Friday 26 November, 2010

एका कार्यकर्त्याची मुलाखत

मुलाखतकार: नमस्कार, मी दैनिक ‘समृद्ध भारत’ मधून आपली मुलाखत घ्यायला आलो आहे.
कार्यकर्ता: (स्वगत: च्यायला, एकटाच आला. मी आणखी तीन पेपरांच्या प्रतिनिधींना बोलावलं होतं. आता प्रसिद्धीचे दुसरे मार्ग शोधायला हवेत. ब्लॉग लिहायला सुरुवात केली पाहिजे आता) नमस्कार, या या. (स्वयंपाकघराकडे वळून) अगं ए, जरा दोन कप चहा ठेव गं. (मुलाखतकाराकडे वळून) तसा मला अजिबात वेळ नसतो. मी भयंकर व्यस्त असतो. कामं असतात हो. आजही दोन अपॉइंटमेंट्स रद्द कराव्या लागल्या या मुलाखतीसाठी.
मुलाखतकार: पण मला तर संपादक म्हणत होते की तुम्ही बरेच दिवस आमच्या कार्यालयात फोन करून आम्ही तुमची मुलाखत घ्यावी म्हणून विनवत होतात. आता तुम्ही आमच्या पेपरला देणगी देणार असं ऐकल्यावर संपादकांनी मला पाठवलं मुलाखत घ्यायला...
कार्यकर्ता: !!!
मुलाखतकार: (आयला, मी बहुतेक भलतंच काहीतरी बोललो. आता सारवासारव करायला हवी...) अं... फार उकडतंय नाही?
कार्यकर्ता: (स्वगत: संपादक साला बामण आहे. म्हणून माझी बदनामी करतोय...) हो ना. एसी लावू का? आमच्याकडे एसी आहे ना! मागच्याच आठवड्यात घेतला. ४५ हजारांना...
मुलाखतकार: (स्वगत: ४५ हजारांना घ्या, नाहीतर ४५ लाखांना. मला काय करायचं आहे?) तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी राजेंद्र साठे. दैनिक ‘समृद्ध भारत’ मध्ये वार्ताहर म्हणून कामाला आहे.
कार्यकर्ता: (हाही भटच आहे! साल्याला वास्तविक मी मुलाखत द्यायला नको, पण बाकीच्या वृत्तप्रतिनिधींनी माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, तेव्हा याला उत्तरं द्यावीच लागणार. अडला हरी... दुसरं काय?) अच्छा. बोला. काय विचारायचं आहे तुम्हाला?
मुलाखतकार: आपलं नाव काय?
कार्यकर्ता: तुम्हाला माझं नावही माहित नाही?
मुलाखतकार: अहो, मला माहित आहे हो. पण मुलाखतीत नाव विचारण्याची पद्धत असते म्हणून विचारलं.
कार्यकर्ता: बरं. माझं नाव सुमीतराजे रामटेकवांदेकर.
मुलाखतकार: आपलं शिक्षण किती झालं आहे?
कार्यकर्ता: मी फार्टोग्राफीमध्ये डिग्री घेतली आहे.
मुलाखतकार: कशामध्ये???
कार्यकर्ता: फार्टोग्राफी
मुलाखतकार: Ohh.. You mean Photography!
कार्यकर्ता: हां, तेच ते...
मुलाखतकार: पण तुमच्या शाळेत जाऊन आलो मी. तिकडचे रेकॉर्ड्स बघितल्यावर कळलं की चौथीत तीनवेळा नापास झाल्यावर तुम्हाला शाळेतून काढलं.
कार्यकर्ता: तिकडचे सगळे मास्तर बामण होते. हा माझी बदनामी करण्यासाठी रचलेला बामणी कावा आहे!
मुलाखतकार: अहो, पण तुम्ही मिशनरी स्कूलमध्ये होता ना? तिकडचे बहुतांशी शिक्षक ब्राह्मण तर सोडाच, हिंदूही नाहीत. ख्रिश्चन आहेत.
कार्यकर्ता: असं तुम्हाला वाटतं. पण बामणांना ख्रिश्चन म्हणून प्रमोट करायचं, बहुजनांवर अत्याचार करायचे आणि ख्रिश्चनांवर नाव ढकलायचे ही त्या भटांची चाल होती.
