Saturday 30 October, 2010

माझी शिक्षणयात्रा - १

शिक्षणाचं आणि माझं पहिल्यापासूनच वाकडं आहे. शिकण्यात मला कधीच रस वाटला नाही. म्हणजे लहानपणी अभ्यास करणे हा दुर्गुण अंगी ठासून भरलेला असल्यामुळे शाळेतल्या हुशार मुलांमध्ये माझी गणना व्हायची. पण तरीही मनापासून अभ्यास कधी केला नाही. अभ्यास करण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यावेळी वर्गातल्या सर्वांत हुशार मुलाला बाकी मुलं आणि शिक्षक खूप भाव द्यायचे. बर्‍याच ठिकाणी कौतुक व्हायचं. आणि शिक्षकांचा लाडका असल्याचे काही महत्त्वाचे फायदे होते. सगळ्यांत महत्त्वाचा फायदा म्हणजे शिक्षा कमी व्हायची. माझ्या अभ्यासात आघाडीवर असण्यामुळे अनेकदा माझी शिक्षा कमी झाली आहे. त्यामुळे लक्ष देऊन अभ्यास करण्यामागे हे एक मोठं इन्सेन्टिव्ह होतं.

वास्तविक दहावीनंतरच माझं तोपर्यंत झालेल्या शिक्षणाने समाधान झालं होतं. मी साक्षर झालो, आता आणखी शिकून पुढे काय करायचं आहे असा एक रास्त विचार माझ्या मनात होता. पुण्यात (किंवा फॉर दॅट मॅटर, मराठीचं अस्तित्त्व शिल्लक असलेल्या कोणत्याही गावात किंवा शहरात) एखादं दुकान काढावं असे विचार मनात होते माझ्या. ‘आपटे आणि सन्स (‘सन्स’ म्हणजे माझ्या आईबाबांचे आम्ही दोघे सन्स. माझं अजून लग्नच झालेलं नसल्याने मला सन्स असण्याचा प्रश्न नाही) किराणा आणि भुसार मालाचे किरकोळ विक्रेते. (‘किरकोळ विक्रेते’ हा शब्द Retailers या अर्थाने वापरण्यात आलेला आहे. ‘’किरकोळ’ हे विक्रेत्यांचं विशेषण म्हणून इथे वापरलेलं नाही हे सूज्ञ वाचकांनी ध्यानात ठेवावं..) आमच्या येथे लक्ष्मी छाप हिंग, दगडफूल, गाय छाप तंबाखू, वैद्य भुसनळे यांच्या जुलाबाच्या गोळ्या व इतर किराणामालाचे साहित्य मिळेल. कृपया सुटे पैसे देणे. उधारी बंद आहे. आमची कोठेही शाखा नाही’ अशी पाटी वाचायला काय मजा आली असती! आणि गिर्‍हाइकांचं आपल्याला टेन्शन नाही. समोरच्या गिर्‍हाईकाला हरभर्‍याच्या झाडावर चढवलं की तो आपला खिसा आपोआप मोकळा करतो. ‘काय काकू, बर्‍याच दिवसांत दिसला नाहीत. कुठे बाहेर गेला होतात की काय? आणि काय हो हे, एवढ्या कशा वाळलात? बरंबिरं नव्हतं का?’ असं विचारलं की काकू खूश! मग भलेही त्या चारही बाजूंनी उसवत चाललेल्या का असोत! आपल्याला काय गिर्‍हाइकं आल्याशी मतलब. त्यावेळी मनात आलेले हे विचार मनातच राहिल्यामुळे इंजिनिअरिंगचे भोग आमच्या नशीबी आले आणि महाराष्ट्र एका उमद्या उद्योगपतीला मुकला. असो. विषयांतर पुरे आता.

