Thursday, 7 October, 2010

उशीर

‘हार्दिक अभिनंदन अभय. तू केलेलं प्रेझेंटेशन आपल्या क्लायंटला आवडलं. त्यांनी हे प्रोजेक्ट आपल्या कंपनीला दिलंय.’, बॉसचे हे शब्द ऐकल्यावर अभयचा आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. त्याची खूप दिवसांची मेहनत सार्थ झाली होती. रात्ररात्र जागून केलेल्या कामाचं अखेर त्याला फळ मिळालं होतं. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ अशी त्याची अवस्था झाली होती. त्याच्या डोळ्यांसमोरून आत्तापर्यंत घडलेल्या घटना तरळून गेल्या. प्रेझेंटेशनसाठी केलेली मेहनत, रात्ररात्र केलेली जागरणं, सुट्टीच्या दिवशीही केलेलं काम, या कंपनीत कामाला लागण्याआधी असलेले हलाखीचे दिवस, नोकरी मिळवण्यासाठी केलेली धडपड, मुंबईत नुकताच आलेला असताना जागा मिळवण्यासाठी केलेली वणवण, रागारागात गावचं घर सोडलं तो दिवस, आईबाबांशी झालेलं भांडण... सारं सारं अगदी आत्ताच घडून गेल्यासारखं स्पष्ट दिसलं त्याला.

अभय लहानपणापासूनच तसा वांड होता. अभ्यासात त्याचं कधीच लक्ष नसे.खोड्या काढण्यात आणि टगेगिरी करण्यात तो नेहमीच पुढे असायचा. घरच्यांनी हजार वेळा टोचलं म्हणून जेमतेम ग्रॅज्युएट झाला होता तो. पण तरीही नोकरी करण्यापेक्षा घरून पैसे मागून ते बाहेर जाऊन उधळायचे असाच त्याचा स्वभाव होता. अशा स्वभावामुळे घरी सातत्याने वाद व्हायचे. अशाच एका वादाच्या वेळी अभयने रागाच्या भरात घर सोडलं आणि कोणालाही काही न सांगता तो सरळ मुंबईला मित्राकडे निघून आला. आठवडाभर राहू दिल्यावर मित्रानेही परवडत नसल्याचं कारण सांगून अभयला घराबाहेर काढलं. घरच्या सुरक्षित जगाची सवय असलेल्या अभयला प्रथमच बाहेरच्या जगातील प्रॅक्टिकॅलिटीची जाणीव झाली. मग सुरू झाली जागा मिळवण्यासाठीची वणवण! खिशात पैसे नव्हते आणि मुंबईत टिकायचं तर होतं. सुरुवातीचे काही दिवस तर त्याला प्लॅटफॉर्मवर झोपून काढावे लागले! नोकरीसाठी भटकताना अखेर त्याला सध्याच्या अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण निदान थोडे तरी पैसे मिळत होते. सुरुवातीच्या दिवसांएवढी वाईट अवस्था नव्हती. एकदा नोकरी मिळल्यावर स्वतःच्या कल्पकतेच्या जोरावर तो प्रगतीच्या पायर्‍या चढत गेला.

‘आणि यामागे निःसंशय तुझी मेहनत आहे. प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी तू रात्रंदिवस झटलास. वीकेंडलाही काम केलंस. प्रेझेंटेशन चांगलं व्हावं यासाठी एक्स्टेन्सिव्ह रिसर्च केलास. मला तुझी मेहनत दिसत होती, पण त्या मेहनतीच्या बदल्यात मी तुझा पगार वाढवू शकत नव्हतो. कंपनीकडे पैसाच नव्हता ना. ८ जणांना लेऑफ केलं तेव्हा त्या यादीत तुझंही नाव होतं, पण माझा तुझ्यावर विश्वास होता. म्हणूनच आपल्या प्रेसिडेंटशी बोलून मी तुझं नाव त्या यादीतून वगळलं होतं. पण आता हे एवढं मोठं प्रोजेक्ट आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे पैशाची काहीही फिकीर नाही. तुझ्याचमुळे ही अ‍ॅड कंपनीला मिळालेली आहे. म्हणून आजपासून तू या प्रोजेक्टचा मॅनेजर आहेस. तुझा पगारही वाढवण्यात येत आहे.’, बॉस बोलतच होता. अभयचं त्याकडे लक्ष नव्हतं. त्याला चुकल्याचुकल्यासारखं, काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत होतं.

