Tuesday, 26 October, 2010

न्यायमूर्ती राखी


‘राखी का इन्साफ’ पाहिला का हो कोणी? अगदी ‘न भूतो न भविष्यति’ असा कार्यक्रम आहे. 'imagine TV' वर १६ ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा कार्यक्रम ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचं भाग्य ज्या माणसांना लाभलं ती सगळी माणसं म्हणजे थोर पुण्यात्मे आहेत. (इस नाचीझने भी देखा है पहला एपिसोड । लेकिन दुर्भाग्य की बात यह है की हम उस वक्त स्टुडिओमें हाज़िर नहीं थे । प्रत्यक्ष पाहिला असता तर स्वर्गप्राप्ती झाली असती मला. असो. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना...) या कार्यक्रमात परमप्रकाशिता न्यायमूर्ती राखी सावंत या सामान्य लोकांच्या जीवनातील समस्यांचा न्यायनिवाडा करणार आहेत. या थोर आध्यात्मिक कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचा हा वृत्तान्त माझ्या अजाण नजरेतून:

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज कोणा पामराला राखी न्याय देणार (पक्षी: मूळ मुद्दा बाजूला ठेवून असलेला गोंधळ आणखी वाढवणार) आहे हे सांगण्यात आलं. एका बाईला (तिला आपण फिर्यादी बाई म्हणूया.) न्याय हवा होता. तिचं म्हणणं होतं की, तिच्या बहिणींनी तिला तिच्या मुलापासून तोडलं. हे सांगून झाल्यावर अचानक स्वयंपाकघरात भांडी पडल्यासारखा आवाज आला. मी दचकून पाहिलं तर कार्यक्रमाचं शीर्षकगीत सुरू झालं होतं. ‘हर सच और झूठ का फैसला’ या एवढ्या एकाच ओळीपासून बनलेलं हे शीर्षकगीत अगदी युनिक म्हणायला हवं. आता कार्यक्रम सुरू झाला.

रॅम्प वॉक केल्यासारखी (म्हणजे प्रत्येक पावलाला तीनवेळा कंबर हलवत) चालत राखी आली. उपस्थित प्रेक्षकवर्ग ‘राखी, राखी’ असं ओरडत होता. (याचं मूळ मला वाटतं बहुदा राखीने घातलेल्या तंग कपड्यांत असावं!) राखीने बर्‍याच लोकांशी हात मिळवले. दोन-तीन स्त्रियांना आलिंगनही दिलं. (हे दृश्य पाहून उपस्थित पुरुषांनी वास्तविक ‘राखी, राखी’च्या घोषणा वाढवल्या होत्या, पण राखीने काही त्यांना आलिंगन दिलं नाही!) सगळ्यांचं स्वागत करून राखी म्हणाली, ‘टांग खींचनेवाले तो बहुत होते हैं, लेकिन हाथ पकडनेवाले बहुत कम! धोखा देनेवाले तो बहुत होते हैं, पर मौका देनेवाले बहुत कम!’ (वाह! क्या ड्वायलॉक मारा है!) (साधारण तिसरीच्या मुलांचं नाटक जर एखाद्या शाळेने बसवलं, तर ती मुलं जशी प्रत्येक शब्दाला अभिनय करतात तसंच काहीसं चाललं होतं राखीचं ही वाक्य म्हणताना! म्हणजे ‘हाथ पकडनेवाले’ म्हणताना स्वतःचा हात पकडणं वगैरे वगैरे. नशीब, ‘टांग खींचनेवाले’ म्हणताना स्वतःचा पाय नाही ओढला तिने!) तिचं बोलून झाल्यावर स्क्रिप्टप्रमाणे लोकांनी टाळ्या वाजवल्या. (मला वाटतं या लोकांना टाळ्या वाजवण्याचे पैसे दिले असावेत imagine tv ने. ते पैसे पुरते वसूल करून देण्याचा मनसुबा दिसला एकंदरीत प्रेक्षकांचा.)

