधी भाषेतलं एखादं पुस्तक वाचत आहोत असा भास व्हायचा. ‘Cerebrospinal Fluid’ साठी असलेला ‘प्रमस्तिष्कमध्यमेरु तरलद्रव’ हा शब्द पाठ होईपर्यंत माझी नववी संपली होती! (ही मस्करी नव्हे. खरंच असं झालं होतं. हा शब्द तिमाही आणि सहामाहीमध्ये मी केवळ लक्षात नसल्याने लिहिण्याचं टाळलं होतं आणि पाठ करून तो शब्द वार्षिक परीक्षेत लिहिला होता. अर्थात त्या शब्दाचा आणि वार्षिक परीक्षेचा काही संबंध नव्हता. कारण, सहामाहीचा आणि वार्षिक परीक्षेचा सिलॅबसच वेगळा होता! पण तरीही मी हा शब्द काहीतरी निमित्त काढून कुठल्यातरी उत्तरात घुसवला होता.) ‘तेलनिमज्जनवस्तुभिंग’ हा असाच एक भारदस्त शब्द. मला हा शब्द म्हणताना हनुमान चलिसा किंवा रामरक्षा म्हटल्यासारखं वाटायचं. बरं, हे प्रकरण नुसतं एवढ्यावरच थांबायचं नाही. एकाच गोष्टीला वेगळ्या इयत्तांमध्ये वेगळे शब्द असायचे! म्हणजे शब्द पाठ होईपर्यंत वर्ष संपायचं आणि वर्षाअखेरीस त्या पाठांतराचा उपयोग शून्य! कारण, नवीन शब्द यायचे. Arteries आणि Veins ना एका वर्षी आम्ही ‘धमन्या’ आणि ‘शिरा’ म्हणायचो तर दुसर्‍या वर्षी ‘रोहिणी’ आणि ‘नीला’! Auricle आणि Ventricle हे हृदयाचे कप्पे एका वर्षी ‘अलिंद’ आणि ‘नीलय’ होते तर पुढच्या वर्षी ‘जवनिका’ आणि ‘कर्णिका’! काही वाक्यंही अशीच गूढ असायची. अशी वाक्यं समजून घेण्यापेक्षा ती पाठ करून परीक्षेत जशीच्या तशी लिहिणं जास्त सोपं होतं. ‘ग्रसनीस कल्ला व विदरे नसतात’ हे असंच एक वाक्य! शाळा सोडून दहा वर्षं झाली तरीही या वाक्यातले मला आत्तापर्यंत कळलेले शब्द दोनच आहेत: ‘व’ आणि ‘नसतात’! एकूणच काय, मराठी जीवशास्त्रातला एखादा शब्द जरी एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यात शिरला तर पुस्तक छापणार्‍याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद त्यावेळी घटनेत असावी बहुतेक! अशा वातावरणात वाढल्यामुळे मी दहावीनंतर जीवशास्त्राला कायमचा रामराम करण्याचं ठरवलं होतं. पण म्हणतात ना, Man proposes and God disposes. तसंच झालं. अकरावीत व्होकेशनल विषयांना प्रवेश न मिळाल्याने परत एकदा दोन वर्षांसाठी जीवशास्त्रच घ्यावं लागलं!