हल्ली हे असं उदास वाटण्याचं, काहीतरी हरवल्यासारखं वाटण्याचं त्याचं प्रमाण वाढलं होतं. त्याने घर सोडल्याला सहा वर्षं उलटून गेली होती. या सहा वर्षांत त्याला आईबाबांची आठवण खूप वेळा आली होती. त्यांच्याशी संपर्क साधावा असंही खूप वेळा वाटलं होतं. पण त्याचा दुखावलेला अहंकार त्याला तसं करू देत नव्हता. नाही म्हणायला त्याने एकदा आपल्या मित्राला फोन करून आपला ठावठिकाणा सांगितला होता. निदान कोणालातरी आपण कुठे आहोत हे माहित असावं या भावनेने. पण ‘आईबाबांना यातलं काही सांगायचं नाही’ या अटीवरच त्याने मित्राला आपला पत्ता आणि फोन नंबर सांगितला होता. पण हल्ली त्याला घराची आठवण वारंवार यायला लागली होती. ‘आपलं थोडं चुकलंच. थोडं बोलले म्हणून एवढं काय मनाला लावून घ्यायचं! आणि आपल्या भल्यासाठीच तर बोलले होते. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काही नव्हता त्यात’, असे विचार आजकाल त्याच्या मनात रुंजी घालू लागले होते.

आजही घरी जाताना त्याला तसंच वाटत होतं. वास्तविक एवढं मोठं प्रोजेक्ट आज मिळालं होतं. त्याच्या मेहनतीला फळ आलं होतं. आज वास्तविक आनंदाचा दिवस, यश साजरं करण्याचा दिवस. पण अशावेळी आनंद होण्याऐवजी घराची आठवण त्याला तीव्रतेने येऊ लागली होती. ‘आजचं हे यश ऐकून आईला किती आनंद होईल. तसाही आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनी तिला किती आनंद व्हायचा! शाळेच्या क्रीडास्पर्धांत धावण्याच्या स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाचं तिला काय कौतुक वाटलं होतं. त्यादिवशी खास आपल्याला आवडतो म्हणून तिने गोडाचा शिरा केला होता. बाबांनीही कौतुकाने पाठ थोपटली होती. आज आपला मुलगा एवढा मोठा झाला आहे, एवढे पैसे मिळवतो हे ऐकून दोघांना काय आनंद होईल.’ अभयच्या डोळ्यांत पाणी तरळलं. घरी पोचेपर्यंत त्याने गावाला जाण्याचं नक्की केलं होतं. त्याने ठरवलं, ‘उद्याच निघूया आपण. बॉसला सांगून आठवडाभराची सुटी नक्कीच मिळवता ये‍ईल. तसंही तो आपल्यावर खूश आहे. आपण गावाला जाऊ आणि आईबाबांची माफी मागू. ते नक्की माफ करतील आपल्याला. त्यांना इकडेच घेऊन येऊ. आणि मग सगळे एकत्र राहू’

घराचं दार उघडताना शेजारच्या थोरात काकूंनी अभयला त्याच्या नावाची तार दिली. अभय घरी नसल्यामुळे त्यांनीच सही करून ती घेतली होती. तार उघडताना त्यावर आपल्या गावाचं नाव पाहून अभयच्या काळजात धस्स झालं. थरथरत्या हाताने त्याने ती तार उघडली. तारेत मजकूर होता, ‘मदर फादर डाईड इन अ‍ॅक्सिडन्ट. लीव्ह इमिजिएटली’. जगातली सारी दुःखं आपल्यावर येऊन आदळत आहेत असं त्याला वाटलं. त्याला आईबाबांशी बोलायचं होतं, त्यांना स्वतःच्या यशाबद्दल सांगायचं होतं, त्यांची माफी मागायची होती, त्यांच्याशी खूप खूप गप्पा मारायच्या होत्या... पण फार उशीर झाला होता...

6 comments:

 1. नीट जमली नाहीये रे अजून. पहिलाच प्रयत्न आहे ना..

  ReplyDelete
 2. अरेरे... अशी का रे दुखरी सुरुवात??

  ReplyDelete
 3. अरे, सुचायला नको? मारे टेचात ब्लॉग तर चालू केला मी, पण लिहिणार काय? विनोदी लिहायचं होतं काहीतरी, पण जमलं नाही. आणि एकतरी पोस्ट लिहायची होती. (याधीची पोस्ट म्हणजे ओळख होती. तिला लेख कसं म्हणणार?) म्हणून जे सुचलं ते लिहिलं.

  ReplyDelete
 4. सुरुवात चांगली आहे... पण छोटी आहे ना रे :(.. कसे आहे ना संकेत.. समाजाला (म्हणजे लोकांना, इथे वाचकांना देखील) नाट्यमय गोष्टींमध्ये भारी आवड असते. मग त्याच्या आयुष्यात काय काय घडतंय ह्यात सर्वांना रस असतो.. :) पुढे तू अजून उत्तम लिहीशिलाच ह्यात वाद नाही... शुभेच्छा... :)

  ReplyDelete
 5. रोहन,

  अरे मला काय लिहावं ते सुचत नव्हतं. त्यामुळे हा पहिला प्रयत्न होता कथालेखनाचा. तो नीटसा जमला नाही. :-)

  ReplyDelete