हे सगळं प्रास्ताविक झाल्यावर ती फिर्यादी बाई एकदाची आली. तिच्यात आणि राखीत झालेला संवाद पुढीलप्रमाणे:
राखी: कोई टेन्शन तो नहीं? एकदम आरामसे बैठिए । बिलकुल खूबसूरत लग रही हैं आप । (आता मध्येच हे कुठून आलं?) कोई टेन्शन लेनेकी जरुरत नहीं, क्यूँकी यह सब लोग अपनेही लोग हैं । (लोकांनी इथे imagine चे पैसे परत वसूल केले... म्हणजे टाळ्या वाजवल्या.) अब आप अपना नाम बताइये।
फिर्यादी बाई: मेरा नाम...
राखी: थोडा ऊँचा बोलिए, ताकि सब सुन सकें।
फि.बा.: (थोडी ओरडून) मेरा नाम ****** है और मैं साहरंगपूर में...
राखी: सारंगपूर या साहरंगपूर? (बाय, जरा तिला बोलू द्या की!)
फि.बा.: साहरंगपूर...
राखी: साहरंगपूर! जी..
फि.बा.: मै अपने बच्चोंको वहाँ पढाती हूँ। मेरा आगेपीछे कोई नही है। मैं...
राखी: आपके हजबण्ड कहाँ हैं? (ही बाय लय त्वांड घालते मदे मदे!)
फि.बा.: हजबण्ड तो नहीं हैं।
राखी: अच्छा हजबण्ड नहीं हैं आपके?
फि.बा.:नहीं।
राखी: अच्छा हजबण्ड नहीं हैं आपके। (आता हे किती वेळा रिपिट करणार बाय??) ओ.. आय अ‍ॅम सो सॉरी. (चला, अखेर बाहेर तर आली या पतिपुराणातून..)
राखी: क्या हुआ उनको? (अजूनही नवराच!)
फि.बा.: जब शूटिंगमें काम...
राखी: शूटिंगमें काम करते थे? (आता ती बाई तेच सांगत होती ना? मग जरा बोलू दे की तिला!)
फि.बा.: शूटिंगमें लाइटिंगमें...
राखी: लाईटमन थे। अच्छा।  (त्या बाईचं एक वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही या बयेने आत्तापर्यंत!)
फि.बा.: एक  दिन उनका फोन आया की, मैं रातको नहीं आऊँगा। और सुबह नासीरभाई का...
राखी: नासीरभाई कौन? (या फिर्यादी बाईचं एखादं वाक्य बोलून पूर्ण झालं तर गावजेवण घालीन म्हणतो मी...)
फि.बा.: नासीरभाई मतलब जिधर वो...
राखी: अच्छा। मतलब जहाँ आपके हजबण्ड काम करते थे।

अशा संवादांतून (म्हणजे फि.बा. च्या तीन शब्दांपुढे राखीची अडीच वाक्य या रेटने चाललेल्या) अखेर त्या बाईचं बोलणं पूर्ण झालं! तिचा नवरा शूटिंगच्या वेळेस वारला होता (राखीच्या शब्दांत ‘त्याचा स्विच ऑफ झाला होता’!) आणि तिला चार लाखांची भरपाई मिळाली होती. मग ती मुलांना घेऊन बँगलोरला गेली.
राखी: क्या कहा आपके माँ-बापनें?
फि.बा.: उन्होनें कहा, ‘मेरी बेटी मेरे लिये क्या लायी? साडी लायी क्या?’
राखी: ऐसा कहा उन्होंने? ऐसा नहीं कहा की, ‘आपके हजबण्ड किधर हैं?’
फि.बा.: ये ऐसा...
राखी: ऐसा नहीं कहा की, ‘घरपे अब साया नहीं रहा’?
फि.बा.: वो तो...
राखी: और ये कहा की, ‘मेरी बेटी साडी लेकर आयी की नहीं?’
फि.बा.: वो लोग...
राखी: ये गलत बात है!
फि.बा.: नहीं लेकिन...
राखी: ये गलत बात है! है ना? (एकूणच त्या बाईला बोलायला द्यायचं नाही असा मनोनिग्रह दिसला राखीचा!)

थोड्या वेळाने फि.बा. ची एक बहीण आली. एक सामुदायिक रडण्याचा कार्यक्रम त्यावेळी चालू होता. बहिणीनेही थोडं रडून या कार्यक्रमातला आपला खारीचा वाटा उचलला. कोण कशासाठी रडतंय तेच न कळल्याने प्रेक्षक मात्र गोंधळात पडले होते. मध्येच फि.बा. रडत होती, मध्येच चवताळून ‘इन्साफ चाहिये’ असं ओरडत होती. (बहुतेक हिला भांग दिली असावी..) मध्येच तिने प्रेक्षकांना उद्देशून एक छोटेखानी भाषणही केलं. भाषणानंतर ती राखीला मिठी मारून रडली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तर झडत होत्याच. मध्येच ‘तीन बच्चोंकी कसम’, ‘कुरान की कसम’ असे शब्द ऐकायला येत होते. प्रेक्षकही मध्ये थोडा गोंगाट करून, टाळ्या वाजवून, घोषणा देऊन आपण अजूनही जागे असल्याची खात्री करून घेत होते. कथेतली पात्रही वाढत होती. मधूनच राखी खास स्वतःच्या शैलीत एखाद्या पात्राशी संवाद साधून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. उदाहरणच द्यायचं झालं तर खालचा संवाद बघा:
राखी: आपका पूरा नाम?
माणूस: नासीर हुसैन शेख
राखी: नासीर (एक मोठा पॉज)
माणूस: (राखीला थांबलेली बघून उरलेला भाग पूर्ण करण्यासाठी) हुसैन शेख
राखी: हुसैन (परत एक मोठा पॉज)
माणूस: (आता हा कंटाळला असावा. चेहर्‍यावर दिसत होतं त्याच्या.) शेख (हुश्श!)