मुलाखतकार: असो. तुम्ही सध्या काय करता?
कार्यकर्ता: मी महाराज आर्मीचा एक कार्यकर्ता आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर समाजाचं ऋण फेडायला हवं या उदात्त भावनेने समाजसेवेचं असिधाराव्रत स्वीकारलं आहे. मला धनाचा मोह नाही. मी समाजात सुव्यवस्था स्थापन व्हावी यासाठी कार्य करतो. कोणा एका समाजाला महत्त्व देऊन दुसर्‍या समाजावर अन्याय हो‍ऊ नये यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी निर्मोही आहे. लग्न झाल्यावर हिचा बाप मला खूप जास्त वरदक्षिणा देणार होता. पण, मुळातच पैशाचा मोह नसल्याने मी तो नाकारला. हां, आता सासरेबुवांना वाईट वाटू नये म्हणून एक प्रतीकात्मक वरदक्षिणा स्वीकारली. एक स्कॉर्पियो गाडी, दोन मजली एक बंगला, पंधरा तोळे सोनं, एक लाखाची कॅश सोडता मी एक छदामही घेतला नाही सासर्‍यांकडून. तसा मी स्वाभिमानीही आहे. मला कोणी....
मुलाखतकार: (मध्येच थांबवत) असो. पुढचा प्रश्न. तुमची संस्था काय कार्य करते?
कार्यकर्ता: आमची संस्था भारतात एकोपा निर्माण करण्यासाठी झटते. समाजातील बहुजन घटकांवर अन्याय हो‍ऊ नये म्हणून कार्य करते. बामणांना स्वतःला श्रेष्ठ समजून बाकीच्यांवर अन्याय करण्याची सवय असते. आम्ही हा असा अन्याय खपवून घेत नाही. बहुजनांतर्फे आम्ही आवाज उठवतो. शेवटी काय, सगळ्या जातींतले लोक सारखेच असतात असं आपल्या कॉन्स्टिपेशननेच मान्य केलं आहे.
मुलाखतकार: (विजारीत झुरळ शिरल्यासारखा किंचाळतो) काऽऽऽऽऽऽय???
कार्यकर्ता: अहो, असं काय करता? कॉन्स्टिपेशन म्हणजे राज्यघटना! घटनेनेच सर्वांना समान अधिकार दिले आहेत, नाही का? माफ करा, पण तुमचं इंग्लिशवर म्हणावं तेवढं प्रभुत्व नाही.
मुलाखतकार: (अजून धक्क्यातून सावरला नाहीये हा!) आं? हां, हो हो. माझं इंग्लिश थोडं कच्चं आहे. तर पुढचा प्रश्न. चंदावरकर इन्स्टिट्यूटवर हल्ला महाराज आर्मीने केल्याचं ऐकलं होतं...
कार्यकर्ता: हा हल्ला समर्थनीय होता. आमच्या महाराजांवर त्या चंदावरकर इन्स्टिट्यूटच्या भटांनी शितोडे उडवले होते. त्यांचं हे असंच व्हायला हवं होतं. साले माजले आहेत सगळे!
मुलाखतकार: काही महत्त्वाची कागदपत्रंही जाळली म्हणे...
कार्यकर्ता: अजिबात नाही. आम्ही कुठलीही कागदपत्रं जाळली नाहीत. आम्हाला एवढी अक्कल नाही असं समजू नका. हा सगळा भटांचा कावा आहे. आणि मिडीयावालेही भटांचेच भक्त. त्यांनी भटांचं हे म्हणणं उचलून धरलं. सरकारही बामणांनाच सामील.
मुलाखतकार: अहो, पण तिकडच्या कॅमेर्‍यांमध्ये रेकॉर्डिंग आहे कागदपत्रं जाळतानाचं.
कार्यकर्ता: तो कॅमेराही खोटा होता आणि ते रेकॉर्डिंगही खोटं होतं. तीही बामणांचीच चाल होती. आमचे कार्यकर्ते गेल्यावर काही भटुरडे आत घुसले आणि त्यांनी मोडतोड आणि जाळपोळ केली. आणि निर्लज्जपणे हे रेकॉर्डिंग आमचं म्हणून दाखवलं. भटांची साली अवलादच खोटी!