शालेय जीवनात माझे हाडवैरी असलेले विषय म्हणजे भूगोल (Geography) आणि जीवशास्त्र! (Biology). या दोन विषयांमुळे माझ्या नीरस आयुष्यात रंग भरले गेले. भूगोल हा प्रकार माझ्या कधीच लक्षात राहायचा नाही. भूगोलातला ‘गोल’ नेहमी माझ्या उत्तरपत्रिकेवर मार्कांच्या रुपाने अवतीर्ण व्हायचा. त्या उत्तरपत्रिकेतल्या माझ्या अचाट विधानांची गोळाबेरीज केली असती एक शोधनिबंध नक्की तयार झाला असता. ‘दार्जिलिंगला नारळाच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत आणि केरळमध्ये चहाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते’ असं एक खळबळजनक विधान एका परीक्षेत करून मी आमच्या बाईंना त्यांनी आजवर शिकलेला (आणि शिकवलेला) भूगोल विसरायला लावला होता! कित्येकदा माझी ही अशी स्फोटक विधानं वाचून परीक्षक बुचकळ्यात पडायचे. माझं भूगोलाचं अगाध ज्ञान मी इतरही ठिकाणी पाजळलं होतं. बी. टी. एस. (Bombay Talent Search) नावाची एक परीक्षा होती. त्यात लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवणार्‍यांचे इंटरव्यू घेतले जायचे. असाच एक इंटरव्यू अस्मादिकांनीही दिला होता. ‘दिल्लीमधून कोणती नदी वाहते?’ या प्रश्नाला ‘कृष्णा’ आणि ‘पुण्यामधून वाहणारी नदी कोणती?’ या प्रश्नाला ‘यमुना’ हे उत्तर दिल्यावर प्रश्नकर्त्याने पराभव मान्य केला होता आणि पडलेल्या चेहर्‍याने आणि खालावलेल्या आवाजात मला जायला सांगितलं होतं!

‘परीक्षेत जास्त मार्क मिळवायचे असतील तर, नकाशांचा सढळ हाताने वापर करावा’ असं एक आचरट वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं! त्यामुळे बर्‍याचशा उत्तरांत नकाशे काढण्याचा ससेमिरा मी स्वतःमागे (आणि मी काढलेला नकाशा समजून घेण्याचा ससेमिरा परीक्षकामागे) लावून घेतला होता. सुरुवातीला नकाशे काढण्याची स्टेन्सिल माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मी हाताने  नकाशे काढायचो. त्यावेळी मी काढलेले भारताचे नकाशे हे अडीनडीला कोणत्याही देशाचे म्हणून सांगता आले असते. बघणार्‍या प्रत्येक माणसाला त्यात वेगळा देश दिसायचा. अगदी चीन, जपान, अमेरिका, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सर्बिया, अझरबैजान, मेक्सिको अशा कोणत्याही देशाचा नकाशा म्हणून मी काढलेला भारताचा नकाशा चालून जायचा! एवढंच नव्हे तर, मी काढलेला भारत हा थोडा अंटार्क्टिकासारखा दिसतो असंही माझ्या काही मित्रांचं म्हणणं होतं. आणि अशा त्या चहूबाजूंनी प्रवाही असलेल्या भारतात मी राज्यं काढली की बहुतेकांचा ‘परीक्षेत उत्तरं न सुचल्याने मी वेळ घालवण्यासाठी उत्तरपत्रिकेवर रेघोट्या मारत होतो’ असा समज व्हायचा! म्हणजे तसा तो बहुतेकवेळा खराही असायचा, पण तो वेगळा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य गोवा पादाक्रांत करून कर्नाटकात घुसलेलं असायचं. केरळ राज्याचं एक टोक थेट बंगालपर्यंत जायचं. जम्मू-काश्मीर, हरयाणा आणि पंजाब या राज्यांच्या सीमा एकमेकांत मिसळून जायच्या.