मग आणखी दोन बहिणी आल्या. आता परत युद्ध पेटलं. आता फि.बा., तिच्या बहिणी (आणि अर्थातच राखी) मुंडी कापलेल्या कोंबडीसारखं थैमान घालत होत्या. राखीचे स्पेशल डायलॉग्ज मधून मधून चालू होतेच. ‘आप झूठ पे झूठ, झूठ पे झूठ बोल रही हैं’ (तारीख पे तारीख च्या चालीवर) किंवा ‘बच्चोंका अपना दिल होता है। वो कोरे कागज़ की तरह होते हैं।’ अशी वाक्यं ऐकून कान तृप्त होत होते. मग फि.बा. च्या मुलाची एंट्री झाली. मग पुन्हा रडारड, वितंडवाद, आरडाओरडा हा एक सिक्वेन्स झाला. मग शब्बीर नावाच्या एका प्राण्याची एंट्री झाली. हा म्हणे त्या फि.बा. चा मानलेला भाऊ होता. अचानक राखीला साक्षात्कार झाला की या दोघांमध्ये बहीण-भावाच्या पलिकडचं एक नातं आहे. (राखीला सिद्धी प्राप्त झालेली आहे बहुतेक. कसं काय न सांगता सगळं ओळखते देव जाणे. फि.बा. मिळालेल्या पैशांच्या बाबतीत खोटं बोलतेय आणि तिला ४ लाखांपेक्षा जास्त पैसे मिळालेले आहेत हेही राखीने असंच ओळखलं होतं) तिने त्या दोघांना खोदून खोदून विचारलं आणि मग जाहीर केलं, ‘मैं अब एक ऐसी चीज़ दिखाऊँगी जो मै नहीं दिखाना चाहती थी!’ (प्रेक्षकांमधले पुरुष आता खूश झाले. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ असे भाव काहींच्या चेहर्‍यावर दिसले.)

आता फोकस एका स्क्रीनकडे वळला. फि.बा. आणि शब्बीर यांच्यातलं भावाबहिणीपलिकडलं नातं दाखवण्यात आलं. आता अचानक सगळा जमाव शब्बीरवर तुटून पडला. (‘च्यायला, काय बघण्याची अपेक्षा केली आणि काय बघितलं’ असं फ्रस्ट्रेशन असावं बहुतेक त्यामागे) सिक्युरिटीवाल्यांनी जमावाला दूर केलं. (त्याआधी जमावातल्या प्रत्येकाने निदान एक तरी फटका मारला आहे याची खात्री करून घेतली होती त्यांनी.) मग अचानक प्रेक्षकांपैकी एकीला एक माईक मिळाला. मग तिने शब्बीरला एक लेक्चर दिलं. लेक्चर ऐकताना शब्बीरचा चेहरा मात्र निर्वाणाप्रत पोचल्यासारखा निराकार होता. त्यानंतर प्रेक्षकांमधल्या एका मौलवीने या ‘बहीणभावांचा’ निकाह लावण्याचा उपाय सुचवला. मग राखीने आपलं तत्वज्ञान ऐकवलं. (‘पतीके गुजरने बाद किसी और मर्द के साथ रिश्ता रखना कोई गलत बात नहीं है। लेकिन वो रिश्ता जायज़ होना चाहिए।’) आता न्यायनिवाडा झाला होता. त्यामुळे मग एक-दूसरेके गले लगना यासारखे सोहळे पार पडले. मग फि.बा. ने त्या बाबावर (शब्बीरवर हो..) ‘प्रेमा’चा एवढा वर्षाव केला, की त्यापुढे ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोलीनेही लाजून मान खाली घातली असती. अशा रीतीने एक महान कार्यक्रम पार पडला आणि बघणारा मी धन्य जाहलो.