मुलाखतकार: शांत व्हा, शांत व्हा. आपण दुसर्‍या विषयाकडे वळूया. आपल्या घरी कोण कोण आहेत?
कार्यकर्ता: मी, माझी बायको आणि माझा धाकटा भाऊ. मी समाजसेवक आहे, माझी बायको गृहिणी आहे आणि भावाची बटीक आहे.
मुलाखतकार: (विजेचा शॉक बसल्यासारखा) काऽऽऽय?
कार्यकर्ता: अहो बटीक म्हणजे कपड्यांचं दुकान हो. तुम्ही थोडं इंग्लिश सुधारा बरं...
मुलाखतकार: (स्वगत: मग रेड्या, बुटिक म्हण ना! मला कसं कळणार तुला काय म्हणायचं आहे ते?) आपल्या आर्मीबद्दल आणखी थोडी माहिती सांगा. म्हणजे स्थापना कशी झाली, कधी झाली वगैरे वगैरे...
कार्यकर्ता: आर्मीची स्थापना १९९९ साली झाली. तेव्हा साहेब आणि साहेबांचे दोन भाऊ एवढेच आर्मीचे सदस्य होते. त्यानंतर हळूहळू आर्मीचा विस्तार होत गेला. आणि आता ३ लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत. पण सुरुवात मात्र तिघांपासूनच झाली आहे. आर्मीच्या त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे साहेबांचे दोन भाऊ आणि साहेब म्हणजे हिपोपोटेमस.
मुलाखतकार: हायपोटेन्युअस (आता याला सवय झाली आहे बहुतेक!)
कार्यकर्ता: तेच!
मुलाखतकार: आत्ताच तुम्ही म्हणालात की सरकार ब्राह्मणांना सामील आहे. पण सध्याच्या सरकारात तर अनेक अब्राह्मण लोक आहेत
कार्यकर्ता: अजिबात नाही! ते सगळे १००% बामणच आहेत. किंबहुना जगात जी वाईट कार्यं होतात त्यांच्या मुळाशी बामणच असतात!
मुलाखतकार: ओसामा बिन लादेन कुठे ब्राह्मण आहे?
कार्यकर्ता: आहे ना! निःसंशय तो भटुरडाच आहे! त्याचं मूळचं नाव ॐकारभाऊ लेले आहे. आणि तो बामणच आहे.
मुलाखतकार: हिटलरने लाखो ज्यूंना छळून मारलं. तो कुठे ब्राह्मण होता?
कार्यकर्ता: हिटलरही भटच होता. हा सगळा बामणांनी रचलेला बनाव आहे.
मुलाखतकार: अहो, पण हिटलर ब्राह्मण नसल्याचे पुरावे आहेत.
कार्यकर्ता: तो ब्राह्मणच होता!
मुलाखतकार: तुम्ही एवढ्या ठामपणे कसं काय म्हणू शकता? काय पुरावा आहे तुमच्याकडे?
कार्यकर्ता: हिटलरच्या एका सैनिकाने त्याच्या बायकोला लिहिलेलं पत्र वाचा. सगळं स्पष्ट होईल.
मुलाखतकार: कुठे मिळेल ते पत्र?
कार्यकर्ता: हिंगणेवाडीत प्रसिद्ध होणार्‍या सुप्रसिद्ध ‘बंधमुक्ती’ या दैनिकात ते प्रसिद्ध झालेलं आहे. हिटलर हा बामणच होता असं त्यावरून निःसंशयपणे सिद्ध होतं. अर्थात तुम्हाला नाही पटायचं ते. तुम्हीही भटच आहात! बहुजनांनी कितीही पुरावे दिले तरी ते तुम्हाला ग्राह्य वाटत नाहीत. आम्ही सांगितलेला वृत्तपत्राचा पुरावा तुम्हाला पटत नाही आणि आम्ही मात्र तुमच्या रेकॉर्डिंगवर विश्वास ठेवायचा! अजब न्याय आहे! तुम्ही सगळे भट सारखेच. साले ब्लडी बामण!
