Thursday 14 October, 2010

सुखसंवाद - २

सुखसंवाद - १


सौ: अहो, ऐकलं का?
श्री: बोला. (स्वगत: या घरात ऐकणारा फक्त मी आहे, हे तुला अजून माहित नाही का? तू बोलतेस आणि मी ऐकतो! आणि तसंही माझी हिंमत आहे का तुझ्याकडे दुर्लक्ष करण्याची?)
सौ: तुमची आंघोळ झाली का?
श्री: नाही अजून. आज रविवार आहे गं.
सौ: आधी आंघोळ करा बघू!
श्री: का? (स्वगत: काय वैताग आहे! जरा पेपर वाचू देत नाही!) आणि तसंही मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी उठलोय.
सौ: तर तर! ११ वाजले आहेत, काही कल्पना आहे का? नुसते झोपून राहता तंगड्या वर करून उशिरापर्यंत!
श्री: करतो. (स्वगत: साहजिक आहे उशिरापर्यंत झोपणं! तुझ्या घोरण्यामुळे रात्री झोप लागत नाही ना!रात्रभर एखाद्या ड्रिलिंग मशीनशेजारी झोपलोय असं वाटत राहतं मला! त्यामुळे तू उठल्यावरच जरा डोळा लागतो माझा.)
सौ: लवकर! आज तरी निदान आटपा लवकर! वटपौर्णिमा आहे आज.
श्री: मग तू जाणार नाहीस वाटतं वडाची पूजा करायला?
सौ: जाऊन आलेही. तुम्ही जागे असलात तर कळणार ना तुम्हाला! एवढी नवीन साडी नेसले आज, त्याचं जरा म्हणून कौतुक नाही! आणि त्या शेजारच्या मिसेस वाघमारेंना मात्र परवा म्हणालात, ‘क्याय वाघमारेबाई, नवीन शाडी व्याटतं’. तीन वर्षांपासून आहे ती साडी त्यांच्याकडे! हुं!!!
श्री: (स्वगत: ही साडी नवीन आहे? दुकानदाराने तुला चांगलंच बनवलेलं दिसतंय. आणि कौतुक करण्यासाठी मुळात काही चांगलं असावं लागतं!) अगं, पण मला काय माहित ती साडी त्यांच्याकडे तीन वर्षांपासून आहे ते?
सौ: हो! तुमचं मुळी कुठे लक्षच नसतं!
श्री: (स्वगत: कमाल आहे! आता मी काय ती बाई कुठली साडी नेसते याची नोंद ठेवू काय? आता मी त्या वाघमारेबाईकडे लक्ष दिलं नाही तर म्हणतेस, ‘माझं लक्ष नसतं’ आणि जर मी लक्ष ठेवलं असतं तर म्हणाली असतीस, ‘या वयात शोभत नाही तुम्हाला!’) चुकलंच माझं! लक्ष देऊन पाहायला हवं होतं नाही मी वाघमारेबाईंकडे? तशा दिसायला चांगल्या आहेत त्या! (स्वगत: तुझ्याशी सरळ बोलण्यात पॉइंटच नाही! तुझ्याशी तुझ्याच भाषेत बोलायला हवं!)
सौ: कसं गं बाई बोलवतं असं? जरा जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा! बायको वडाची पूजा करून ‘हाच पती जन्मोजन्मी मिळावा’ अशी प्रार्थना करून आली आहे तिचं कौतुक करणं दूरच, उलट तुम्ही शेजारणीचं कौतुक करताय!
श्री: आता तू वडाची पूजा केलीस यात कौतुक कसलं? उलट माझी सात जन्मांची काळ्या पाण्याची शिक्षा निश्चित झाल्याने मी वास्तविक शोक प्रकट करायला हवा!
सौ: काही जिभेला हाड आहे का? म्हणे काळ्या पाण्याची शिक्षा! शिक्षा तर मला आहे. तुमच्यासारखा नवरा मिळाला. तरी लग्नाआधी बाबा म्हणत होते, ‘दहा वेळा विचार कर’ म्हणून! तेव्हाच ऐकलं असतं त्यांचं तर जन्माची सुखी झाले असत्ये.
श्री: तुझ्या बाबांबद्दलचा माझा आदर अचानक वाढला आत्ता! एवढे दिवस मी एवढ्या दूरदर्शी माणसाचा उगाच दुःस्वास केला!
सौ: अहो किती तोंड चालवाल? त्या मानकामेबाईंचे मिस्टर बघा कसे चांगले आहेत! दर रविवारी बायकामुलांना फिरायला घेऊन जातात. मानकामेबाईंना घरकामात मदतही करतात.
श्री: त्या मानकाम्याचं ऑफिसमधल्या सेक्रेटरीशी अफेअर आहे! म्हणून तो मदत करतो बायकोला तिने संशय घेऊ नये म्हणून! मीही तुला घरकामात मदत करतो आणि त्याबदल्यात ऑफिसमधल्या सेक्रेटरीशी अफेअरही करतो!
सौ: (स्वगत: करा की! मला तरी बघू द्या कोण मुलगी तयार होते तुमच्याशी अफेअर करायला ते!) शी! देवाने तोंड दिलंय म्हणून काही बोलता! थोडं कमी कळतं तुम्हाला!
श्री: ते तुझ्याशी लग्न झालं त्याचदिवशी सिद्ध झालं नाही का?
सौ: सारखं घालूनपाडून बोलत असता! कधीतरी प्रेमाने बोलल्याचं आठवतंय का तुम्हाला? बायकोवर कधीतरी प्रेम केलंय का तुम्ही?
श्री: मग आपल्या दिव्य कार्ट्याचा जन्म प्रेमाशिवाय झाला आहे असं म्हणायचंय का तुला?
सौ: तेव्हा नव्या नवलाईचे दिवस होते ना! संजूच्या जन्मानंतर कधी प्रेमाने बोलला आहात का माझ्याशी?
श्री: (स्वगत: प्रेमाने बोलण्यासाठी समोरून प्रतिसादही तसा लागतो. तुझं स्वतःचं बोलणं ऐकलं आहेस का कधी? ढेकर देणार्‍या म्हशीसारखा आवाज आहे तुझा! आणि सुरणाच्या गड्ड्याला हातपाय फुटल्यासारखी दिसतेस! अशा परिस्थितीत कसलं डोंबलाचं प्रेमाचं बोलणार मी?) तुझ्याशी बोलण्यापेक्षा समोरच्या भिंतीशी बोलणं जास्त चांगलं आहे. निदान ती मला उलटून तरी बोलत नाही!
सौ: मग बोला तिच्याशीच! आणि करा काय हवं ते!
श्री: (स्वगत: परमेश्वरा, थँक्यू रे बाबा. कधीपासून वाट बघत होतो ही कधी आत जाते आणि कधी मला शांतता मिळते! आता निदान तासभर तरी तिला आतच राहू दे. तेवढीच आणखी थोडी शांतता...)
(आतमधून भांडी आपटल्याचे आवाज, कपबशा फुटल्याचे आवाज इत्यादी इत्यादी)