नकाशे काढण्यासाठी स्टेन्सिल वापरायला लागल्यापासून भारतमातेची सीमारेखा जरा बरी यायला लागली. म्हणजे हा भारत आहे असं निदान लोक ओळखू तरी लागले. पण तेव्हाही त्या स्टेन्सिलच्या बॉर्डरवरून पेन्सिल फिरवताना ती बर्‍याचदा हलायची आणि भलतीकडेच जायची. त्यामुळे पूर्ण झाल्यावरही माझा भारत चार भागांमध्ये फाळणी झाल्यासारखा दिसायचा. मग ती आतली रचना खोडता खोडता सीमाही कधीकधी पुसली जायची. आता फक्त एवढ्याचसाठी परत स्टेन्सिल कोण लावणार? त्यामुळे मी हातानेच मग ती सीमा जोडायचो आणि भारतमाता परत हतबल दिसू लागायची. नकाशांच्या जोडीला बार चार्ट्‌स नामक प्रकार होता. एखाद्या बाबतीत बर्‍याचश्या राज्यांची एकमेकांशी तुलना करताना हा बार चार्ट कामी यायचा. हे प्रकरणही मला कधीच जमलं नाही. मी बार चार्टच्या नावाखाली वाटेल त्या लांबीरुंदीचे आयत काढायचो. त्यामुळे माझ्या त्या बार चार्ट्‌समध्ये महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा कधी चेरापुंजीपेक्षा जास्त तर कधी राजस्थानपेक्षा कमी असायचा! संपूर्ण भूगोल हा विषय मी असा इंच-इंच लढवत शिकलो आहे.

क्रमशः

13 comments:

  1. away some yar whats your head tussi great ho ja panah/////

    ReplyDelete
  2. धन्यवाद. आणि ब्लॉगवर हार्दिक स्वागत. येत जा असेच नेहमी... :-)

    ReplyDelete
  3. हेहे...भारी..आहे तुमचा ब्लॉग....आवडला...!!! :D

    ReplyDelete
  4. एकदम मस्त. 'बिगरी ते मॅट्रिक' ची आठवण झाली.
    पुढचा भाग लवकर येऊ द्या.

    ReplyDelete
  5. मैथिली आणि क्षितिज,

    ‘अहो’ मत कहो ना. :-) अहो म्हणण्याएवढा मी मोठा नाही. मला एकेरी उल्लेख केलेला जास्त आवडेल. प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. आणि ब्लॉगवर मनापासून स्वागत. :-) पुढचा भाग ये‍ईल थोड्याच वेळात.

    ReplyDelete
  6. हो हो हो !! हा हा हा !! हे हे हे !!!!! ख्या ख्या ख्या !!! भन्नाट !!!! अरे मीदेखील नकाशाचा सढळहस्ते वापर केलेला १०वीत, तरीही गुण कमीच पडलेत. ही नकाशाची कल्पना ज्याला सुचली त्यला भूगोलसाठी ३ तास मिळाले असतील. वेळेचा दुरुपयोग म्हणजे नकाशा काढणे !!

    ReplyDelete
  7. अगदी बरोबर. भूगोलाची उत्तरपत्रिका ही नकाशांनी भरगच्च असलीच पाहिजे असा माझा समज होता त्यावेळी. पण एक बरं होतं या नकाशांचं. वेळ जायचा त्यात. नकाशे काढले नसते तर माझे पेपर एका तासात सोडवून झाले असते. कारण, पूर्ण पेपरमधले अर्धे प्रश्न तर मला ‘आऊट ऑफ सिलॅबस’ वाटायचे. त्यामुळे बाकीचे प्रश्न सोडवायला एक तास पुरायचा... ;-)

    ReplyDelete
  8. "निशाणा तुला दिसला ना" हे गाणं माहितीये का?? त्याच चालीवर वाच >> "नकाशा तुला जमला ना" :))

    ReplyDelete
  9. नाही ना. म्हणून तर पंजाब, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर या राज्यांचं एक संयुक्त राज्य तयार व्हायचं माझ्या नकाशात. आणि महाराष्ट्र कर्नाटकावर स्वारी करायचा. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न’ मी माझ्या परीने भूगोलाच्या पेपरात कधीचाच सोडवला होता. ;-)

    ReplyDelete
  10. हा हा हा..........:D :D :D.......

    ReplyDelete
  11. अरे.. इतिहास आणि भूगोल हे माझे आवडीचे विषय.. :) पण तुझे अनुभव भारी... :)

    ReplyDelete
  12. रोहन,
    अरे माझे तर ते अगदी जिव्हाळ्याचे विषय. जेवढं प्रेम मी इतिहास-भूगोलावर केलं तेवढं तर आणखी कोणावरही केलं नाही... ;-)

    ReplyDelete