मुलाखतकार: मला एक कळत नाही, तुमचा एवढा राग का ब्राह्मणांवर? तुम्ही एखाद्या ब्राह्मण मुलीला लग्नासाठी मागणी घातलीत आणि तिने तुम्हाला चपलेने फोडलं असं काहीतरी घडलंय का तुमच्या आयुष्यात?
कार्यकर्ता: कोणी आम्हाला असं चपलेने फोडायला आम्ही काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत!
मुलाखतकार: छे! बांगड्या तर जिने तुम्हाला चपलेने फोडलं तिने भरलेल्या असतील ना? शेवटी मुलगीच ती!
कार्यकर्ता: हे बघा, तुम्ही माझा अपमान करत आहात. जरा तोंड सांभाळून बोला.
मुलाखतकार: बरं. औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं.
कार्यकर्ता: औरंगजेब हाही भटुरडाच होता. रोज सकाळी उठल्यावर तो शंकराची पूजा करायचा.
मुलाखतकार: जॉर्ज बुशने अफगाणिस्तान आणि इराकवर हल्ला केला.
कार्यकर्ता: तोही मूळचा भटच. रोज जेवायला बसण्याआधी चित्राहुती घालतो तो! एवढंच नव्हे, त्याची मुंजपण झाली आहे तो लहान असताना. साला बामण!
मुलाखतकार: अफजल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला.
कार्यकर्ता: तेही सगळे बामणच होते. त्यांना मुसलमान म्हणून प्रमोट करून मुसलमानांवर नाव ढकलायचं आणि स्वतः नामानिराळं राहायचं हा बामणी कावा होता. भटाबामणांच्या हलकटपणाची ही परंपरा थेट महाभारतातल्या रावणापासून सुरू झालेली आहे.
मुलाखतकार: रावण तर रामायणात होता हो...
कार्यकर्ता: तेच ते! हाच तर भटी कावेबाजपणा आहे! बहुजनांना बोलू द्यायचं नाही, आणि स्वतः बोललेलं सगळं खरं समजायचं.
मुलाखतकार: पण रावण रामायणात होता ही तर शतकानुशतके मान्य असलेली गोष्ट आहे.
कार्यकर्ता: आम्ही का मानावं ते? शेवटी विश्वामित्रही भटच होते ना? त्यांनी सांगितलेलं तेवढं खरं का?
मुलाखतकार: रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिलं आणि महाभारत महर्षी व्यासांनी लिहिलं!
कार्यकर्ता: तेही भटच!
मुलाखतकार: ओके. अजमल  कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मुंबईवर दहशतवादी हल्ला केला.
कार्यकर्ता: तेही सगळे भटांचेच पायिक होते. एकाही भटाला त्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले नाहीत. जे लोक हल्ल्यात दगावले ते सगळे बहुजन होते.
मुलाखतकार: तुमचा कुत्रा फार भुंकतो.
कार्यकर्ता: तोही भटच आहे!
मुलाखतकार: तुम्ही खूप चिडताय.
कार्यकर्ता: कारण मीही भटच आहे!
मुलाखतकार: आँ??
कार्यकर्ता: नाही म्हणजे ते आपलं हे... तुम्ही नसते प्रश्न विचारून मला गोंधळात पाडलंत म्हणून असं म्हणालो मी. मला मुलाखत द्यायचीच नाही. चला चालते व्हा इथून. माझे विचार जगापर्यंत पोचवण्यासाठी मला कोणाचीही गरज नाही. तुमच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मी स्वतः ब्लॉग लिहीन!
मुलाखतकार: अहो, पण आपली मुलाखत अर्धवटच राहिली आहे...
कार्यकर्ता: मुलाखत गेली खड्ड्यात! चला निघा!