9 comments:

  1. हा हा !! मस्त सुख-संवाद(?) आहे !!चालू देत !!

    ReplyDelete
  2. marathiblogs.net वर ब्लॉग नोंदणी कर. भेटी वाढतील .ब्लोग पोस्ट झाल्यावर इतरांना लगेच कळेल

    ReplyDelete
  3. संकेत,

    धन्यवाद भाऊ. आपल्या सूचनेप्रमाणे मराठी ब्लॉग विश्वावर नोंदणी केली आहे. सूचनेसाठी शेपरेट धन्यवाद. :-)

    ReplyDelete
  4. ढेकर देणार्‍या म्हशीसारखा आवाज आहे तुझा! आणि सुरणाच्या गड्ड्याला हातपाय फुटल्यासारखी दिसतेस! << हैदोसsssss बॉस तु धुमाकुळ घातलाय्स!!! हाsssहाsssहाssहाsss ह्यां उपमेचा मी कधीतरी उपयोग करणारच आहे.... सुरणाच्या गड्ड्याला हातपाय फुटल्यासारखी दिसतेस! =)) unbelievable!!! hahahahahahaaha

    ReplyDelete
  5. धन्यवाद... असं उत्तेजन मिळालं तर प्रभूकृपेने आणखीही असे काही संवाद सुचतील. :-)

    ReplyDelete
  6. प्रत्येक सुखसंवादानंतर घरातील सामान फुटणार असेल तर भारीच खर्च बुवा... :) लगे रहो.. :D

    ReplyDelete
  7. रोहन,

    हो ना. I hope, माझ्या आयुष्यात असे सुखसंवाद घडणार नाहीत. :-D

    ReplyDelete