बारावीच्या जीवशास्त्राच्या तोंडी परीक्षेत मी आमच्या परीक्षकांना घेरी आणली होती. परीक्षकांच्या टेबलावर एक उंदीर कापून ठेवला होता. आळीपाळीने ते एकेकाला टेबलापाशी बोलावत आणि प्रश्न विचारत. होता होता माझा नंबर आला. मी आत्मविश्वासाने परीक्षकांच्या टेबलापाशी गेलो. (हा आत्मविश्वास ‘कोणताही प्रश्न विचारा, माझा अभ्यास झालेला आहे’ असा नसून ‘कोणताही प्रश्न विचारा, मला त्याचं उत्तर न येण्याचीच शक्यता  आहे’ असा होता!) सोप्या प्रश्नाने सुरुवात करावी म्हणून त्यांनी विचारलं, ‘हा नर आहे की मादी?’ मी ताडकन उत्तर दिलं, ‘नर’. हिंदी सिनेमात नायकाचं काही बरंवाईट झालं तर नायिका फोडते तसली एक अस्फुट आवाजातली किंकाळी परीक्षकांच्या तोंडून बाहेर पडली. ‘व्हॉऽऽऽऽट?’. तो उंदीर म्हणजे नर नसून मादी होती हे त्या किंकाळीमागचं कारण होतं. बसलेल्या धक्क्यातून सावरून त्यांनी एका अवयवाकडे बोट दाखवून त्याचं नाव विचारलं. माझा आत्मविश्वास अजूनही कायम होता. (आजकाल एकही चित्रपट हिट होत नसतानाही देव आनंदचा कायम आहे तसाच!) मी सांगितलं, ‘फॅलोपियन ट्यूब’! परीक्षकांच्या दोन्ही भुवया उंचावल्या गेल्या. काहीतरी चुकलं आहे याची मला जाणीव झाली आणि मी उत्तर बदललं, ‘युरिनरी ब्लॅडर’. मी दांडपट्टा चालवल्यासारखी उत्तरं देत होतो आणि परीक्षक त्यात जखमी होत होते. ‘युरिनरी ब्लॅडर’ ऐकल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर गोंधळल्याचे आणि आर्जवाचे भाव दिसले. ‘निदान एक तरी उत्तर बरोबर दे’ अशी विनवणी त्यांत दिसत होती. मी आणखी एक दांडपट्टा चालवला. ‘नो सर, इट्स अ‍ॅक्च्युअली युटेरस’. परीक्षकांनी एका हाताने टेबल धरलं. बहुतेक त्यांना भोवळ आली असावी. कारण मला जायला सांगून ते पाणी प्यायला उठले! गंमतीची गोष्ट म्हणजे उंदराचा तो अवयव कोणता होता आणि ‘फॅलोपियन ट्यूब’ आणि ‘युटेरस’ म्हणजे काय हे मला अजूनही माहित नाही!

क्रमशः

19 comments:

  1. संकेत,हे सगळ वाचतांना मजा येतेय आणि काही जुन्या आठवणीही जिवंत होत आहेत ...मस्तच ,येउन दे अजुन...

    ReplyDelete
  2. धन्यवाद देवेंद्रभाऊ. ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत. :-)

    ReplyDelete
  3. वा डाइरेक्ट बालपणात नेलस तू..आवडला आवडला.

    ReplyDelete
  4. अहो, असे बरेच किस्से आहेत. म्हणूनच मला अजूनही शाळेची आठवण येत असते नेहमी. शाळेतले दिवस म्हणजे मंतरलेले दिवस होते.

    ReplyDelete
  5. ‘अहो’ मत कहो ना. :-) अहो म्हणण्याएवढा मी मोठा नाही. मला एकेरी उल्लेख केलेला जास्त आवडेल.

    बरय, कॉपी-पेस्ट करायला मिळाल...सुहास, सुझे काय म्हणायाच ते म्हण पण अहो मत कहो ना ;-)

    ReplyDelete
  6. अरे वा... कॉपी-पेस्ट केलेली असली तरी धन्यवाद. कारण ही प्रतिक्रिया दुसर्‍या लेखावरची आहे. म्हणजे कॉपी करण्याच्या बहाण्याने का होईना, माझ्या दुसर्‍या लेखाला भेट दिली गेली... ;-)

    ReplyDelete
  7. अरे तो वाचला होता मी कालच...असो पुढचा भाग येऊ देत :)

    ReplyDelete
  8. It is bit nostalgic .. you should write more of this stuff ... I mean real life experiences!

    ReplyDelete
  9. धन्यवाद. आणि आवर्जून फॉलोच्या लिंकवर क्लिक केल्याबद्दल पुनः एकदा धन्यवाद. :-) आणि असे बरेच अनुभव आहेत. लिहीन नक्की आणखी.