टीप: वरील लेख, त्यातील व्यक्तिरेखा, त्यातील प्रसंग, त्यातील वाक्ये, त्यातील परिस्थिती ही संपूर्णपणे काल्पनिक असून त्यातील कोणताही भाग जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटनेशी, संघटनेशी, प्रसंगाशी, व्यक्तिरेखांशी, जातीशी, धर्माशी, भाषेशी, देशाशी, पुरुषाशी, स्त्रीशी, राजकारण्याशी, प्राण्याशी, निर्जीव वस्तूशी, खेळाशी थोडाजरी जुळत असेल तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.

33 comments:

  1. >> तुमच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा मी स्वतः ब्लॉग लिहीन!

    हा हा हा हा हा... !! और ये लगा छक्का... आय मिन सिक्सर म्हणायचं होतं मला.. या बामणांनी उगाच नको ते शब्द घुसडलेत माझ्या तोंडात ;)

    ReplyDelete
  2. हेरंब,
    नाहीतर काय! हे बामण ना, साले माजले आहेत. उगाच बहुजनांची भाषा बिघडवतात... ;-)

    ReplyDelete
  3. स्मित,
    धन्यवाद भाऊ. :-)

    ReplyDelete
  4. हिटलर,ओसामा,औरंगजेब,रावण,कसाब सगळे बामणच होते.नवीन माहिती मिळाली... :)

    मला तर वाटते चित्रपटातले मोगॅम्बो,शाकाल ,गब्बर हे सुद्धा बामणच असावेत.

    संकेत छान लिहलयस...!

    ReplyDelete
  5. देवेन,
    प्रश्नच नाही. मोगॅम्बो, शाकाल, गब्बर हे सगळे बामणच होते. किंबहुना मोगॅम्बो हे नाव महाम्बरे या नावावरून घेतलं आहे असं संशोधनाअंती सिद्ध झालं आहे... ;-)

    ReplyDelete
  6. मस्त हाणली आहेस रे... :) :)
    >>ओंकारभाउ लेले...प्रचंड भारी.

    ReplyDelete
  7. सही सही सहीच.... :)

    या बामण्यांच्या तर.... सगळे मेले एकजात (आलीच बघ जात ) वाईट्ट....

    आज मी पुन्हा ओरडतेय... "संकेत संकेत संकेत " ... लोकांना समजायचा तर समजूदेत बामणी कावा!!

    ReplyDelete
  8. योगेश,
    खूप खूप धन्यवाद. आणि ब्लॉगवर स्वागत. :-)


    तन्वीताई,
    धन्यवाद. :-) आणि वाईट्ट तर आहेतच. सगळे बामण तसेच! ;-)

    ReplyDelete
  9. Hmm! I know many good 'Karaykartaas' too.. wish you meet them some time and write about them too...

    ReplyDelete
  10. भन्नाट रे..एकदम भन्नाट.. कसाब बामण आहे ते आजच कळाल ;)

    ReplyDelete
  11. सविताताई,
    सगळेच ‘कार्यकर्ते’ असेच असतील असं नाही. उडदामाजी काळे गोरे हे असायचेच. त्यांतले जे ‘काळे’ आहेत त्यांना उद्देशून आहे हा लेख. जातीभेदाने आणि ब्राह्मणद्वेषाने बरबटलेले काही लोकांचे विचार ऐकून/वाचून माझ्या डोक्यात तिडिक गेली होती. माणसाचं श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व त्याच्या जातीवरून ठरवणं हे कधीही असमर्थनीयच आहे. म्हणून हा लेखनप्रपंच. पण, असे विचार नसलेल्या ‘कार्यकर्त्यां’ना भेटण्याची खरंच इच्छा आहे. बघूया.


    सुहास,
    धन्यवाद भाऊ. कसाबच काय, लादेन आणि जॉर्ज बुशपण बामणच आहेत... ;-)

    ReplyDelete
  12. :)) शेवटी स्वतःलापण बामण म्हणवुन घेतो... हाहाहा... धमाल लिहलय...

    ReplyDelete
  13. सौरभ,
    धन्यवाद. :-) हे असे विचार असलेले लोक बोलताना कसलाही विचार करत नाहीत. तोंडाला ये‍ईल ते बोलतात. त्याचंच हे उदाहरण.

