Wednesday, 6 October 2010

अविस्मरणीय

व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
अविस्मरणीय, थरारक, लक्षवेधक... भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पहिल्या कसोटी सामन्याचं वर्णन करायला शब्द कमी पडतील. हा सामना बघताना एखादा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बघत असल्यासारखं वाटत होतं मला. एवढी अटीतटीने लढली गेलेली ही मॅच अखेर भारताने जिंकली, तेव्हा मी सुटकेचा निःश्वास टाकला. मीच काय, नक्कीच त्यावेळी अनेक कोटी लोकांचा जीव एकाच वेळी भांड्यात पडला असणार. शेवटच्या बॉलपर्यंत कोण जिंकणार ते नक्की नव्हतं. (जसं अन्नू मलिकने किती गाण्यांच्या चाली चोरल्या आहेत ते नक्की नाही किंवा अजमल कसाबला कधी शिक्षा होणार ते नक्की नाही तसंच) अखेर नशीबाने भारताला साथ दिली आणि विजयश्रीने आपल्या गळ्यात माळ घातली.

१२४ धावांवर ८ विकेट्स अशा परिस्थितीत कोणीही भारत जिंकेल हे मान्य केलं नसतं. पण त्यावेळी दुखर्‍या पाठीचा त्रास सहन करूनही ऑस्ट्रेलियाशी झुंजणार्‍या लक्ष्मणच्या साथीला इशांत शर्मा आला आणि ८१ रन्सची भागीदारी करत १ अब्ज लोकांच्या आशा त्याने पुन्हा पल्लवित केल्या. इशांत शर्मा आऊट झाल्यावर (वास्तविक तो आऊट नव्हता हे टीव्ही रिप्लेमध्ये दिसत होतं. त्यामुळे याक्षणी पंच इयान गोल्ड यांना एवढ्या शिव्या मिळाल्या असाव्यात की, जर पूर्वीसारखी दिलेले शाप खरे होण्याची शक्ती आजकालच्या लोकांमध्ये असती तर त्यांचं जळून भस्मच झालं असतं!) अपेक्षाभंग होण्याचीच शक्यता दिसत होती, पण यावेळी दैव भारताच्या मदतीला धावून आलं. एकदा नव्हे तर तीनवेळा दैवाने आपल्याला मदत केली. हिलफेनहाऊसच्या ओव्हरमध्ये सुरेश रैना धावला, पण ओझा धावला नाही. पण नशीबाने अखेर दोघेही आपापल्या क्रीझमध्ये सुखरूप पोचले. पुढच्या जॉन्सनच्या ओव्हरमध्ये गोल्ड यांच्या चुकीचं प्रायश्चित्त बिली बाउडेन यांना घ्यावसं वाटल्याने त्यांनी ओझाला आऊट दिलं नाही. वास्तविक त्यावेळी त्याचा पाय सरळसरळ स्टंपच्या समोर होता, पण बॉल त्याच्या बॅटला लागून त्याच्या पायावर आदळला असं पंच बाउडेन यांना वाटलं. तरीही ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्याची संधी होती, कारण ओझा अजूनही क्रीझच्या बाहेरच घुटमळत होता! पण यावेळी नशीब भारतावर खूपच मेहेरबान होतं. स्टिव्हन स्मिथने केलेला थ्रो स्टंप्सना तर लागला नाहीच, पण त्याला अडवायला कोणी नसल्याने थेट सीमारेषेपलिकडे गेला! जाता जाता चार धावांचं दान भारताच्या पदरात घालून गेला. पुढच्या बॉलला दोन लेगबाय रन्स घऊन भारताने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.