तर असा होता ‘राखी का इन्साफ’. हा कार्यक्रम पाहिल्यावर महामहोदया राखीदेवींच्या न्यायप्रियतेवर माझा पूर्ण विश्वास बसला आहे. हा कार्यक्रम वेळोवेळी बघून समस्त लोकांनी आपल्या पुण्यकर्मांत भर घालावी हेच माझं कळकळीचं सांगणं.

बोला परमप्रकाशिता महामहोदया नौटंकीसम्राज्ञी अल्पवस्त्रआच्छादिता त्रैलोक्यसुंदरी मिकासिंगचुंबिता स्वस्तुतीविशारदा आद्यस्वयंवरसहभागिनी राखीदेवी सावंत की....

जय!! (इथे कोणाला ‘ऐशी की तैशी’ म्हणावसं वाटलं तरीही मी ‘जय’च म्हणणार! मी माझ्या दैवताचा असा अपमान करणार नाही!)

16 comments:

 1. mast.. mast...mast... rakhi ka insaf baghun hasave ki radsave kalenase zalay.. hi baya aawra.. zaliye..

  ReplyDelete
 2. हो ना. किंबहुना तिला आवरणंही अशक्य आहे. मला मध्यंतरी मेलमध्ये एक कविता आली होती...

  भरून आले आसमंत
  रडू लागले संत
  महाराष्ट्राची खंत
  राखी सावंत

  अचूक वर्णन :-)

  ReplyDelete
 3. लेखन छानच झालाय. पण राखी सावंत या बये विषयी एवढ लिहावंसं वाटलं तरी कसं ?

  ReplyDelete
 4. आभार. अहो, राखी सावंतबद्दल लिहिण्यासारखं बरंच काही आहे. ज्यांना विनोदी लिहायचं असेल किंवा टीकात्मक लिहायचं असेल त्यांना राखी भरपूर मालमसाला पुरवते लेखनासाठी. अर्थात ज्यांना विनोदी किंवा टीकात्मक लिहायचं नसेल त्यांना मात्र राखीचा काही उपयोग नाही.. ;-) असो. ब्लॉगवर आपलं स्वागत. :-)

  ReplyDelete
 5. व्वा! मी काही हा कार्यक्रम पहिला नाही. आणि पाहूनदेखील एवढ ह्सेल याची खात्री नाही. खरच "याच साठी केला होता अट्टहास" ब्लॉग वाचण्याचा..

  ReplyDelete
 6. खूप खूप आभार. आता पाहात जा हा कार्यक्रम नित्यनियमाने. खूप संधी मिळेल तुम्हाला हसण्याची. आणि हो, ब्लॉगवर स्वागत. :)

  ReplyDelete
 7. लेटेस्ट ऐकलंस की नाही...
  अपमान सहन न होऊन एकानं आधी अन्नपाणी आणि मग प्राण सोडला!

  ReplyDelete
 8. होऽऽ ऐकलं की... राखीदेवींचा महिमा, दुसरं काय? जसे आम्ही रजनीदेवांचे भक्त आहोत तसेच राखीदेवींचेही आहोत. त्या मूढ बालकाला राखीदेवींचं तेज सहन झालं नाही आणि म्हणून त्यामुळे त्याची इहलोकीची यात्रा संपली! ;-)

  आणि हो, खूप धन्यवाद. सगळे लेख आवर्जून वाचलेस. :-)

  ReplyDelete
 9. ही पोस्ट वाचून मला ’संकेत संकेत संकेत’ असे ओरडावेसे वाटतेय आणि मग तू हाताने थांब असा अत्यंत कडक आदेश केल्यामूळे मी गप्प बसलेय असाही विचार डोक्यात चमकतोय... :)

  आता ही ईतरांना अर्थहीन बडबड वाटली तरी याचा संदर्भ तूला नक्की लागेल...

  अरे काय तो राखीताईंचा आवेश, काय डोळ्यांच्या हालचाली, हाताने लोकांचे ओरडणे थोपवणे, हसू की नको या गोंधळात पडलेली ओठांची विचित्र हालचाल.... भन्नाट आहे हा कार्यक्रम!!

  पोस्ट तर सुपरभन्नाट... विषयच तसा खमका आहे ;)

  ReplyDelete
 10. हाहाहा.. हरभर्‍याचं झाड एवढं उंच नसतं गं. पडेन खाली मी...

  ReplyDelete
 11. Zakkas lihilay......

  ReplyDelete
 12. गायत्री,

  खूप खूप धन्यवाद. :-)

  ReplyDelete
 13. हा हा हा...भार्री :D :D :D

  ReplyDelete
 14. धन्यवाद मैथिली... :-)

  ReplyDelete
 15. महेश,

  धन्यवाद. आणि ब्लॉगवर हार्दिक स्वागत. :-)

  ReplyDelete