    ReplyDelete
  14. कावा कावा कावा...अजी मेरा जी करता!!!!!!
    :))))
    जबरा रे!

    ReplyDelete
  15. विद्याधर,
    जसं पोलिसांचं ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे बोधवाक्य आहे तसंच काही संस्थांचं ‘कावा कावा कावा... अजी मेरा जी करता’ हे बोधवाक्य आहे... :-D

    ReplyDelete
  16. मस्त. हहपुवा :)

    ReplyDelete
  17. धन्यवाद भाऊ. आणि ब्लॉगवर हार्दिक स्वागत. :-)

    ReplyDelete
  18. अरे ही बघ अजून एक स्वच्छंदी :) लहानपणी 'कुंभ के मेले मे' हरवला होतात का तुम्ही? ;)

    http://meemanali.blogspot.com/

    ReplyDelete
  19. अरे, नुसती तीच एक नाही. हा बघ आणखी एक स्वच्छंदी....

    http://swachandi.blogspot.com/

    जसा ब्लॉगर्स मेळावा असतो तसा ‘स्वच्छंदी’ ब्लॉगर्स मेळावाही आयोजित करायला हवा एकदा... ;-)

    ReplyDelete
  20. अरे.. भारी एकदम.. :) ते कोंस्टीपेशन वाचून मी काही सेकंद मूळ शब्द (कोंस्टीट्युशन ) विसरलो होतो.. :D
    बटिक.. हिप्पोपोटेमस.. :) धन्य आहेस तू... :)

    अरे आलेत की काही असे ब्लॉग... :) त्यांची मुलाखत घ्यायला हवी... :)

    ReplyDelete
  21. एकदम सिक्सर आहे....(मी अम्मळ लेट वाचतेय म्हणून काही जास्त लिहित नाही...वर सर्वांनी ते काम वेळेवर केलंय)

    ReplyDelete
  22. हहपुवा


    रच्याक, मी एक न फार्टणारा फार्टोग्राफर आहे! ;)

    ReplyDelete
  23. जोरदार..संकेत एक नंबर...

    ReplyDelete
  24. मस्‍त, हसून हसून गाल दुखू लागले, जगातले सर्व वाईट हे बामण असतात हे आत्ताच कळाले. मग तर सगळे खलनायक बामण झाल्‍याचे सिद्ध झाल्‍याने बामण जातीतील संख्‍या खूपच वाढलेली आहे, उगीचच नाही म्‍हणत इतरांना अल्‍पसंख्‍यक. ;)

    ReplyDelete
  25. काय रे साहेबा, आहेस कुठे?
    लिखाण का बंद केलंस :(

    ReplyDelete
  26. सत्य,मनोरंजणाच्या दृष्टीकोणातून मांडलेस.. उत्तम!

    ReplyDelete
  27. संकेत साहेब... आहात कुठे??? आम्ही तुमच्या लिखाणाची वाट बघतोय... अहो कळवा तरी कुठे आहात?

    ReplyDelete
  28. रोहन आणि अपर्णा,
    धन्यवाद. आणि एवढे दिवस ब्लॉग मृतावस्थेत होता. आता पुनरुज्जीवन करण्याचा विचार आहे. त्यादृष्टीने पावलं टाकण्यात आलेली आहेत. :-)


    विशाल आणि ओंकार,
    धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद. आणि हो, ब्लॉगवर हर्दिक स्वागत. :-)

    ReplyDelete
  29. आल्हाद महाबळ,

    मला फार्टोग्राफरांविषयी आदर आहे, कारण मला फार्टोग्राफी जमत नाही.. ;-)


    मोनिका,
    धन्यवाद. ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत. आणि बामण म्हणजे जगातली सर्वांत वाईट जमात... ;-)

    ReplyDelete
  30. सुहास,
    अरे एवढे दिवस वेळ मिळत नव्हता. त्यामुळे ब्लॉग मेला होता. आता पुनरुज्जीवन केलं आहे. :-)

    हर्षद,
    धन्यवाद. आणि ब्लॉगवर हार्दिक स्वागत. :-)

    ReplyDelete