जय-पराजयातला फरक
वास्तविक दिवसाच्या सुरुवातीला सगळ्या आशा सचिनवर केंद्रित झाल्या होत्या. झहीर परतल्यावर सचिनने लक्ष्मणच्या साथीने किल्ला लढवून त्या सार्थही ठरवल्या होत्या. पण सचिन, धोनी आणि हरभजन एकापाठोपाठ आऊट झाल्याने सगळ्या स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. अशा वेळी भारताच्या मदतीला लक्ष्मण नावाचा शूर शिलेदार धावून आला. त्याने आणि इशांत शर्माने ८१ रन्सची भागीदारी केली आणि लोकांना परत कंठ फुटले. या भागीदारीत लक्ष्मणने रन्स काढण्याची संधी कधी सोडली नाही. धावफलक कायम हलता ठेवून ऑस्ट्रेलियन खेळाडू कधीही वरचढ होणार नाहीत ही काळजी त्याने घेतली. बोलर असूनही त्याने इशांतवर कायम विश्वास दाखवला. बर्‍याच वेळा त्याने ओव्हरच्या सुरुवातीलाच एक रन घेतली आणि बाकीचे बॉल इशांतला खेळू दिले. त्या दोघांच्या भागीदारीत इशांतच जास्त बॉल खेळला होता. (१३० पैकी ९२) स्वतः रन्स काढताना इशांतवर दडपण येणार नाही ही काळजीही लक्ष्मणने घेतली. त्याने इशांतचा आत्मविश्वास कायम राहावा म्हणून वेळोवेळी जाऊन त्याला सल्ले दिले. संकटसमयी कसं खेळावं याचं प्रात्यक्षिक त्याने दाखवून दिलं.

भारताने लढाऊ बाणा आणि झुंजार वृत्ती दाखवली आणि आपण जगात कसोटी सामन्यांत अव्वल क्रमांकावर का आहोत हे दाखवून दिलं. पण या विजयाचं खरं श्रेय इशांत आणि खासकरून लक्ष्मणला आहे. लक्ष्मणची ही खेळी पुढची अनेक वर्षं क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात राहील.अविस्मरणीय, लाजवाब हे शब्द कमी पडावेत असं कौशल्य, जिद्द आणि लढाऊ बाणा दाखवला त्याने. दुखर्‍या पाठीचा सामना करत रनर घेऊन तो खेळत राहिला, स्वतःच्या डोळ्यांसमोर विकेट्स पडताना पाहूनही लढत राहिला आणि अखेर जिंकला. त्याची आजची खेळी भारतासाठी ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ असली तरीही ऑस्ट्रेलियासाठी ती कायम ‘व्हेरी व्हेरी सिकनिंग’ राहील. थ्री चिअर्स फॉर द अनसंग हिरो लक्ष्मण... :-)

8 comments:

  1. मस्त रे......

    पोस्ट वाचताना परत एकदा थरार अनुभवला......

    ReplyDelete
  2. सचिन,
    खूप खूप धन्यवाद. आणि ब्लॉगवर मनापासून स्वागत. तुम्ही पहिले वाचक आहात या ब्लॉगचे. तुमची प्रतिक्रिया पाहिली आणि एवढा आनंद झाला म्हणून सांगू! पहिलेपणात एवढा आनंद असतो हे माहित नव्हतं.

    ReplyDelete
  3. खरच यार, काळाची मॅच एकदम भारी झाली, आणि वरुन ब्लॉग वर केलेल वर्णनपण खूप छान आहे.

    ReplyDelete
  4. अभिषेक,
    मनःपूर्वक धन्यवाद. आणि ब्लॉगवर हार्दिक स्वागत.

    ReplyDelete
  5. >>पहिलेपणात एवढा आनंद असतो हे माहित नव्हतं.
    आता अजून खूप पहिलेपणं करायची आहेत.. :D
    ऑल द बेस्ट...

    ReplyDelete
  6. धन्यवाद. पन कललं न्हाय वो काय म्हनायचंय तुमाला ते...

    ReplyDelete
  7. पहिले ५०, पहिले १०० आणि.... ;)

    ReplyDelete
  8. हरीच्छा बलीयसि बाबा. ‘त्या’च्या मनात असेल तर होईल. :-)

    ReplyDelete