Thursday 7 October 2010

सुखसंवाद - १

रसिकहो, रंगदेवतेला अभिवादन करून आज आम्ही आपणांपुढे सादर करत आहोत एक छोटी एकांकिका ‘सुखसंवाद’! हा सुखसंवाद पतीपत्नींमधला आहे जो घराघरात ऐकायला मिळतो. अगदी शब्द सारखे नसले तरीही मथितार्थ हाच असतो. तर आजच्या या सुखसंवादामधले कलाकार आहेत मिलिंद मिशीकापे आणि निहारिका सोनटक्के. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य: अजित झाडमुटे. चला तर मग बघूया ‘अनन्वय’ निर्मित लघुएकांकिका ‘सुखसंवाद’

एक मध्यमवर्गीय घर. स्वयंपाकघर, हॉल आणि एक बेडरूम. (यांच्या जागा कुठेही असल्या तरीही चालतील! मध्यमवर्गीयांकडे तसंही कोण निरखून पाहणार आहे?) एक पंचेचाळीशीच्या सुमाराची स्थूल बाई गाणी ऐकत आहे. अचानक दारावरची बेल वाजते. या बाईंचा नवरा वाटावा असा एक गृहस्थ आत येतो.

सौ: कुठे गेला होतात?
श्री: मसणात!
सौ: कशाला?
श्री: अरेच्चा! माणूस मसणात एक तर स्वतः तरी पोचतो किंवा दुसर्‍याला पोचवायला तरी जातो! पण ज्याअर्थी तू तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र मिरवत झाशीच्या राणीसारखी (स्वगत: कसली डोंबलाची झाशीची राणी! हिडिंबा आहे नुसती!) माझ्यासमोर उभी आहेस त्याअर्थी मी दुसर्‍या कोणालातरी पोचवायला गेलो होतो हे उघड आहे. आपल्या गल्लीच्या टोकाशी राहणारे देवल गेले आज. त्यांना पोचवायला गेलो होतो. असो. पाणी काढ आंघोळीला.
सौ: स्वतःच घ्या! मी मेंदी लावली आहे हातांना.
श्री: (स्वगत: आता या वयात हातांना मेंदी, केसांना कलप किंवा चेहर्‍याला रूज लावलास तरीही कोण बघणार आहे तुझ्याकडे? आणि तसंही अशा बाह्य उपायांनी फरक पडण्यासाठी मुळात सौंदर्य असावं लागतं! आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार?) का? लग्न आहे की काय कोणाकडे?
सौ: लग्न असायची गरज नाही मेंदीसाठी. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे उद्या. तुम्हाला फरक पडत नाही, पण मला आहे कौतुक अजूनही! म्हणून लावत्येय.
श्री: (स्वगत: आता कोणता कैदी, ‘मला अमुक दिवशी फाशीची शिक्षा झाली’ हे कौतुकाने सांगेल? मग मी तरी कोणत्या तोंडाने सांगू?) सारखी वसवस करत असतेस! तुझ्यापेक्षा आपली मोलकरीण बरी. बिचारी कधी उलटून बोलत नाही.
सौ: तिला पैसे मिळतात! मी घरकामं करते, त्यांचे मला पैसे द्यायला सुरुवात करा महिन्याच्या महिन्याला; मीही नाही करणार वसवस! आणि एवढाच तिचा पुळका असेल तर आणून ठेवा तिलाच घरी! मी जात्ये माहेरी!
श्री: मला चालेल, पण तिच्या नवर्‍याला हे चालेल का? (स्वगत: तुला काय वाटलं, तुझ्या या अशा वाक्यांनी मी हार मानेन? अगं, अशा वाक्यांनी ब्लॅकमेल व्हायला आपलं काही नवीनच लग्न झालेलं नाहीये!)
सौ: जिभेला हाड कसं नाही म्हणते मी! काही शरम आहे का तुम्हाला? का समोरच्या घरातली बाई केस विंचरत असली की बाल्कनीतल्या उन्हात तिला पाहत व्यायाम करण्यासाठी उभे राहता तेव्हा वितळली सगळी लाज?
श्री: लाज वितळायला मी म्हणजे काही तुझ्या माहेरचा माणूस नव्हे! (स्वगत: मी कोंडीत सापडलो असताना बचावासाठी तुझ्या माहेरच्या माणसांसारखं दुसरं साधन नाही!)
सौ: माझ्या माहेरच्या माणसांना शिव्या घालण्याची गरज नाही! त्यांचा तुम्हाला कधीही त्रास झालेला नाही!
श्री: हो ना! तुझी आई (स्वगत: आई कसली, पाचशे लिटर पाण्याची टाकी आहे! पण बोलायची चोरी!) आली होती आपल्याकडे तेव्हा दोरीच्या उड्या मारण्याचं मनावर घेतलं होतं तिने कुठल्यातरी चॅनलवरचा कुठलातरी फुटकळ कार्यक्रम बघून. घरात दोरीच्या उड्या मारताना आपली ट्यूब, झुंबर, हॉलमधल्या तसबिरी आणि आपलं काचेचं टेबल एवढ्या सगळ्या गोष्टी फुटल्या होत्या! तुझा भाऊ आला तेव्हा ओला पंचा नेसून मी देवाची पूजा करेन असा नवस कुठल्यातरी देवाला केला होता त्याने. (स्वगत: कसला अजब माणूस आहे! साल्याने नवस स्वतःसाठी केला आणि ओला पंचा नेसून पूजा मात्र मी करायची!) तासाभराची ती पूजा आटपल्यावर दोन दिवस सर्दीने हैराण होतो मी! आणि म्हणे त्रास नाही! माणसं नव्हेत ती, नरमांसभक्षक टोळी आहे!
सौ: देवाने तोंड दिलंय म्हणून उगाचच काहीही बरळू नका! माझा भाऊ शुद्ध शाकाहारी आहे. नरमांसच काय, अंडंही कधी खाल्लेलं नाही त्याने!
श्री: हो काय? मग तो माझा मेंदू खातो तो काय ओल्या नारळाची करंजी समजून?
सौ: शी! तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही! आंघोळ करा गुपचुप!
श्री: ते तू सांगण्याची गरज नाहीये. माझा मी मुखत्यार आहे. हे माझंच घर आहे! (स्वगत: तुला गप्प बसवण्यासाठी कधी कधी असा टफ स्टान्स घ्यावा लागतो. पण हरकत नाही! तू गप्प राहण्याचं स्वर्गसुख मिळणार असेल तर मी तयार आहे...)
सौ: कळतात हो टोमणे! हो! तुमचंच घर आहे! माझं मेलीचं आहेच काय या घरात? मी जातेच निघून माहेरी. माझ्या माहेरच्या माणसांना तरी माझी काळजी आहे.
श्री: (स्वगत: परमेश्वरा, माहेरी निघून जाण्याची धमकी ही एक दिवस तरी खरी करेल याच आशेवर मी जगतोय गेली कित्येक वर्षं! कधी यायचा रे तो सुदिन?) चहाचं आधण टाक...
पडदा पडतो. (पाठीमागे भांडी आपटल्याचे आवाज... हुंदक्यांचा आवाज... वृत्तपत्र उघडल्याचा आवाज)

