Tuesday, 5 October, 2010

श्रीगणेशा

मराठी ब्लॉग्ज वाचायला सुरुवात केली तेव्हा आपणही लिहावं असं मनात होतंच. (‘लग्न पाहावं करून’ च्या चालीवर ‘ब्लॉग पाहावा लिहून’) बर्‍याच ब्लॉग्जवर प्रतिक्रियांचा पाऊस पडायचा. ब्लॉगला भेट देणार्‍यांची संख्या हजारांत जायची. तेव्हा वाटायचं, ‘आपणही असा एखादा ब्लॉग लिहावा आणि तो अनेक लोकांनी वाचावा. अनेक लोकांना तो आवडावा.’ पण लिहायचं काय हा प्रश्न होताच. याआधी कधीही कोणत्याही प्रकारचं लेखन केलेलं नाही. त्यामुळे एकाच विषयावर सलग आणि मुख्य म्हणजे मुद्देसूद असे तीन-चार परिच्छेद लिहायचे म्हणजे तसं कठीणच काम होतं माझ्यासाठी. (आता वास्तविक या मुद्द्यात फारसा दम नाही. लग्न करताना लोक असं कुठे म्हणतात की, ‘याआधी कधीही लग्न केलेलं नाही. कसं झेपायचं मला लग्न?’ आणि असं म्हणाले तरीही लग्न तर करतातच की!) आणि सुचलं तरी नित्यनियमाने लिहायला वेळ मिळेल काय हा एक प्रश्न होताच.


पण आज काय झालं कोण जाणे, अचानक ब्लॉग सुरू केला. (मगाशी सांगितलं ना. ‘कसं झेपायचं लग्न?’ असं म्हणूनही लग्न केलं जातं. त्याच चालीवर ‘कसं झेपायचं लेखन?’ असं म्हणून मी ब्लॉग चालू केला.) ही माझी पहिली पोस्ट. ‘लिहायचं काय?’, ‘वेळ मिळेल का?’ हे आधी असणारे प्रश्न अजूनही आहेत. पण तरीही आज श्रीगणेशा झाला हेही नसे थोडके. आपलाही ब्लॉग असावा ही इच्छा तर पूर्ण झाली. आता तो ब्लॉग बर्‍याच लोकांनी वाचावा आणि त्यांना तो आवडावा ही इच्छा पूर्ण होते का बघू. आता प्रयत्न करेन नियमितपणे आणि विविध विषयांवर लिहिण्याचा. अर्थात माझं लिखाण चांगलं की वाईट हे येणारा काळ आणि ब्लॉगला भेट देणारे वाचक (जर कोणी असले तर! सध्या तरी या माझ्या पोस्टचा मी एकुलता एक वाचक आहे.) ठरवतील.


आता थोडं ब्लॉगच्या नावाबद्दल. ब्लॉग चालू करताना कोणत्या विषयावर लिहायचं ते नक्की नव्हतं. सुचेल तसं आणि सुचेल त्या विषयावर लिहायचं एवढंच ठरवलं होतं. त्यामुळे कोणत्याही विषयाचं बंधन नसलेल्या या ब्लॉगसाठी ‘स्वच्छंदी’ हेच नाव योग्य वाटलं मला. आणि म्हणूनच चित्रही गरुडाचं आहे. भेदक नजरेचा हा पक्षिराज म्हणजे अत्यंत मनस्वी पक्षी. स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारा. कोणत्याही बंधनात न अडकणारा. आणि म्हणूनच ‘स्वच्छंदी’ या नावाला साजेश्या चित्राची शोधाशोध करताना सगळ्यांत आधी गरुडाचीच छबी माझ्या डोळ्यांसमोर आली. असो. ही माझी पहिली पोस्ट. आता बघूया, आणखी किती लिखाण जमतंय ते.....

11 comments:

 1. ब्लॉगविश्वावर स्वागत !!! असेच लिहत राहा..
  चला प्रतिक्रियांचापण श्रीगणेशा झाला..

  ReplyDelete
 2. धन्यवाद. ब्लॉगवर हार्दिक स्वागत. असाच येत राहा नेहमी. :-)

  ReplyDelete
 3. ब्लॉगविश्वावर स्वागत ...:) लवकर श्रीगणेशा केलात....कळलच नाही....आता ब्लॉग जमेल तसा वाचत जाईन......शुभेच्छा.

  ReplyDelete
 4. धन्यवाद. ब्लॉगवर स्वागत. आणि आता मीही जमेल तसं लिहित जाईन. :-)

  ReplyDelete
 5. राजे, ब्लॉग सुरु केलात आणि कळवलंही नाहीत !! एनीवेज.. भेलकम भेलकम.. एकेक करत पोस्ट वाचतो आता.. शुभेच्छा !! :)

  ReplyDelete
 6. धन्यवाद भाऊ. अरे, मला अजून लिहिणं तितकंसं जमत नाहीये. त्यामुळे जरा बर्‍यापैकी लिहिता येण्याची वाट बघत होतो. म्हणून राहिलं सांगायचं. कृपया राग मानू नका... :-)

  ReplyDelete
 7. छ्या.. राग कसला त्यात.. चंमतग केली रे..

  ReplyDelete
 8. >>राजे, ब्लॉग सुरु केलात आणि कळवलंही नाहीत !! एनीवेज.. भेलकम भेलकम.. एकेक करत पोस्ट वाचतो आता.. शुभेच्छा !! :)

  मलाच अवघडल्यासारखं वाटतंय च्यायला, थेट दीड महिन्याने लक्षात आलंय माझ्या!! :-|

  ReplyDelete
 9. अरे, अवघडल्यासारखं काय त्यात? मला स्वतःला अजूनही असं वाटत नाही रे की, मी चांगला लिहितो. अजून सराव नाही. त्यामुळे फार विचित्र वाटतं सांगायला की माझाही एक ब्लॉग आहे. म्हणून कोणालाच सांगितलं नव्हतं. तेव्हा आपणही कृपया राग मानू नये. :-)

  ReplyDelete
 10. संकेत साहेब... :) तसा फार उशिरा तुमच्या ब्लॉगवर आलेलो नाही आहे... :) शुभेच्छा.. नवीन ब्लॉगसाठी आणि नववर्षासाठी सुद्धा... :) आता जरा बाकी पोस्ट्स आडव्या पाडतो... :)

  ReplyDelete
 11. रोहन,

  धन्यवाद भाऊ. एवढे दिवस मेला होता हा ब्लॉग. आता पुनरुज्जीवित करेन. त्यामुळे असेच येत राहा आता ब्लॉगवर. :-)

  ReplyDelete