    ReplyDelete
  10. जुन्या आठवणी जिवंत झाल्या . भन्नाट विनोदी लिहिलेस. मला ११वि ला घडलेला त्वरण च किस्सा आठवला. कुणाला acceleration म्हणजे "त्वरण" हे आठवेचना . धन्यवाद रे.. येऊ देत अजून, दादा !!

    ReplyDelete
  11. आम्हीही अकरावीत सुरुवाती-सुरुवातीला मराठीतून उत्तरं द्यायचो. इंग्लिश बोलण्यातही मराठी शब्द यायचे. म्हणजे इंग्रजीच्या नावाने अजूनही बोंबच आहे माझी, पण निदान उत्तरात मराठी शब्द घुसवण्याची वेळ तरी येत नाही..

    ReplyDelete
  12. हा हा... हे शब्द तुला अजुन आठवले. मानलं राव. मी लेखाच्या पुढच्या परिच्छेदात गेलो आणि ते शब्दपण स्मृतीतुन लोपले... :D

    ReplyDelete
  13. अरे ते आठवण्याचं कारण म्हणजे मी ते शब्द खरंच घोकून पाठ केले होते. नववीच्या जीवशास्त्रातलं एवढंच आठवतंय मला सध्या! (अर्थात, नववीच्या परीक्षेतही मला तेवढंच आठवत होतं! बाकीचं कधीच माझ्या डोक्यातून निघून गेलं होतं...)

    ReplyDelete
  14. संकेत, मी चित्रकला संपूर्ण outsourced केली होती....कशी ते नन्तर सांगेन....:) पण आम्हाला आठवीनंतर चित्रकला नव्हती याचा सगळ्यात जास्त आनंद मी (आणि मग माझी ताई...) यांना झाला असावा..
    आणि सेम पिंच मी पण संपूर्ण मराठी माध्यमात शिकले आहे....आणि खरच त्या शब्दांमुळेच माझा बारावीनंतर मेडिकलला जायचा चानस हुकला बघ....बाकी तर तुला माझ "जाना था जापान" माहित आहेच....मस्त झालेत दोन्ही लेख.....:)

    ReplyDelete
  15. मीही चित्रकला कधीकधी आऊटसोर्स करायचो. म्हणजे एकदा चित्रकलेच्या पेपरात मला एक माणूस काढणं जमत नव्हतं. तेव्हा मी आणि माझ्या मित्राने एकदमच पेपर्स खाली टाकले आणि उचलताना एकमेकांचे उचलले! आणि मग थोड्या वेळाने परत आमचे पेपर्स एकत्रच खाली पडले आणि त्यावेळेला मात्र आम्ही स्वतःचेच पेपर्स उचलले! हीहीही... तू काय ताईकडून चित्रकला आऊटसोर्स केलीस की काय? आणि हो, एवढ्या सगळ्या प्रतिक्रिया दिल्यास आवर्जून, त्याबद्दल धन्यवाद. आणि फॉलोवर क्लिक केल्याबद्दल शेपरेट धन्यवाद... :-)

    ReplyDelete
  16. चित्रकलेबाबत नसले तरी जीवशास्त्राबाबत सेम पिंच रे.... कधीच झेपले नाही ते प्रकरण मला... म्हणून अकरावी/बारावीत Bio ऐवजी भुगोल हा विषय घेतला होता मी!!!

    हो पण बहिणीचे अगदी मेडिकलचे जर्नल्स चित्रांनी सजवायचे काम चोख पार पाडावे लागले होते मला....

    मस्त आहे पोस्ट!!

    ReplyDelete
  17. थांक्यू थांक्यू.. माझी चित्रकला एवढीही चांगली नसल्याने मला कधी कोणाचं जर्नल लिहावं लागलं नाही. तेवढा एक फायदा होता चित्रकलेचा.

    ReplyDelete
  18. जीवशास्त्राच्या ह्या जाचातून मी वाचलो... मी हे इंग्रजी मधून केले... :) ते शब्द भारी आहेस... माझा गेम झाला असता.. :D

    ReplyDelete
  19. रोहन,
    माझा झाला होता ना गेम. म्हणून तर जीवशास्त्राविषयी विशेष जिव्हाळा आहे मला.. :-D

    ReplyDelete