क्रमश:

10 comments:

 1. मस्त रे.. सही आहे.आवडली..कंस अगदी जबरी आहेत..
  -- स्वामी संकेतानंद( हा आपल्या दोघांमधला फरक स्पष्ट करण्यासाठी[नाव एकच आहे ना !!]).

  ReplyDelete
 2. स्वामी संकेतानंद, (नावामध्ये स्वामी लावू नकोस. अपशकुनी आहे ते. आजकाल ‘स्वामीं’ना वाईट दिवस आले आहेत. बघ ना... स्वामी नित्यानंद, चंद्रास्वामी, अदनान स्वामी (हेच याचं खरं नाव आहे असा एक मतप्रवाह आहे.. ;-) ))

  धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद. :-)

  ReplyDelete
 3. हा हा.. संवादात एवढं सुख (!) असतं हे माहित नव्हतं.. वाचनसुख मात्र नक्की लाभलं :)

  ReplyDelete
 4. आभार. संसारात पडण्याचा अनुभव नाही मला अजून, म्हणून बरं आहे. संसारात पडल्यावर आमच्यामध्ये असे सुखसंवाद झाले नाहीत म्हणजे झालं.. :-)

  ReplyDelete
 5. "श्री"चे संवाद धम्माल पडलेत!!! "श्री"च्या १० संवादात १० विकेट पडल्या... अफलातुन...

  ReplyDelete
 6. ठांकू ठांकू... आणि हो, ब्लॉगवर हार्दिक स्वागत भाऊ.

  ReplyDelete
 7. धन्यवाद भौ... आणि हो, ब्लॉगवर सहर्ष स्वागत. :-)

  ReplyDelete
 8. भारी हा.. होतात असे संवाद काही घरात..

  तुझ सांग राहवेना.. तुझ बिन करमेना अशी परिस्थिती... :D

  ReplyDelete
 9. रोहन,

  धन्यवाद भौ. :-)

  ReplyDelete